वाळवंटातील पाणथळी 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नवलाई
 

मोठमोठ्या वाळवंटी प्रदेशांत सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाळू एखाद्या भागातून वर काढली जाते आणि ती दूर अंतरावर नेऊन टाकली जाते. या प्रक्रियेला ‘अपवहन’ किंवा ‘सखलीकरण’ (Deflation) असे म्हटले जाते. या क्रियेत अतिसूक्ष्म वाळू खूप लांबपर्यंत उडत जाते. मात्र जाडीभरडी, थोड्या मोठ्या आकाराची वाळू मागे शिल्लक राहते. सखलीकरणाच्या अशा पद्धतीने अपवहन खळगे (Deflation hollows) तयार होतात. वाळवंटांत सामान्यपणे झिरपलेल्या भूमिगत पाण्याच्या पातळीपर्यंत सखलीकरणाचे हे कार्य सतत चालू असते. झिरपलेल्या भूमिगत पाण्यामुळे कालांतराने या खळग्यांत पाणी साचून तिथे पाणथळ प्रदेश तयार होतात. यांना ‘मरुवन’ (Oasis) म्हणतात. वाळवंटांत वर्षानुवर्षे एकाच दिशेने वारे वाहत असल्याचा, मरुवनांची निर्मिती हा अटळ परिणाम असतो. अर्थात असे असले तरी सगळ्याच वाळवंटांत मरुवने तयार होतात असे मुळीच नाही. काही वाळवंटांत तर अशी मरुवने समुद्रसपाटीच्याही खालीपर्यंत गेलेली दिसतात. 

दक्षिण अमेरिकेच्या पेरू प्रांताच्या नैऋत्य भागातील इका प्रदेशांत ‘हूवकाचिना’ हे गाव अशाच एका मरुवनाभोवती वाढलेले आहे. हे मरुवन चारही बाजूंनी २२ मीटर उंचीच्या मोठमोठ्या वाळूच्या टेकड्यांनी (Sand dunes) वेढून गेलेले आहे. दक्षिणेकडील टेकड्या मात्र केवळ ८ मीटर उंच आहेत. २१५ मीटर लांब आणि १२५ मीटर रुंद असलेल्या या लांबट मरुवनाने २० चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे. या मरुवनांतील पाण्याची जास्तीत जास्त खोली ६ मीटर इतकी असते. 

या मरुवनाच्या भोवती असलेल्या गावाची वस्ती जेमतेम १०० लोकांची असली तरी दरवर्षी इथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. मरुवनाच्या आजूबाजूला असलेल्या उंच वाळूच्या टेकड्यांवर ‘आरनिरॉस’ नावाच्या बग्ग्यांतून मनसोक्त भटकंती करता येते. इथे पर्यटक मोठ्या संख्येने येण्याचे दुसरे कारण म्हणजे मरुवनातील पाण्यात असलेले औषधी गुण होत. हाडांच्या, त्वचेच्या आणि श्‍वासाच्या अनेक विकारांवर वाळवंटांत झिरपलेले हे पाणी खूपच उपयुक्त असल्याचा अनेकांचा दावा आहे. अतिशय देखण्या आणि सुंदर अशा या मरुवनाला ‘अमेरिकेचे मरुवन’ म्हणून ओळखले जाते. 

या मरुवनात झिरपणारे भूजल १९८० नंतर एकदम कमी होऊ लागले आणि त्यामुळे मरुवनावर मोठेच संकट कोसळले. वातावरणातील बदल आणि वाढते तापमान यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. मात्र याला दुसरेही एक कारण आहेच; मरुवनाभोवती राहणाऱ्या काही लोकांनी आजूबाजूच्या वाळवंटात मोठमोठ्या खोल विहिरी खोदल्या. त्यामुळे जे थोडेफार पाणी मरुवनाच्या दिशेने झिरपून तिथल्या खळग्यांत जमा होत होते तेही कमी झाले. स्थानिकांना जेव्हा हे मरुवन टिकवण्याची आवश्‍यकता लक्षात आली, तेव्हा २०१५ मध्ये काही जणांनी आजूबाजूच्या ओल्या शेतजमिनींत जमवलेले पाणी पंपाने उचलून मरुवनात आणायला सुरुवात केली. त्यानंतर आजपर्यंत एकूण ७३ हजार घनमीटर पाणी मरुवनात आणून टाकण्यात आले आहे. यामुळे मरुवनातील पाण्याची खाली गेलेली पातळी ३ मीटरने वर आली आहे. 

हे मरुवन ज्या इका प्रांतात आहे त्या प्रदेशाचा भूगोल मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे लांछा पंपास, पोझो सान्तो आणि विल्लकरी नावाची तीन मोठी वाळवंटे आहेत. तिथली हवा अतिशय उच्च तापमानामुळे नेहमीच तप्त असते. इथून सतत वाहणाऱ्या उष्ण आणि जोरदार वाऱ्यांना ‘पाराकास’ म्हटले जाते. हे वारे या वाळवंटातील वाळूचे मोठ्या प्रमाणांवर अपवहन करतात आणि मरुवनांच्या निर्मितीला पोषक परिस्थिती तयार करतात.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या