शब्दांच्या व्यथांचा वेध 

ऋता बावडेकर
सोमवार, 2 मार्च 2020

नाटक
 

शब्द जिवंत असतात? म्हणजे त्यांना सुख, दुःख अशा भावनाही असणार. त्यांना भले-बुरेही कळत असणार.. रोजनिशी लिहितात, म्हणजे हे सगळे असणारच! पण ते व्यक्त करण्यासाठी त्यांना माध्यम लागत असणार. ते माध्यम म्हणजे अर्थातच माणूस! या शब्दांच्या भावना त्याच्यामार्फतच तर व्यक्त होत असतात. पण हे माध्यम किती विश्‍वासार्ह आहे? कारण या माध्यमाद्वारे सगळे शब्द सगळ्यांपर्यंत पोचतात का? की त्या प्रक्रियेत काही लुप्त होतात. अनेकदा तर ही प्रक्रिया इतकी वेगवान असते, की बघता बघता एखादी भाषाच संपूर्णपणे नष्ट होते. त्याचा दोष कोणाचा? पण अशा प्रकारे लुप्त होण्याची प्रक्रिया सुरू असताना, भाषा नव्हे पण काही नवीन शब्द नक्कीच निर्माण होत असतात. त्यानुसार काही शब्द नष्ट होणे आणि काही नवीन शब्द निर्माण होणे, ही प्रक्रिया सकारात्मकच म्हणायला हवी. मग एखादी भाषा लुप्त झाली, तर आपल्याला इतके वाईट का वाटावे? कारण त्याबरोबर एक संस्कृतीच नष्ट होत असते.. आणि त्याला कळत-नकळत आपण माणसेच जबाबदार असतो... 

‘नाटकघर’ची (पुणे) निर्मिती असलेल्या ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकाचा हा साधारण सारांश आहे. जेमतेम दीड तासाच्या या नाटकांत प्रचंड गुंतागुंत असलेला हा विषय मांडलेला आहे. साधारण यंत्रयुगातील वाटावी अशी गूढ सुरुवात - जिथे नेमके शब्द शोधायलाही अडचण होते आहे, त्या दोघांची भेट नेमकी कशासाठी याबाबतही गूढ, हळूहळू दोघांत प्रेम फुलते आहे असे वाटत असतानाच भाषा, त्यातील शब्द हरवत आहेत याबद्दल त्यांनी व्यक्त केलेली चिंता, भाषा - बोलीभाषा लुप्त का होत आहेत? त्याबद्दल काही राजकारण होते आहे का? त्यामागे कोणाचे सुप्त हेतू आहेत का? अशी चर्चा त्यांच्यात सुरू होते. मात्र या सगळ्याबाबत एकच एक ठोस निष्कर्ष काढायचे हा प्रयोग टाळतो. त्याऐवजी प्रेक्षकांच्या मनात अनेक शक्‍यता निर्माण करायला भाग पाडतो. हे लेखक म्हणून रामू रामनाथन यांचे जितके श्रेय; तितकेच किंबहुना थोडे अधिक श्रेय दिग्दर्शक म्हणून अतुल पेठे यांचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

एखाद्या (खरे तर अनेक) गोष्टीला एकच एक उत्तर असूच शकत नाही. अनेक शक्‍यता असतात, त्या सगळ्या पडताळून बघायच्या असतात. त्यातून कधीतरी आपण त्या एखाद्या शक्‍यतेपर्यंत पोचू शकतो. तरीही ती एकमेव शक्‍यता नसतेच, कारण तोपर्यंत दुसरी एखादी शक्‍यता पुढे आलेली असते. मात्र ही प्रक्रिया खूप रंगतदार असते. आपल्या मनातील शक्‍यतेपेक्षा खूप वेगवेगळ्या शक्‍यतांची या दरम्यान ओळख होऊ शकते. ‘शब्दांची रोजनिशी’ हा आनंद देते. 

आताही मी व्यक्त केलेली शक्‍यता कदाचित लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित नसेलच; पण मला हा प्रयोग सध्या असा भावला आहे. यात अनेक मत-मतांतरे असू शकतील-असतील, तीच तर या प्रयोगाची गंमत आहे. कारण १+१=२ असा हा प्रयोग नाहीच, इथे १+१ ची उत्तरे कितीही येऊ शकतात. यालाच बौद्धिक करमणूक म्हणतात, जिची आज फारच वानवा आहे.. 

तर या नाटकाचे मूळ लेखक रामू रामनाथन असून अनुवाद अमर देवगांवकर यांनी केला आहे. केतकी थत्ते आणि अतुल पेठे यांच्या यात भूमिका आहेत. दोन्ही व्यक्तिरेखांचे प्रयोगातील महत्त्व सारखेच असले, तरी केतकी थत्ते यांचा विशेष उल्लेख करायला हवा. या भूमिकेत त्यांनी अक्षरशः कमाल केली आहे. त्यांचा अभिनय, संवादफेक, त्यांचे गायन सगळेच दाद देण्यासारखे आहे. 

अशा प्रयोगांना प्रेक्षकांनी दाद द्यायला हवी. कारण इथे रेडीमेड उत्तरे नाहीत. ती शोधण्याचे किंवा विचार करण्याचे काम प्रेक्षकांवरच सोपवण्यात आले आहे. अशीही करमणूक असू शकते, हे या नाटकाने दाखवून दिले आहे. आता त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी आपली.. प्रेक्षकांची आहे. कारण शब्द, भाषा.. हा विषय आपला आहे. आज ना उद्या याबद्दलचे प्रखर वास्तव आपल्यालाच येऊन भिडणार आहे.

संबंधित बातम्या