जीवाश्‍मांचा खजिना 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नवलाई
 

गुजरात राज्याचा सगळा भूशास्त्रीय इतिहास ६० ते २०० कोटी वर्षे जुना आहे. या काळांत गुजरात गोंडवनभूमीचा भाग होता. पृथ्वीवरील मुख्य पॅनजिया (Pangea) हे महाखंड १८ कोटी वर्षांपूर्वी तुटून लहान भूमिखंडांची विविध दिशांनी हालचाल सुरू झाली. भारतीय भूखंडाची हालचाल दक्षिण गोलार्धाकडून उत्तर गोलार्धाकडे सुरू झाली. त्याच्या आधी ज्युरासिक कालखंडात म्हणजे साधारणपणे २० कोटी वर्षांपूर्वी, दक्षिण गुजरात आणि कच्छच्या भागांत समुद्र वर येऊन तो प्रदेश पाण्याखाली बुडाला होता. समुद्राच्या या आक्रमणामुळे या विस्तीर्ण प्रदेशांत गाळाचे प्रचंड मोठे थर तयार झाले. गाळाच्या वजनामुळे कच्छचा प्रदेश खाली खचला. कच्छमध्ये १४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत समुद्राचे आक्रमण चालूच होते. 

आजपर्यंत अनेक वेळा कच्छ आणि गुजरातच्या इतर भागांत समुद्र कमी-अधिक प्रमाणात वर-खाली होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्या त्या वेळी अनेक सागरी वनस्पती आणि प्राणी समुद्रातील गाळात अडकून नष्ट झाले. त्यांचे जीवावशेष कच्छमध्ये आज जीवाश्‍मांच्या (Fossils) स्वरूपात फार मोठ्या संख्येने आढळून येतात. या जीवाश्‍मांतील विविधता ही खरोखरच आश्‍चर्यकारक असून जगांत आज जीवाश्‍मांचा खजिना असलेले ठिकाण म्हणून कच्छ ओळखले जाते. 

कोणत्याही प्राचीन, अतिप्राचीन अशा भूशास्त्रीय काळातील वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या खडकांत रुतलेल्या (Embeded) व अश्‍मिभूत झालेल्या (Petrified) अवशेषांना किंवा ठशांना (Impressions) जीवाश्‍म (Fossil) असे म्हटले जाते. हे जीवाश्‍म अखंड किंवा तुटलेल्या स्वरूपातील नैसर्गिक अवशेष असतात. त्यावरून जुन्या काळांतील वनस्पती आणि प्राणीजीवनाची व पर्यावरणाची नेमकी कल्पना येते. 

कच्छच्या विस्तृत भागांत कच्छचे मोठे रण (Great Rann of Kachchh) पसरलेले आहे. त्याच्या आग्नेयेला कच्छचे छोटे रणही (Little Rann) आहे. कच्छचे मोठे रण जगात त्याच्या विस्तारासाठी, भूवैज्ञानिक इतिहासासाठी आणि जीवाश्‍मांसाठी एकमेव (Unique) म्हणून प्रसिद्ध आहे. सोळा हजार चौरस किमीपेक्षाही जास्त क्षेत्रफळाच्या या प्रदेशात २० कोटी वर्षे जुन्या ज्युरासिक कालखंडातील अवसादी (Sedimentary) खडकांचे प्राबल्य असून त्यात अगणित अशा जीवाश्‍मांचा अक्षरशः खच पडल्याचे आढळून येते. 

मोठ्या रणातील पच्छम, खदीर, बेला आणि चोरार या बेटांवर २३ ते ७ कोटी वर्षांपूर्वीचे स्तरित, अवसादी खडक असून तेही असंख्य जीवाश्‍मांनी समृद्ध आहेत. सात ते दोन कोटी वर्षांपूर्वी कच्छच्या रणाला उथळ समुद्राचे रूप प्राप्त झाले होते. ११ हजार वर्षांपूर्वी हिमयुगाच्या काळांत समुद्रपातळी खाली गेल्यामुळे रण गुजरातच्या खंबायतच्या आखाताला जोडले गेले. आजचा कच्छच्या रणाचा प्रदेश दोन हजार वर्षे जुना आहे. 

कच्छमध्ये चुनखडक (Limestone) आणि वालुकाश्‍म (Sandstone) कदकांचे विस्तृत प्रदेश आढळून येतात. याच खडकांत प्रामुख्याने जीवाश्‍मही दिसून येतात आणि ते चांगल्या प्रकारे शिल्लक असल्याचेही दिसते. प्रवाळांचे जीवाश्‍म व अमोनाइट्‌स जीवाश्‍म विशेषकरून आढळतात. अनेक ठिकाणी जीवाश्‍म तुटलेल्या अवस्थेत असले तरी काही ठिकाणी अखंड प्राणी, वनस्पतींचे ठसे असेही दिसतात. कच्छच्या रणात फिरताना सहज म्हणून जमिनीवरील थोडीही माती उचलली तरी त्यात अनेक जीवाश्‍म सापडतात. वेगवेगळ्या भूशास्त्रीय काळातील असंख्य प्रकारच्या प्राण्यांचे अवशेष आणि वनस्पतींचे ठसे आपल्याला एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात. 

भूजपासून ६० किमी अंतरावर उत्तरेला असलेल्या छारी नावाच्या गावाजवळच किरा नावाचा एक मृत ज्वालामुखीचा डोंगर आहे. त्याच्या आसपास १३ ते १५ कोटी वर्षे जुने जीवाश्‍म आढळतात. ते अमोनाइट व बेलमनाईट प्रकारचे आहेत.  लखपतजवळ गॅस्ट्रोपॉडचे, तर जंगाडिया धरणाजवळ स्टारफिशचे आणि इतर अनेक ठिकाणी निरनिराळ्या सागरी जिवांचे हजारो जीवाश्‍म नजरेस पडतात. 

मोठ्या कच्छच्या रणात खदिर बेटावर धोलावीरा नावाचे पुराजीवशास्त्रीय (Archaeological) वसतिस्थान आहे. याच्या जवळच १७ ते १८ कोटी वर्षे जुन्या झाडांचे अवशेष सापडले असून ते किनाऱ्यावरच्या दगडांत जीवाश्‍म स्वरूपात दिसतात. इथली ९ मीटर लांब आणि अर्धा ते एक मीटर व्यासाची झाडे वालुकाष्मांत व चुनखडकांत अश्‍मिभूत (Petrify) झालेली आहेत.

संबंधित बातम्या