दर्जेदार आशय आणि अभिनय

विनायक लिमये
सोमवार, 18 मार्च 2019

नवे नाटक
 

यश पटवर्धन आणि मिताली सहस्रबुद्धे या दोघांचा सुखाचा संसार सुरू असतो. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी यशला ऑफिसमध्ये सुखी संसाराबद्दलचं एक प्रेझेंटेशन सादर करायचं असतं. या सादरीकरणात मितालीची त्याला मदत होत असते. हे सादरीकरण करताना मितालीच्या ऑफिसमधील राजदीप या तिच्या सहकाऱ्यावरून दोघांमध्ये किरकोळ चर्चा होते. राजदीप यशला मुळीच आवडत नसतो. मितालीकडून त्याची काळजी घेणं त्याला मुळीच मान्य नसतं. यश कामावर जातो. रात्री वाढदिवस म्हणून लवकर परत येतो. परत आल्यानंतर दिवसभरातील घडामोडींविषयी त्यांच्यात चर्चा होते. वाढदिवसाला एकमेकाला गिफ्ट काय द्यायचं यावरही दोघं बोलत असतात. आणि विषय नको त्या मुद्द्यावर जातो आणि सारं सारं काही बिनसतं. ती रात्र दोघांच्या आतोनात भांडणात जाते, इतकी ती दुसऱ्या दिवशी दोघंही वेगळं होतायंत का? अशी वेळ येते. राजदीपबद्दल तिला काहीतरी सांगायचं असतं. जे तिनं आजपर्यंत टाळलेलं असतं. मिताली त्याला काय सांगते, त्याच्यावर यशची प्रतिक्रिया काय आहे, हे सारं कळण्यासाठी नाटकच बघणं जास्त आनंददायी आणि महत्त्वाचं आहे.

ही कथा आहे हेमंत एदलाबादकर लिखित आणि श्री चिंतामणी म्हणजेच लता नार्वेकर यांनी निर्मिती केलेल्या ‘तिला काही सांगायचंय!’ या नाटकाची. नाटकात मिताली आणि यश ही नव्या जमान्यातली जोडी. संपूर्ण नाटकात केवळ हे दोघंच आहेत, पण त्यांच्या बोलण्यात सतत ज्याचा उल्लेख होतो, तो राजदीप संपूर्ण नाटकभर प्रेक्षकांच्या समोर एकदाही येत नाही. पण नाटकभर वावरतो. हे तिसरं पात्र दिसत नाही, पण प्रेक्षकांचं मन व्यापून राहतं आणि कथानकाचाही महत्त्वाचा भाग ठरतं.

श्री चिंतामणी या नाट्यसंस्थेने स्त्रियांच्या अस्मितेची, त्यांच्याबद्दल काहीतरी भाष्य करणारी अशी नाटकं आजपर्यंत सादर केली आहेत. ‘तिला काही सांगायचंय’, हे नाटक ही परंपरा कायम राखतं, त्याहीपेक्षा एकूणच संसारात नवऱ्यानं कसं वागायला हवं, हेही जाता जाता अत्यंत समर्पकपणे सांगून जातं. तिला काही सांगायचंय? या शीर्षकावरून हे नाटक स्त्रीवादाची मांडणी करणारं किंवा स्त्रियांचे प्रश्न मांडणारं अथवा स्त्रियांचा लढा सांगणारं असं तिचं आणि तिचं म्हणजेच बंडखोरी करणारं नाटक असेल, असं कुणालाही वाटेल. पण ते अर्ध सत्य आहे. हे नाटक एकाच वेळी स्त्री अस्मिता आणि संशयातून नात्यात होणारा गुंता याला हात घालतं; पण ते घालत असताना अनेक प्रश्नांना भिडतं.

मिताली ही खरंतर अत्यंत आधुनिक विचाराची. तिचा पेहरावदेखील वेगळा, प्रसंगी भडक वाटेल अशा तोकड्या कपड्यांचा. प्रथमदर्शनी हिला पाहिल्यानंतर कुणालाही ही मुलगी उथळ वाटेल, अशा धर्तीचा. पण माणसाचा पेहराव महत्त्वाचा नाही. त्याचं मन आणि त्याची वागण्याची पद्धत महत्त्वाची असते. पेहरावावरून एखाद्या माणसाला जोखणं किती चुकीचं आहे, हे मितालीची व्यक्तिरेखा स्पष्ट करते. अत्यंत स्वतंत्र विचाराची, आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वयंसेवी संस्थेत काम करणारी, परफेक्‍शचा आग्रह धरणारी अशी ही मिताली, एका बाजूला आक्रमक असली तरी तिलाही तिचा संसार तितकाच महत्त्वाचा वाटत असतो. यशवर तिचं नितांत प्रेम असतं. यशच्या मतांचा आदर करताना प्रसंगी तो दुखावला जाऊ नये यासाठी रोजच्या आयुष्यात यशच्या समोर ती राजदीपचं नाव घ्यायचंही टाळते. राजदीपच्या उल्लेखानं तो अस्वस्थ होतो हे लक्षात आल्यावर ती राजदीपला घरी फोन पण करू नको असं सांगते. यामागे नवऱ्याला शरण जाणं किंवा केवळ पतीचा शब्द अंतिम अशा काही दशकांपूर्वीच्या स्त्रीची व्यक्तिरेखा तिला मान्य नाही पण प्रेमानं ज्याला जोडीदार म्हणून स्वीकारलं, किंवा ज्याला आपलं मानलं त्याला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारलं, त्याचा मान राखूया मग त्यासाठी दोन पावलं मागं यावं लागलं तरी चालेल या विचारसरणीची ही मिताली आहे. याउलट यश. त्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत वरच्या पदावर म्हणजे अगदी मॅनेजर वगैरे असला आणि व्यवस्थापनातले सगळे फंडे वापरून तो अनेक प्रॉब्लेम्स लीलया सोडवत असला तरीसुद्धा संसारात म्हणजेच नात्यांच्या सागरात तो हे व्यवस्थापनातले फंडे लावायला जातो, आणि तिथंच सगळ्या चुका करून ठेवतो.

हे नाटक जेवढं स्त्रीवादी आहे, त्याहीपेक्षा संशयानं आणि आपल्या जोडीदाराबद्दलच्या पझेसिव्हपणातून किती प्रॉब्लेम होऊ शकतात, याचा आलेख म्हणजे हे सारं नाट्य आहे. मात्र हे करत असताना एदलाबादकरांनी आजची चंगळवादी संस्कृती, त्याचबरोबर कॉर्पोरेट जगतातील कामाचा ताण, मनुष्याला तिथं नसलेली किंमत, मानवी भावभावनांपेक्षा भौतिक गोष्टींना दिलं गेलेलं प्राधान्य, यावर लखलखता प्रकाशझोत टाकला आहे. मितालीच्या आईची व्यथा जेव्हा यशला सांगते, ती व्यथा म्हणजे संपूर्णपणे वेगळं नाटक व्हावं, इतकी मोठी आणि तितक्‍या ताकदीची आहे. मात्र एदलाबादकर इथं ती सारी पार्श्वभूमी मिताली कशी घडली असेल, यासाठी वापरतात. प्रेक्षकांवर ते बऱ्याच गोष्टी सोडतात.

एखाद्या गोष्टीवर आपण इतके ठाम असतो की अमिताभचा चित्रपट म्हणजे ॲक्‍शनपट, राजेश खन्नाचा चित्रपट म्हणजे प्रेमपट त्याचप्रमाणं कानिटकरांची नाटके म्हणजे पल्लेदार भाषा आणि ऐतिहासिक वळणाची. त्याचबरोबर कालेलकर किंवा कोल्हटकर यांची नाटकं म्हणजे ताई-बहीण-आई-भाऊ अशा कौटुंबिक धर्तीची. असे शिक्के आपण त्या लेखकावर किंवा अभिनेत्यावर मारत असतो. पठडीबद्ध कलाकृती असू नये असं आपण म्हणत असतो, पण काही वेळा आपणच पठडीबद्ध विचार करतो हे विसरून जातो. हेमंत एदलाबादकरांच्या आजवरच्या नाटकांपेक्षा अत्यंत वेगळं, आशयाच्या दृष्टीने अत्यंत टोकदार, मनाला स्वस्थ करणारे आणि त्याचबरोबर कलाकृतीतून मनोरंजनाचा हेतू पूर्ण करतानाच विचारप्रवृत्त करायला भाग पडणारं असं हं नाटक आहे.

एदलाबादकर यांनीच या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक वेगळा असेल तर लेखनातल्या काही त्रुटी दिग्दर्शक आपल्या कामगिरीने दूर करतो. इथे ती शक्‍यता नाही मात्र लेखकच स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे लेखनात न मांडलेल्या गोष्टी पात्रांच्या अभिनयातून व्यक्त करण्यात, दिग्दर्शक यशस्वी होतो. कुठल्याही गिमिक्‍सचा वापर न करता साध्या सरळ पद्धतीनं पण रंगमंचाचा पुरेपूर वापर करत कलाकारांची क्षमता जास्तीत जास्त पद्धतीनं बाहेर येतील, पण तो कलाकार त्याचवेळी लाऊडही कसा होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत एदलाबादकर हा सगळा डोलारा अत्यंत व्यवस्थितपणे उभा करतात. मितालीच्या व्यक्तिरेखेतले अनेक पदर, तिचा आक्रमकपणा, तिच्या पूर्वायुष्यातील वेदना, तिच्या आईच्या सोसाव्या लागणाऱ्या गोष्टी, त्यातलं कारुण्य हे प्रभावीपणे ते मांडतात. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून एदलाबादकर अत्यंत चोख कामगिरी करतात.

लेखक आणि दिग्दर्शकाला समर्थ साथ मिळाली आहे, ती मितालीची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधान आणि यश पटवर्धनची भूमिका करणाऱ्या आस्ताद काळे यांची. या दोघांनीही या नाटकात आपल्या अभिनयानं जी कमाल केली आहे, ती खरोखर ज्यांना चांगलं नाटक बघायचं आहे, त्यांच्यासाठी मेजवानी आहे. या दोघांनी आत्तापर्यंत मालिका आणि चित्रपटांमध्ये ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा या नाटकातील भूमिका सर्वस्वी वेगळ्या आणि खूप काही सांगू पाहणाऱ्या अशा व्यक्तिरेखा आहेत. यश पटवर्धनची भूमिका ही दुहेरी आहे. एकाच वेळी मल्टिनॅशनल पदावरचा उच्च पदावरचा अधिकारी मग तो त्याच्या पदाने, पैशाने आणि अधिकाराने खुशालचेंडू अहंकारी, अशा स्वरूपाचा होईल, अशा गटातली एक बाजू आणि त्याचवेळी मितालीवर प्रचंड प्रेम असलेला आणि तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू न शकणारा भाववेडा पती ही दुसरी बाजू. एकाच व्यक्तिरेखेतले हे दोन पैलू वठवणं अवघड होतं. कोणत्याही क्षणी थोडी जरी गफलत झाली, तर प्रेक्षकांच्या मनातून यश पटवर्धन उतरेल अशा निसरड्या जागा प्रचंड असतानाही आस्ताद काळे यांनी ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी केली आहे, मितालीवरचं त्याचं ओरडणं, त्याची अधिकार गाजविण्याची वृत्ती यामुळे काहीवेळा त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना संताप निर्माण करणारी ठरते पण मितालीवर असलेलं त्याचं प्रेम त्याच्या देहबोलीतून तो ज्या पद्धतीनं व्यक्त करतो, म्हणजे त्यातला साधेपणा, भाबडेपणा आपल्या अभिनयातून तो प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणानं पोचवतो. हीच गोष्ट मितालीची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानची. आईच्या आठवणीनं ती आतून जी हलते, त्यातलं दुःख, कुठलाही आकांत किंवा मेलोड्रामा न करता यशपर्यंत जेवढं पोचवते त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांपर्यंत थेटपणे पोचवते. संपूर्ण नाटकात ती ज्या तोकड्या कपड्यात वावरते आणि ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करते, त्या वर्गातली मुलगी उथळ किंवा वागण्यात कसलाही ताळतंत्र नसलेली अशी वाटू शकण्याची शक्‍यता अनेक ठिकाणी असताना स्वतंत्र, पण नवऱ्यासाठी जीव टाकणारी,  बायको होऊनही जिच्यातली प्रेयसी संपलेली नाही, अशी स्त्री, तेजश्री खूप ताकदीनं साकार करते. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी संपूर्ण नाटकभर वेगवेगळ्या प्रसंगात दिसते. पण ही जुगलबंदी तुझ्या कामापेक्षा माझं काम कसं चांगलं होईल, यासाठी नसून तुझं-माझं काम जास्त कसं खुलेल अशा हेतूनं हे दोघंही आपल्या अभिनयाचे रंग उधळतात. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाचे नेपथ्य करताना चौथ्या मजल्यावरचा श्रीमंत कुटुंबातला फ्लॅट अशा प्रभावी रीतीने केला आहे, राहुल रानडे यांनी कथानकातील वेगवेगळे पैलू नेमकेपणानं कसे ठसतील यासाठी आपलं समर्पक संगीत दिलं आहे.

‘तिला काही सांगायचंय’ मधून लेखक-दिग्दर्शक आणि कलाकार खरंच काही सांगू पाहतायंत; पण दुर्दैवानं त्यांचं ऐकण्याइतका वेळ प्रेक्षकांकडे आहे का ? असं वाटावं असा आजचा भवताल आहे. एक चांगली कलाकृती बघण्याचं समाधान हे नाटक निश्‍चित देतं त्याचबरोबर मनात काही प्रश्न उभे करतं. ते प्रश्न संवेदना जागवत माणूसपणाच्या प्रवासाला जायला भाग पाडतात, हे नक्की ! कसदार आशय आणि अभिनयाच्या जुगलबंदीतून तीन तासांची नजरबंदी हमखास होतेच.  

संबंधित बातम्या