नैसर्गिक विजेचा आविष्कार 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नवलाई
 

आपल्या पृथ्वीवर असा एक प्रदेश आहे जिथे वर्षातल्या १५० ते १८० रात्री म्हणजे पाच ते सहा महिने सतत आकाशातील ढगांत वीज चमकत असते आणि वर्षातले ३०० दिवस विजेची वादळे (Lightning Storms) होतात. ढगात तयार होणाऱ्या या विजेचा वेग आणि वारंवारिता हे एक मोठे नवलच आहे. दर दिवशी १० तास आणि दर तासाला २८० वेळा दिसणारी ही वीज ही दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला प्रांतात दिसणारी एक विलक्षण वातावरणीय घटना आहे. व्हेनेझुएलातील मारकैबो तलावाला जिथे उत्तर कोलंबियात उगम पावणारी कातातुंबी नदी येऊन मिळते तिथे नदीच्या मुखाच्या प्रदेशावर आणि केवळ तिथेच ही वातावरणीय घटना घडते. म्हणूनच जगभरात त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आढळून येते. 

या विवक्षित भागांतच इतक्‍या सातत्याने अशी वीज का दिसते याची अनेक कारणे आजपर्यंत हवामान शास्त्रज्ञांकडून दिली गेली आहेत. कातातुंबी नदी जिथे मारकैबो सरोवराला मिळते तिथे एक विस्तृत असा दलदलीचा प्रदेश (Bog) तयार झाला आहे. त्यावर नेहमीच एक हजार मीटर उंचीवर वादळी ढग तयार होत असतात. त्यामुळेच त्यात सतत वीज निर्माण होत असावी असे अनेकांना वाटते. मात्र ही संकल्पना अनेक हवामान तज्ज्ञांना मान्य नाही. विजेची वादळे ही सर्वच मोठ्या वादळांत (Thunderstorms) दिसतात. ती आणि त्यावेळी विजेला दिसणारा नारिंगी, पिवळा व तपकिरी रंग ही इथल्या विजेची वैशिष्ट्ये आहेत असा दावा केला जातो. पण तेही तितकेसे बरोबर नाही, कारण जगात इतरत्र दिसणाऱ्या वादळातही हे गुण आढळतात. मारकैबो तलावाच्या प्रदेशातील या वीजयुक्त वादळाचे वैशिष्ट्य हे आहे, की ती एका विशिष्ट भागातच जवळजवळ रोजच तयार होत असते. 

स्थानिक भूरूपिकी (Geomorphology) आणि नजीकच्या समुद्राचे हवामान या घटकांचा त्यात अर्थातच मोठा वाटा आहे. नवीन संशोधनातून असेही लक्षात आले आहे, की वर्षभरात वीज तयार होण्याच्या वारंवारितेत जसा बदल होत जातो तशी वेगवेगळ्या वर्षातही त्याची संख्या कमी जास्त होत असते. २०१० मध्ये जानेवारी ते मार्च या काळांत या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळांत एकदाही ही वीज दिसली नव्हती. त्यामुळे ती कायमचीच नाहीशी झाली असावी अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. 

आकाशात सातत्याने दिसणारा हा विजेचा आविष्कार अनेक दर्यावर्दी लोकांना मार्गदर्शक म्हणूनही उपयोगाला येत असतो. त्याच्या साहाय्याने समुद्रावर प्रवास करण्याचे मार्ग नक्की करणे सोपे जाते असा इथल्या समुद्रावर भ्रमण करणाऱ्या दर्यावर्दींचा दावा आहे. मारकैबो सरोवराच्या आजूबाजूच्या विस्तृत परिसरातून ही वीज नेहमी दिसत असल्यामुळे तिला मारकैबोचा दीपस्तंभ (Lighthouse) असे म्हटले जाते. 

या विजेचे विवक्षित क्षेत्र साडे आठ अंश उत्तर अक्षांश व ७१ अंश पश्‍चिम रेखांश आणि पावणे दहा अंश उत्तर अक्षांश व ७३ अंश  पश्‍चिम रेखांश असे आहे. आजूबाजूला असलेल्या पेरीजा पर्वत (२५५६ मीटर) आणि मेरीडा पर्वत (२६६० मीटर) यांनी बंदिस्त केलेल्या सपाट मैदानी प्रदेशावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचाही या वीजनिर्मितीत मोठा वाटा आहे. या प्रदेशावर तयार झालेल्या ढगांची उभ्या दिशेने वाढ होते व त्यांत सहजगत्या वीज निर्माण होते. 

या प्रदेशावरच्या सततच्या वीजनिर्मितीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर ओझोन तयार होतो. नवीन संशोधनानुसार या वीजनिर्मितीची दलदलीच्या प्रदेशांत तीन केंद्रस्थाने आहेत. नेल्सन फाल्कन या शास्त्रज्ञांच्या मते, इथल्या दलदलीच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर तयार होणारा मिथेन वायू आणि तेलयुक्त अवसाद यामुळेही ढगांत वीज निर्माण व्हायला आणि त्यांत विशिष्ट रंग दिसायला मदत होते.  मारकैबो खोऱ्याच्या अंतरंगात पृष्ठभागाखाली विस्तृत असे तेलक्षेत्र (Oilfield) आहे आणि मूळ खडकांत (Bed rock) युरेनियम आहे. त्यामुळेही इथला रोजचा विजेचा आविष्कार रंगीबेरंगी दिसत असावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या