रामसेतू 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवलाई
 

भारत आणि श्रीलंका यांच्यामधे, तमिळनाडूच्या आग्नेय टोकाकडील पंबन किंवा रामेश्‍वरम बेटापासून, श्रीलंकेच्या वायव्य टोकाकडील मानार बेटापर्यंत चुनखडकांनी बनलेली प्रवाळ बेटांची एक लांबच लांब पण तुटक रचना आहे. या रचनेला ‘रामसेतू’ किंवा ‘ॲडम्स ब्रिज’ असे म्हटले जाते. भूशास्त्रीय पुराव्यांवरून असे लक्षात येते, की हा सेतू म्हणजे भारत - श्रीलंका यांना जोडणारा  एक प्राचीन भुसेतू (Landbridge) असावा. तीस किमी लांबीचा हा सेतू ईशान्येकडील पाल्कची सामुद्रधुनी व नैऋत्येकडील मानारचे आखात यांच्या दरम्यान पसरला आहे. 

या भागातला समुद्र खूप उथळ असून त्याची जास्तीत जास्त खोली दहा मीटर आहे. या सेतूवरील उघडे पडलेले वाळूचे काही भाग पूर्णपणे कोरडे आहेत. अशा परिस्थितीमुळे या प्रदेशांत नौकानयन (Navigation) होऊ शकत नाही. १४८० मध्ये इथे आलेल्या वादळामुळे मोठी पडझड झाली होती. त्यापूर्वीपर्यंत हा सेतू पाण्याच्या वर दिसत होता असे काही उल्लेख आढळतात. 

या सेतूचा सर्वप्रथम उल्लेख रामायणांत असून, रावणाने अपहरण करून लंकेत नेलेल्या सीतेला सोडवून आणण्यासाठी, प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेने हा सेतू बांधल्याची आख्यायिका आपल्या सर्वांना परिचित आहेच. त्यामुळेच या समुद्राला सेतुसमुद्रम असेही म्हटले जाते. उथळ पाण्यातील दगडांची ही शृंखला पंबन बेटावरील धनुष्यकोडीपासून सुरू होते. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीशी दोन किमी लांबीच्या पंबन रेल्वे आणि रस्ता पुलाने जोडलेले आहे. श्रीलंकेकडील मानार बेट हे श्रीलंकेला एका उथळ उंच मार्गाने (Causeway) जोडले गेले आहे. 

रामसेतूच्या निर्मितीबद्दल आणि त्याच्या नेमक्‍या रचनेबद्दल अनेक मतमतांतरे आणि वाद आहेत. हा सेतू गाळ साचून व जमीन उंचावल्यामुळे तयार झाला असल्याचे आणि भारतापासून तुटून श्रीलंका दक्षिणेकडे सरकल्यामुळे निर्माण झाला अशी दोन मते एकोणिसाव्या शतकांत मांडण्यात आली. सेतुप्रदेशातील चुनखडकसदृश रांगेतील खडक मोठमोठ्या चौकोनी तुकड्या तुटलेले आणि विखुरलेले दिसल्यावर, हा सेतू ही मानवनिर्मित रचनाच असावी असेही मत मांडण्यात आले. 

हा सेतू म्हणजे, पृष्ठभागावर कठीण आणि खाली भरड व मृदू असलेल्या वालुकाश्‍म (Sandstone) आणि गुंडाश्‍म (Conglomarate) खडकांच्या एकमेकाला समांतर असलेल्या उंचवट्यासारख्या (Ledges) रांगा आहेत. इथे झालेल्या अनेक संशोधनांनी याचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केले आहे. काहींनी सेतूला प्रवाळ खडकांची रांग म्हटले आहे, तर काहींनी त्याचे वर्णन दोन भूमिप्रदेश जोडणारी, पृथ्वीचे कवच पातळ होऊन बनलेली भुबद्ध रचना (Tombolo) असे केले आहे. काहींनी तिला लांबलचक वाळूचा दांडा (Spit) तर काहींनी रोधक बेटांची मालिका (Barrier island chain) म्हटले आहे. भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने रामसेतू ही १०३ लहान-मोठ्या प्रवाळ खडकांची भिंत (Reef) म्हटले आहे. सेतूच्या तुटलेल्या भिंतीमधील प्रवाळ खडकांचे सपाट माथे पाण्यातून वर डोकावणारे असून संपूर्ण प्रवाळ रांगेत प्रवाळ वाळू (Coral sand) आणि पुळण खडक (Beach rocks) दिसून येतात. 

काही शास्त्रज्ञांच्यामते हा सेतू म्हणजे भारत व श्रीलंका यातील सलग किनाऱ्याचाच भाग असून काहींच्या मते रामेश्‍वरम आणि तलैमनार  यांच्या दरम्यानच्या तटवर्ती (Longshore) प्रवाहांमुळे झालेल्या अवसाद (Sediment) संचयनाचा तो परिणाम आहे. येथील प्रवाळांच्या वाढीमुळेच वाळू अडकून ही रचना तयार झाली असावी, असाही दावा करण्यात आला आहे. एका अभ्यासानुसार जागतिक समुद्रपातळीचा या सेतूच्या निर्मितीशी काही संबंध नसून जमिनीच्या स्थानिक उंचावण्यामुळे तो तयार झाला असावा. 

सेतूची ही रचना साधारणपणे ३५०० वर्षांपूर्वी समुद्रांतून वर आली असावी, असे मत मांडण्यात आले आहे. या सेतूच्या उत्तरेकडील भारताच्या बाजूकडील वाळूच्या पुळणी (Beaches) एक ते सहा हजार वर्षे जुन्या असाव्यात. सेतूवर सापडलेला प्रवाळ खडक  चार हजार वर्षे जुना आहे हेही आता नक्की झाले आहे!

फोटो फीचर

संबंधित बातम्या