शिस्त, निष्ठा व एक वेदना...

विनायक लिमये
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नवे नाटक
 

मराठी नाटक दिवसेंदिवस वेगवेगळे विषय हाताळत आहे. मग ते संगीत रंगभूमीवरील असोत की पद्य प्रवाहातले असोत. नुकतंच रंगमंचावर दाखल झालेलं ‘ऑपरेशन जटायू’ हे नाटक केवळ लष्करी पार्श्वभूमीवरचं नसून, लष्करातील एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित आहे. मेजर संघर्ष गायकवाड हा एका रात्री कॅप्टन केशव वाघ आणि मेजर तेजपाल भास्कर या दोघांवर गोळीबार करून त्यांना तो ठार मारतो, या घटनेची चौकशी करण्यासाठी लष्करातील नियमानुसार संघर्ष गायकवाडचे ‘कोर्ट मार्शल’ सुरू होते. मेजर संघर्ष गायकवाडने आपला गुन्हा कबूल केलेला असल्याने या खटल्याचा निकाल काय लागणार, याबद्दल फारशी उत्सुकता कोणाला नसते. पण मेजर क्रांती सुर्वे हे संघर्ष गायकवाडची केस हातात घेतात आणि खरे नाट्य सुरू होते. 

आपल्याकडे आजपर्यंत लष्कर किंवा सैन्य दलातील कुठल्याही विभागाचा उल्लेख आला, की तमाम भारतीयांची छाती अभिमानाने उंचावते, उर भरून येतो. आपल्याकडची नाटके किंवा चित्रपट किंवा अन्य कलाकृती या भारतीय लष्कराच्या शौर्यकथा आणि युद्धातील अनुभवांचे चित्रण करताना याच भावनेतून आपली कलाकृती सादर करत असतात, ते स्वाभाविकही आहे. ‘ऑपरेशन जटायू ’ मात्र यापलीकडे जाऊन लष्करात घडणाऱ्या एका वेगळ्याच घटनेचे रूप दाखविते. ‘ऑपरेशन जटायू’ या नाटकात जी समस्या मांडली आहे, तीचे स्वरूप वेगळे आहे. भ्रष्टाचाराचा राक्षस भारतीय समाजात सध्या खोलवर पसरत चालला आहे. त्याची लागण लष्करातही अपवादात्मकरीत्या का होईना होत असल्याची जाणीव या नाटकातून करून देण्यात आली आहे. 

नाटकाचे लेखक दिग्पाल लांजेकर आणि नितीन वाघ यांनी नाट्यप्रयोगाला सुरूवात होण्यापूर्वीच ही काल्पनिक कथा असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय लष्कराबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून लेखकद्वय या कलाकृतीत एका चुकीच्या घटनेबद्दलचे नाट्य उभे करताना त्यामागची जी वेदना आहे, ती वेदना या नाटकातून म्हणजे मेजर सुर्वे या पात्राच्या माध्यमातून व्यक्त करतात. कॅप्टन वाघ याला एका प्रसंगात सुनावताना मेजर सुर्वे असं म्हणतात, की ‘भारतीय लष्कर माझा प्राण आहे, माझा अभिमान आहे. त्याला धक्का लागेल, असं वर्तन मग ते कुणाचही असलं तरी मी ते खपवून घेणार नाही, त्यांना शिक्षा देईन. सुर्वे यांचा ठाम दृष्टीकोन त्या भूमिकेचा आणि नाटकाचा आत्मा आहे. ‘कोर्ट मार्शल’चा ‘कोर्टरूम ड्रामा’ आणि छावणीमधील चार प्रसंग याभोवती हे संपूर्ण नाटक फिरते. पण त्यातून अनेक प्रश्नांना लेखकांनी हात घातला आहे. 

कॅप्टन वाघ, मेजर तेजपाल हे अत्यंत हुशार असे अधिकारी, त्यांचे कौशल्य हे एका बाजूला, त्याच वेळी संघर्ष गायकवाडचा तडफदारपणा, गुणवत्तापूर्ण अशा संघर्षची होणारी घुसमट, हे सगळे लेखकांनी अत्यंत अचूकपणे आणि कोणाचाही अपमान होणार नाही, अशा पद्धतीने मांडले आहे. लष्करी शिस्त, निष्ठा, मानवी स्वभाव, जीवनातील वास्तविक परिस्थिती या सगळ्यांतून होणारी एक वेगळी गुंतागुंत, अत्यंत हुशार आणि विद्वान माणसांच्या मनातील काळी बाजू अर्थात त्यांच्यातील ही ‘ग्रे शेड’ लेखकद्वयीने ज्या पद्धतीने मांडली आहे, त्यामुळे प्रेक्षक नाटक बघताना एका वेगळ्याच विश्वात जातो. या नाटकातील प्रमुख भूमिका अर्थात मेजर सुर्वे यांची असली, तरी ती एकसुरी किंवा ‘लार्जर दॅन लाईफ’ अशा स्वरूपाची नाही. अमिताभपटांमध्ये अमिताभ केंद्रस्थानी आणि बाकीच्या भूमिका त्याला पूरक अशा, अशी या भूमिकेची अवस्था नाही. ब्रिगेडियर अभयसिंग यांच्या नेतृत्वाखालचे अन्य दोन न्यायाधीश आणि सरकारी पक्षाची बाजू मांडणारे वकिल हेही तोलामोलाच्या भूमिकेत इथे वावरतात. मात्र, ज्या पोटतिडकीने मेजर सुर्वे आपली बाजू मांडतात, तसेच संघर्षची बाजू मांडताना त्यांचा जो आवेश आहे, तो वेगळ्याच ढंगात लेखकाने उभा केला आहे. संघर्षची बाजू मांडणारी ही व्यक्तिरेखा एकसुरी किंवा लष्करातील अत्यंत करडा ऑफिसर अशी एक साचा पद्धतीची नाही. लेखकाने या व्यक्तिरेखेला अनेक पैलू दिले आहेत. अजय पुरकर यांनी ही व्यक्तिरेखा उभी करताना त्यातल्या बारीक कंगोऱ्यांसह ती उभी केली आहे. त्यामुळे नाटकभर ते प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. पुरकर यांना या भूमिकेसाठी प्रेक्षकांची मोठी दाद मिळते, यात शंका नाही. 

सत्याचा विजय व्हावा, असत्य पराभूत व्हावे, या मानवी भावनांचे प्रगटीकरण त्यांच्या माध्यमातून नाटकात होते. प्रेक्षक त्यांच्याशी आपले भावबंध जोडतो. ज्या बुद्धिचातुर्याच्या बळावर पुरकर विजय मिळवितात, तो विजय प्रेक्षकांना आपलाच वाटतो. हे लेखकांचे जेवढे काम आहे, तेवढेच काम हे प्रेक्षकांच्या हृदयात पोचविण्याचे अवघड आव्हान पुरकर सहजपणे पेलतात आणि शतक ठोकून जातात.

संघर्षच्या भूमिकेतील लक्ष्मीकांत संझगिरी, तसेच ब्रिगेडियर अभय सिंग यांची भूमिका करणारे सुनिल जाधव आणि सरकारी वकिलाची म्हणजे मेजर कपिल भारद्वाज ही व्यक्तिरेखा साकारणारे संकेत ओक या तिघांचीही कामे तितकीच छान वठलेली आहेत. दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांनी संपूर्ण प्रयोग एका संयत शैलीत, पण तरीही अत्यंत परिणामकारक अशा पद्धतीने बांधलेला आहे. लष्करी शिस्त आणि प्रत्येकाची कामावरची निष्ठा दाखविताना हे नाटक रूक्ष होणार नाही किंवा प्रचारकी होणार नाही किंवा नाटकाच्या मुख्य विषयाची भेदकता मांडताना त्यातील नकारात्मकता वरचढ ठरणार नाही, याची दक्षता लेखनात जशी घेतली गेली आहे, तशीच ती दिग्दर्शनातही काटेकोरपणे घेतल्याचे जाणवते. 

तीन न्यायाधीश असलेले हे कोर्ट या नाटकातील एक मोठे पात्रच आहे. ब्रिगेडियर अभय सिंग यांच्या भूमिकेत सुनील जाधव यांनी मुख्य न्यायाधीशांची भूमिका करताना, त्या पदाची शान आणि मान राखून चांगले रंग भरले आहेत. त्यांना संजय महाडिक यांनी जज्ज कर्नल साळुंखे या व्यक्तिरेखेतून, तसेच सुधीर श्रीधर यांनी जज्ज जगदाळे या दुसऱ्या व्यक्तिरेखेतून भरीव साथ दिली आहे. मेजर क्रांती सुर्वे जेव्हा कॅप्टन केशव वाघ आणि मेजर डॉ. गाडगीळ, तसेच नाईक हिंमत शेळके यांच्या उलटतपासणीतून सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा एखादी सिस्टीम ही निरपराध माणसाचा कसा बळी घेऊ शकते, ते कळते. त्याचबरोबर या सिस्टीम मधल्या काही लोकांनी जर नियमांकडे दुर्लक्ष केले, तर त्याचा फायदा चाणाक्ष लोक आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी कसा घेतात, यावरही प्रकाश पडतो. ‘ऑपरेशन जटायू’मध्ये सिस्टीमल्या अनेक त्रुटीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकद्वयीने केला आहे. हा प्रयत्न भेदक होण्याचे काम दिग्दर्शक आणि कलाकारांच्या संपूर्ण टीमने समजून घेऊन केला आहे. नेपथ्य आणि वेशभूषा या दोन्ही गोष्टींनाही या नाटकात १०० पैकी १०० मार्क द्यावे लागतील. तीच बाब संगीत आणि प्रकाश योजनेबद्दल सांगता येईल. संगीताचा सुयोग्य वापर दिग्दर्शकाने केला आहे. लष्करी अवकाशातील हे नाटक उभे करताना संगीताचा उपयोग करणे हे अवघड काम होते. पण लांजेकर यांनी ते व्यवस्थितरीत्या पेलले आहे. त्रुटीच काढायची तर ‘कोर्ट मार्शल’ सुरू असताना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलाविल्या जाणाऱ्या व्यक्तिचे नाव पुकारल्यावर ती व्यक्ती न्यायाधीशांसमोर लष्करी शिस्तीत येते, त्या वेळी पार्श्वभागी जे संगीत दिले आहे ते अनाठायी वाटते. आरोपींना बोलाविणे आणि त्यांनी येणे हे संगीताशिवाय झाले, तर नाट्य अवकाशात पोकळी निर्माण होईल व त्या हालचालींमध्ये रटाळपणा येऊ शकतो, अशी शंका आल्याने दिग्दर्शकाने येथे संगीताचा वापर केला आहे. पण तो प्रेक्षकांचे लक्ष काही अंशी विचलित करणारा ठरतो. 

कुठल्याही भूमिकेतील नटाला त्या भूमिकेच्या परिघातून बाहेर पडू न देता, त्याच्यातील चांगले गुण बाहेर काढून त्याचा अभिनय उत्तम कसा होईल, त्याचबरोबर नाटकाचा एकत्रित परिणाम प्रेक्षकांपर्यंत पोचविताना तो कोठेही सपक होणार नाही, याची पुरेपूर दक्षता लांजेकर यांनी घेतली आहे. अजय पुरकरांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्याला ‘क्रांती सुर्वे’ या बहुआयामी भूमिकेत वावरू देताना, मेजर सुर्वे हे ‘स्टाइलबाज ’ होणार नाहीत किंवा विक्षिप्तदेखील वाटणार नाहीत, याची दक्षता लांजेकर घेतात. पुरकर यांनी लेखनातील न लिहिलेल्या छटा आणि दिग्दर्शकाच्या मनात असलेले हे पात्र इतक्‍या उत्तम पद्धतीने साकारले आहे की, प्रेक्षक नकळतपणे सुर्वे या व्यक्तिरेखेतला थोडाफार हटके वागण्याचा प्रकार समजून घेतो. 

दिनेश पेडणेकर आणि सुजाता मराठे या दोन निर्मात्यांनी वेगळ्या विषयावरचे हे नाटक सादर करताना जो धोका पत्करला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. विनोदाच्या हमखास यशस्वी आणि आर्थिक गणिताचे सूत्र सांभाळणाऱ्या वाटेकडे न जाता, वेगळ्या विषयाला त्यांनी हात घातला आहे, त्याला आता प्रेक्षकांची साथ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. चित्रपट किंवा नाटक सादर करताना लष्कर किंवा संरक्षण दलासंबंधीच्या कुठल्याही घटनेसंदर्भात बऱ्याच वेळा निव्वळ भाबडेपणा, नाहीतर टोकाचा भडकपणा आढळतो. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचे झाले, तर काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘शौर्य’ या चित्रपटात संयमितपणे एका नकारात्मक बाजूवर प्रकाश टाकताना लष्कराची कुठेही मानखंडना न करता, लष्करी गणवेशातील एखाद्या अधिकाऱ्यातील अपप्रवृत्तीमुळे काय नुकसान घडते, त्याचा आलेख मांडलेला होता. मराठी रंगभूमीवर असे प्रयोग क्वचित होतात. ‘ऑपरेशन जटायू’मध्ये हे साधले गेले आहे. हे करतानाच या संचात कोणीही स्त्री कलाकार नाही, व्यवसायाची गणिते सांभाळण्यासाठी, तसेच ओढून-ताणून स्त्री कलाकार हवीच, अशी भूमिका न घेता निर्मात्यांनी हाही एक प्रयोग केलाय, याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे.   

श्रेयनामावली :
‘ऑपरेशन जटायू’  
अनामिका, अंबिका निर्मित, साईसाक्षी प्रकाशित
निर्माता : दिनेश पेडणेकर आणि सुजाता मराठे.
लेखक : दिग्पाल लांजेकर, नितीन वाघ. दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर.
नेपथ्य : संदेश बेंद्रे, संगीत : देवदत्त बाजी, प्रकाश योजना : तेजस देवधर, वेशभूषा : पौर्णिमा ओक.
कलावंत : अजय पुरकर, लक्ष्मीकांत संझगिरी, सुनील जाधव, श्रीकांत प्रभाकर, संकेत ओक, किरण शेवाळे, राजू बावडेकर, अमित जांभेकर, संजय महाडिक, सुधीर श्रीधर, शुभम बेलसरे, जयदीप ठाकरे.

संबंधित बातम्या