आशयाच्या खाणीतला विनोद...

विनायक लिमये
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

नवे नाटक
सीटकॉमच्या शैलीत नाटक सादर करणे अवघडच. पण लेखक आणि दिग्दर्शकांनी हे आव्हान इथे पेलेले आहे. हसता हसता कुठलाही प्रचारकी आव न आणता संदेश देत आपल्याच दैनंदिन आयुष्यातल्या घटना आपल्याच मनाच्या आरशात दाखवायाचे काम हे नाटक करते.

मराठी नाटक आता वयात आले आहे, असे कोणी म्हटले तर ते चुकीचे ठरेल, कारण मराठी नाटक वयात म्हणजेच प्रगल्भ होऊन बराच काळ लोटला आहे. आता मराठी नाटकात जे सध्या स्थित्यंतर झाले आहे ते वेगळ्या स्वरूपाचे आहे. सध्या आपल्याकडच्या आरोग्य व्यवस्थेत जसे फॅमिली डॉक्‍टर, मग स्पेशालिस्ट, त्यानंतर सुपर स्पेशालिस्ट असे वर्ग निर्माण झाले आहेत. लोकांच्या आरोग्याच्या गरजांनुसार त्या त्या डॉक्‍टरांकडे रुग्ण जातात. मनोरंजनाच्या क्षेत्रात आता नाटकांतही तसेच प्रयोग व्हायला लागले आहेत. ग्रामीण, ऐतिहासिक, संगीत, पूर्णतः शहरी असे विविध प्रकार यापूर्वी रंगमंचावर विविध नाटकांच्या माध्यमातून सादर झाले आहेत. स्त्रीमुक्ती किंवा स्त्री-स्वातंत्र्य तसेच गिरणी कामगारांचा प्रश्न, कॉर्पोरेट जगतातील जीवघेणी स्पर्धा यासारखे विषय रंगभूमीवर येऊन गेले आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय घरातील एखाद्या जोडप्याच्या आयुष्यातील प्रसंगांवर बेतलेली नाटके अगदी कमी आहेत. दैनंदिन जीवनातल्या छोट्या प्रसंगांवर नाटक उभे करणे अवघड, त्यातही विनोद निर्मिती करणे महामुश्‍किल आणि हे सगळे करीत असताना आशयदेखील सणसणीतपणे जपला जाईल, याकडे लक्ष देणे हे सगळे अवघडच आहे. पण लेखक गिरीश दातार यांचे ‘व्हाय सो गंभीर’ हे नवे नाटक ही सारी कसरत यशस्वीपणे साध्य करते.

सौरभ गंभीर आणि मानसी गंभीर या नवदाम्पत्याच्या आयुष्यात सारं काही सुरळीत, छान छान चाललेले असते. अशा वेळी सौरभची बहीण प्रज्ञा या दोघांची एक बुद्धिमत्ता चाचणी घेते. काही प्रश्न विचारून घेतलेल्या या चाचणीत या दोघांमधील हुशार कोण, याचा निर्णय ती देते. हा निर्णय दिल्यानंतर या दोघांच्या शांत चाललेल्या आयुष्यात बरीच खळबळ माजते. दोघांच्या आनंदी आयुष्यात बऱ्यापैकी वावटळ येते. या टेस्टच्या निमित्ताने सौरभ मानसी या दोघांच्या संसारी आयुष्याची चांगलीच तपासणी होते. या वावटळीतून सौरभ आणि मानसी बाहेर पडतात, न पडतात तोवर एका वेगळ्याच प्रश्नावरून दोघांमध्ये चांगलेच वाद होतात. वादाचा मुद्दा असतो तो म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील ते तीन दिवस अर्थात मासिक पाळी. मानसीचा तो काळ आणि त्या काळातील सौरभचे वागणे. सौरभच्या आई-वडिलांच्या क्रिया-प्रतिक्रिया, मानसीची मनोअवस्था हे सारे या कुटुंबात नवे नाट्य घडवते.

गंभीर कुटुंबातले हे दोन प्रसंग या नाटकात दोन अंकामध्ये सादर होतात. लेखक गिरीश दातार यांनी यासाठी ‘सिटकॉम’चा फॉर्म्युला वापरला आहे. खरंतर सिटकॉम म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी. हा प्रकार परदेशात प्रारंभी दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी वापरला गेला, त्यानंतर भारतात रूढ झाला. नाटकाच्या विश्वात तो वापरल्याची उदाहरणे अगदी कमी आहेत. इथे मात्र लेखक नाटकाच्या सुरवातीलाच आम्ही सिटकॉम पद्धतीने नाटक सादर करीत आहोत, हे सांगून टाकतो. त्यामुळे नाटकाच्या ठरलेल्या आखीव-रेखीव चौकटीतून तो स्वतःची आणि प्रेक्षकांचीही सुटका करतो. एकदा ही सुटका केल्यानंतर या फॅमिलीची बॅकग्राऊंड,  गंभीर कुटुंबातील लोकांचे वागणे, असेच का, तसेच का, या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळतो. गंभीर कुटुंबातील माणसे एखाद्या प्रसंगात कसे वागू शकतील, यासंबंधी ठरलेले कथानक नसल्यामुळे ते जसे पक्के नाही, तसे त्यांच्या व्यक्तिरेखादेखील एका अर्थाने मुक्त आहेत. लेखक सिटकॉमचा हा जो सर्वात मोठा फायदा आहे, त्याचा पुरेपूर लाभ उठवतो. त्यामुळे नाटकातील व्यक्तिरेखा ठसवण्यासाठी त्याला विविध प्रसंग लिहावे लागत नाहीत. काही गोष्टी प्रेक्षकांवर सोडता येतात. प्रेक्षकांच्या उमजशक्तीला गृहीत धरून त्याला नाटकात जे मांडायचे आहे, ते अधिक नेमकेपणाने खुलवता येते. सिटकॉमचा व्यक्तिरेखा मुक्त असण्याचा जो फायदा आहे, तसाच जर लेखकाला या व्यक्तिरेखा सापडल्या नसतील, तर प्रचंड तोटाही ठरू शकतो. पण दातारांनी येथे या व्यक्तिरेखांचे मर्म अगदी नेमकेपणाने पकडले आहे आणि त्यांना कलाकारांची बुलंद साथ मिळाली आहे. त्यामुळे ‘सिटकॉम’चा हा प्रयोग १०० टक्के यशस्वी होतो.

नाटकाचे दिग्दर्शन अमोल भोर आणि स्वतः दातार यांनी केले आहे. दोघांनी लेखनातल्या काही अव्यक्त बाबी इथे हालचालींतून नेमकेपणाने उभ्या केल्या आहेत. मुक्त वागणे आणि कुटुंबाची आधुनिक राहणी असल्याने व्यक्तिरेखा कुठेही उथळ होणार नाहीत याचे भान ठेवणे आवश्‍यक होते ते भान या द्वयीने सांभाळले आहे.

सौरभ गंभीरच्या भूमिकेत आरोह वेलणकर पहिल्या अंकात थोडासा अवघडल्यासारखा वावरतो. पण दुसऱ्या अंकात मात्र त्याची धुव्वाधार बॅटिंग सुरू होते. आरोह वेलणकर याने सौरभच्या भूमिकेत जे रंग भरले आहेत ते विलोभनीय आहेत. आजच्या काळातला नवरा त्याने नेमकेपणाने उभा केला आहे. मानसी आणि सौरभ हे दाम्पत्य ज्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करते, त्या वर्गात असे प्रसंग घडू शकतात. फक्त हे प्रसंग जाणवण्याइतकी संवदेना आणि तो दृष्टिकोन असायला हवा तो भाग इथे आरोह नेमकपणाने पटवून देण्यात यशस्वी होतो. 

मुळात हे नाटक विनोदी बाजाचे आहे. नाटकात कुठेही आम्ही एखाद्या प्रश्नाला हात घालतोय किंवा एखादी समस्या मांडतोय असा कणभरही आव आणलेला नाही. विनोदाच्या वातावरणात, सर्व व्यक्तिरेखांमधला निरागसपणा जपत, विनोदाची कारंजी उडवत लेखक दातार येथे मानवी आयुष्यातील अनेक प्रश्नांना इतक्‍या चपखलपणे हात घालतात, की नाटक संपताना प्रेक्षक आपण विनोदी कलाकृती पाहिल्याचा आनंद तर मिळवतोच, पण त्याच वेळी आपल्या आयुष्यातील काही घटनांकडे नकळतपणे परीक्षकाच्या नजरेतून पाहायला लागतो. 

मानसी गंभीरच्या भूमिकेत पल्लवी पाटील यांनी चतुरस्र कामगिरी केली आहे, इतके सांगितले म्हणजे त्यांच्या कामाचा अंदाज येईल. एका खासगी वाहिनीवरील ‘बाप माणूस’ या मालिकेतील त्यांची जी भूमिका होती, त्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध अशी ही संसारी स्त्रीची भूमिका साकारताना पल्लवी पाटील यांना मोठा कॅनव्हॉस मिळाला. या कॅनव्हॉसवर आपल्या अभिनय क्षमतेचे रंग भरून त्यांनी ही मानसी कोणालाही आवडेल अशी साकारली आहे. एक-दोन प्रसंगांमध्ये कारण नसताना आक्रमक होऊन त्या भूमिकेच्या बाहेर पडतात, मात्र असे किरकोळ अपवाद वगळता मानसीचा मूड त्यांनी इतका व्यवस्थित पकडला आहे की त्यांची आणि सौरभ गंभीर या पात्रातील केमिस्ट्री अफलातून झाली आहे. संपूर्ण नाटक पेलून नेऊ शकेल इतकी क्षमता माझ्या अभिनयात आहे, हे त्या दाखवून देतात.

आजची नाट्यसृष्टी आणि २५ वर्षांपूर्वीची नाट्यसृष्टी यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. आता छोट्या-छोट्या भूमिकेतील कलावंतदेखील आपल्यातील चांगले काय आहे, ते ओळखून रंगमंचावर ते सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. या नाटकात त्याची प्रचिती येते. आई-बाबा, प्राची आणि नीरज या चार व्यक्तिरेखा नाटकात तशा छोट्या आहेत. नायक-नायिकेला पूरक अशा या व्यक्तिरेखांना त्या अर्थाने कमी वाव आहे. त्यामुळे मिळालेली वाक्‍ये आणि हातात आलेला प्रसंग हा आपण शतकच ठोकणार आहोत, या क्षमतेने काम करणे आवश्‍यक असते. ते काम शुभा गोडबोले, प्रदीप जोशी, रसिका वाखारकर आणि आशिष दातीर चोखपणे पार पाडतात. त्यातही प्रदीप जोशी यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. पहिल्या अंकात बाबा या व्यक्तिरेखेला फारसा वाव नाही. मात्र, दुसऱ्या अंकात बाबांना जरा स्कोप मिळाला आहे. इथे मग प्रदीप जोशी धमाल करतात. आपल्याला किती क्षण मिळाले, याच्यापेक्षा मिळालेले क्षण १०० टक्के आपल्या हातात घेऊन आपण प्रेक्षकांच्या लक्षात कसे राहू, याची चोख कामगिरी ते पार पाडतात. प्रज्ञा गंभीर ही या नाटकातील पहिल्या अंकातील महत्त्वाची व्यक्तिरेखा अन्विता फलटणकर यांनी अत्यंत बहारदार पद्धतीने सादर केली आहे. मानसी आणि सौरभ यांच्या बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रज्ञा जे काही करते, ते विलोभनीय असे आहे. यातून विनोदनिर्मिती तर होतेच, पण ज्या ठिकाणी प्रज्ञा या व्यक्तिरेखेतील निरागसता दिसायला हवी आणि जिथे तिच्यातील मुरब्बीपणा दिसायला हवा, तो अन्विता फलटणकर चोखपणे सादर करतात. त्यांचा सहज वावर ती व्यक्तिरेखा फुलवतो त्याबरोबर ज्या ठिकाणी हशा हवा आहे तो बरोबर वसूलही करतो. या नाटकाचे संगीत, नेपथ्य, वेशभूषा आणि ध्वनी संयोजन अत्यंत नेमकेपणाने झाले आहे. गंभीर यांचे घर दाखवताना नेपथ्यकार अजय पुजारी यांनी आजची जी तरुण पिढी आहे, त्यांचा योग्य विचार केला आहे. पडदा उघडल्यानंतर दिसणारे घर दाद द्यावे असेच आहे.

खरंतर विनोदी ढंगाच्या या नाटकाने प्रेक्षक प्रसन्न आणि प्रफुल्लित होतो, यात शंका नाही. मात्र, विनोदी ढंगाचे हे नाटक सादर करताना नाटककाराने मानवी आयुष्यातील अनेक प्रश्नांना इतक्‍या सहजपणे हात घातला आहे, की आशयाची ही आतषबाजी पाहाताना प्रेक्षक चकित होत नाही किंवा गोंधळत नाही. याचं कारण लेखकाने संपूर्ण नाटक जरी विनोदी वळणाचं ठेवले असले तरी हा विनोद करता-करता मध्येच लेखक एक सणसणीत चिमटा काढतो, विनोदाच्या आवरणात हा चिमटा कळत नाही. पण नंतर ती बोच ठसठसत राहाते. संपूर्ण नाटक प्रेक्षक मिष्कीलपणे कधी जोराने हसून नाटकाची मजा घेत आपली करमणूक नक्की करून घेतात; पण त्याच वेळी आपल्याच संसाराचे प्रतिबिंब आपल्या मनाच्या आरशात बघतात. 

आजची तरुण पिढी संसारात पडल्यानंतरदेखील एकमेकांवर संशय घेत असते, त्यासाठी एकमेकाचा मोबाईल चेक करणे, यासारखे दोष किंवा दोघे कितीही उच्चविद्याविभूषित असले, तरीही बायकोने आपल्यापेक्षा कुठल्याही बाबतीत मग तो पगार असो, पद असो किंवा बुद्धिमत्ता असो, कुठेही वरचढ ठरू नये, अशी पुरुषी भावना असते. हा मेल इगो संसारात अनेक समस्या निर्माण करतो. हे बायकांच्या बाबतीतही घडू शकते. अशा छोट्या-छोट्या बाबी लेखकाने येथे कथानकात बेमालूमपणे मिसळले आहेत. 

छान, विनोदी, मुड प्रसन्न करणारे शब्द ही या नाटकाची जितकी ताकद आहे तेवढीच या नाटकातील काही चपखल वाक्‍ये हसता-हसता तुम्हाला अंतर्मुख करतात, हे महत्त्वाचे. या नाटकातला विनोद फुलला आहे तो आशयाच्या समृद्ध खाणीमध्ये, हे नक्की. 

  • श्रेयनामावली : व्हाय सो गंभीर
  • अथर्व थिएटर आणि सादरकर्ते शैला संतोष काणेकर,
  • निर्माता : संतोष भरत काणेकर,
  • दिग्दर्शक : अमोल भोर, गिरीश दातार
  • कलावंत : आरोह वेलणकर, पल्लवी पाटील, अन्विता फलटणकर, अपूर्वा कुलकर्णी, प्रदीप जोशी, रसिका वाखारकर, आशिष दातीर.

संबंधित बातम्या