उल्का आघात विवरे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नवलाई
 

आपल्या आकाशगंगेच्या अथांग पोकळीत असलेल्या ग्रहांबरोबरच अनेक लहानमोठे खडकांचे तुकडे इतस्ततः भटकत असतात. त्यांना स्थिर भ्रमणकक्षा (Orbits) नाहीत. मंगळ ग्रह आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीत सापडून भटकणारे हे भल्या मोठ्या आकाराचे तुकडे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून पृथ्वीच्या दिशेने येऊ लागतात, तेव्हा त्यांचे वातावरणाशी घर्षण होऊन ते प्रकाशमान होतात. यांना आपण उल्का (Shooting stars) म्हणतो. वेगाने खाली येऊन या उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळतात, तेव्हा मोठे खड्डे किंवा आघात विवरे (Impact Craters) तयार होतात. 

आपल्या आकाशगंगेतील सर्वच ग्रह-उपग्रहांवर अशी विवरे तयार झाल्याचे दिसून येते. चंद्र आणि मंगळ, शुक्र या ग्रहांवर अशी आघात विवरे स्पष्टपणे दिसतात. पृथ्वीवर निर्माण झालेल्या अशा विवरात मात्र पृथ्वीवरील अपक्षरण, झीज, गाळ संचयन अशा क्रियांमुळे बरेच बदल झालेले आढळतात. भूपृष्ठाच्या विभिन्न हालचालींचाही त्यांच्या मूळ रचनेवर परिणाम झाल्याचे दिसते.

आत्तापर्यंत पृथ्वीवर अशी १९० आघात विवरे दिसून आली आहेत. त्यांच्या वर्तुळाकृती आकारात विलक्षण वैविध्य आढळते. त्यांचा व्यास (Diameter) केवळ  १० मीटरपासून  ३०० किमीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर पृथ्वीवरील ही विवरे अगदी दोन अब्ज वर्षांपासून तर आधुनिक काळापर्यंतच्या कालखंडात निर्माण झाल्याचेही दिसते. या आघात विवरांनी पृथ्वीवरील पर्यावरणावर आणि जीव सृष्टीवर मोठे दूरगामी परिणामही केले आहेत. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेल्या अशाच एका उल्का आघातामुळे सगळे डायनॉसोर पूर्णपणे नष्ट झाले होते.

जी विवरे १० हजार वर्षांपेक्षा कमी काळातली आहेत आणि ज्यांचा व्यास १०० मीटरपेक्षाही कमी आहे अशी पृथ्वीवर केवळ आठच विवरे आहेत.  सौदी अरेबियातील वबर, इस्टोनियातील इल्युमेटसा आणि काली, ऑस्ट्रेलियातील हेंबुरी आणि बॉक्‍सहोल आणि रशियातील माछा ही त्यापैकीच काही. १० हजार ते १० लाख वर्ष जुनी, पण एक किमी व्यासाची विवरे अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतात, भारतातील लोणार आणि कझाकस्तान मधे झामनशीन इथे आहेत. १० लाख ते एक कोटी वर्षांपूर्वीची आणि ५ किमी व्यासाची विवरे आफ्रिकेतील घानामधे, रशियातील टार्टारसन, तसेच कझाकस्तान इथेही दिसून येतात. पृथ्वीवर एक कोटी वर्षांपेक्षाही जुनी आघात विवरे आहेत. त्यांचा व्यास सामान्यपणे २० किमी एवढा मोठा आहे. अशी ४० विवरे आत्तापर्यंत शोधली गेली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील व्हेडेफोर्ट, मेक्‍सिकोतील युकाटन प्रांतांत, कॅनडात ओंटारियोत आणि नॉर्वे, स्वीडन येथे अशी विवरे आहेत.

आपल्या महाराष्ट्रात  बुलडाणा जिल्ह्यात लोणार इथे असेच एक उल्का आघात विवर आहे. ते बेसाल्ट खडकांत तयार झाले असून त्यात एक खारट पाण्याचे सरोवरही निर्माण झाले आहे. जवळपास १५० मीटर खोली असलेल्या या वर्तुळाकृती विवराचा व्यास साधारणपणे दोन किमी आहे. यातील पाणी भरपूर खारट आहे (सामू ,पी एच १०.५). म्हणूनच लवणासूर या शब्दावरून त्याचे नाव लोणार असे पडले. कोरड्या ऋतूत सरोवरांत क्षारांचा जाड थर नेहमीच आढळून येतो. या विवराच्या तळभागावर झालेले गाळाचे संचयन ८० मीटर जाड असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ज्या उल्का आघातामुळे हा खड्डा बनला, तो आघात हा लाख वर्षांपूर्वी झाला असावा असे संशोधन सांगते. या परिसरात जे संशोधन झाले त्यातील निष्कर्षानुसार ज्या उल्काखंडामुळे हे विवर तयार झाले तो उल्का खंड पूर्वेकडून ३० अंशांपेक्षाही जास्त कोनात वेगाने खाली आला असावा. हा उल्काखंड ५० ते ६० मीटर व्यासाचा असावा.  मात्र या उल्काखंडाचे तुकडे विवराच्या आजूबाजूला कुठेही आढळत नाहीत. चंद्रावरील आणि मंगळावरील आघात विवरांशी याचे साधर्म्य असून मंगळावरील बेसाल्ट खडकांत जी उल्का आघात विवरे आहेत तसेच लोणार विवराचेही स्वरूप आहे!

संबंधित बातम्या