मनस्वी चित्रकर्ती

विनायक लिमये
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

नवे नाटक
 

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नाटक किंवा चित्रपट बनवणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते. कारण त्या व्यक्तीचा इतिहास माहीत असलेले लोक त्या कलाकृतीची तुलना आपल्याला ज्ञात असलेल्या त्या व्यक्तीच्या प्रतिमेशी करतात. मुळात कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य तीन तासांच्या मर्यादेत बसवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. मात्र अनेकजण असं धाडस करतात. मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचं धाडस यापूर्वी अनेकवेळा झालेलं आहे. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी नुकतंच ‘तुझी आम्री’ हे नाटक सादर केलं आहे. दोन अंकाच्या या नाटकाची मध्यवर्ती कल्पना दिवंगत महिला चित्रकार अमृता शेर-गील हिच्या आयुष्याचा वेध ही आहे. 

स्वातंत्र्यपूर्वकाळातील पंजाबमधील अत्यंत सधन अशा उमरावसिंह शेरगील आणि त्यांची पत्नी मेरी अँटोनी गोट्‌समन (या हंगेरियन होत्या) यांची मोठी मुलगी म्हणजे अमृता शेर- गील. अमृता शेर-गील हिचं शिक्षण पॅरिस आणि इटली अशा दोन देशांत झालं. अमृता चित्रकार झाली. नुसती झाली नाही तर पॅरिसमधल्या नामवंत समीक्षकांच्या पसंतीलाही तिच्या कलाकृती उतरल्या. तिच्या काही चित्रांना सुवर्णपदकही मिळाले होते. काही काळानंतर अमृता शेर-गील भारतात परतली. सिमला, गोरखपूर सराया तसंच केप कॉमरिन इथं काही काळ तिनं वास्तव्य केलं. त्यानंतर लाहोरमध्ये ती नवऱ्यासह राहात होती. किरकोळ आजाराचं निमित्त होऊन अमृतानं या जगाचा निरोप घेतला. अवघं २८ वर्षांचं आयुष्य (३० जानेवारी१९१३- निधन ५-६ डिसेंबर १९४१) लाभलेली अमृता शेरगील ही खऱ्या अर्थानं वेगळी अशी स्त्री होती. 

अमृता आणि तिची बहीण इंदिरा यांच्यातील संवाद आणि अमृतानं अनेकांना लिहिलेली पत्रं या दोन गोष्टींवर ‘तुझी आम्री’ हे नाटक उभं राहिलं. रमेशचंद्र पाटकर यांच्या ‘चित्रकार अमृता शेर-गील’ या पुस्तकावर आणि इंदिराचा मुलगा विवान सुंदरम्‌ यांनी अमृताच्या पत्राचे जे दोन खंड संपादित केले त्या दोन पुस्तकांवर आधारित या नाटकाची रंगसंहिता आहे. पाटक यांच्या पुस्तकातील पत्रांचं संपादन करून तसंच अमृता शेर-गील यांनी स्वतः लिहिलेल्या काही लेखांचा आधार घेऊन स्वत: शेखर नाईक यांनी या नाटकाची रंगावृत्ती तयार केली आहे. दिग्दर्शनही त्यांचंच आहे. ऋचा आपटे आणि अमृता पटवर्धन जोशी या दोघी इथं अमृता आणि इंदिरेची भूमिका साकारतात. ऋचा आपटे अत्यंत नेमकेपणानं अमृता शेरगीलचं व्यक्तिमत्त्व आपल्या अभिनयातून उभं करतात. अमृता पटवर्धन-जोशी इंदिरेच्या भूमिकेतून अमृताचा प्रवास आपल्यासमोर एकाच वेळी निवेदक आणि अमृताची बहीण अशा दोन भूमिकांतून पुढं नेतात.

मुळात इथं विविध प्रसंगांची लांबलचक मालिका नाही किंवा अमृता, इंदिरा यांचे आणि त्यांच्या आई-वडिलांबरोबरचे प्रसंग अथवा अमृता, तिचे पती, तिचे मित्र त्याचबरोबर तिच्या चित्रांचं समीक्षक यांच्याबरोबरचे प्रसंग येथे घडत नाहीत. अमृताच्या आयुष्यातील शेकडो घटना इथं पत्रांच्या माध्यमातून उलगडत जातात. अमृताची जीवनशैली त्या काळाच्या खूपच पुढची अशी होती. स्त्री पुरुषांमधले लैंगिक संबंध, इतकंच काय समलिंगी संबंध, लग्नाबद्दलच्या जबाबदाऱ्या तसंच राहणीमानासंबंधीचे समज-गैरसमज या सगळ्यांबाबत अमृताच्या समजुती आणि विचार अत्यंत पक्के होते. आईबरोबरच्या पत्ररूप संवादामध्ये ते अत्यंत स्पष्टपणे प्रगट होतात. लग्नाबद्दलची तिची आधुनिक मतं, परदेशात राहिल्यामुळं तिच्या स्वभावात आलेला मोकळेपणा, बंडखोर वृत्तीपेक्षा अमृतामध्ये असलेला मनस्वीपणा या नाटकात नेमकेपणानं प्रगट होतो. ऋचा आपटे आणि अमृता पटवर्धन या दोघींनी या दोन बहिणींची भूमिका समजून उमजून केली आहे. प्रवाहाविरुद्ध पोहणारी अमृता शेरगील इथं त्या ताकदीनं समोर येते. संपूर्ण नाटक या दोघींच्या संवादातून उलगडत जाते. खरं तर दिसताना या दोघी दिसतात, पण त्यांच्या बोलण्यात इतके संदर्भ येतात, की जसं काही आपण तो काळ बघत आहोत, असा भास होतो. त्याचं श्रेय त्या दोघींना जेवढं जातं तेवढंच श्रेय नेपथ्य, प्रकाश, वेशभूषा यांनाही जातं. विशेषत: अमृता आणि इंदिरा यांच्यातील संवादावेळी मागं स्लाईडद्वारे जी दृष्यं येतात किंवा अमृतानं काढलेली चित्रं मागं पडद्यावर दिसतात, त्यामुळं नाटक पुढं सरकतंच, पण त्या काळात आपल्याला नेतं. चपखलपणे वापरलेल्या स्लाईड, दिग्दर्शकाची चतुराई आणि नेपथ्यकाराची कुशलता येथे पटवून देतात. इथं जे नेपथ्य आहे ते या नाटकात एक भूमिका करतं आणि भाष्यही करतं. हिटलरचा संदर्भ आणि त्यावेळेला अमृता शेरगीलची मुक्ततेची भाषा चांगला परिणाम साधून जातात. 

अमृता शेर गील यांच्यावरती पाश्‍चात्य चित्रशैलीचा बराच प्रभाव होता, पण भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय चित्रशैलीचाही अंगीकार केला. चित्रकारांसाठीच्या आणि कलाविषक काम करणाऱ्या विविध सोसायट्या जे चित्रप्रदर्शनं भरवतात त्यामध्ये अमृता शेर गील यांच्या चित्रांचा समावेश त्या काळात झालेलाच होता, पण या सोसायट्यांना बिनदिक्कतपणे काही कडवे बोल सुनवायलाही अमृता शेर गील यांनी कमी केलं नाही. अमृता शेर-गील या मुक्त विचारांच्या तसेच स्वतःच्या मताला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या त्यांच्या भन्नाट आयुष्याचा वेध घेणे तसे अवघडच. अमृता शेर गील यांच्या चित्रकारकिर्दीवर आणि आयुष्यावर नाटक होऊ शकते, ही कल्पनाच भन्नाट! 

कारण आपल्याकडं मुळात चित्रकलेबद्दल असावी तेवढी जाणीव कमी आणि चित्रकारांबद्दल तसंच त्याच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यात अनेकवेळा उदासिनताच अधिक. त्यांच्याबद्दलचा फारसा तपशील उपलब्ध नसताना माहितीचे अन्य स्रोत आणि त्या काळातील काही गोष्टींचा आढावा घेऊन अमृता शेर गील यांचं आयुष्य उभं करणं अवघड होतं. हे अवघड काम लेखक आणि दिग्दर्शक शेखर नाईक यांनी नेमकेपणानं पेललं आहे. शेखर नाईक स्वत: चित्रकार असल्यामुळं अमृता शेर-गीलचा नेमका संघर्ष त्यांच्या चित्रकारितेचा प्रवास आणि त्यांच्या प्रतिभेची ताकद, त्याच्या कारकिर्दीचा प्रवास, त्याचबरोबर पॅरिस ही कलाकारांची पंढरी कशी आहे, ितथं कलाकारांचं शिक्षण कसं होतं, त्यातले ताणेबाणे हे माहीत असल्याने त्यांनी हा सारा काळ आणि कथानकाचा मोठा प्रपंच पत्रनाट्यातून उभा केला आहे. पत्राचं अभिवाचन न होता हे नाटक झाले आहे, त्याचे कारण दिग्दर्शक शेखर नाईक यांनी केलेली पात्ररचना. अमृता आणि इंदिरा या दोघींच्या संवादातून हे नाटक उभं राहतं. इंदिरा हे पात्र लेखक दिग्दर्शक शेखर नाईक यांनी नाटकासाठी घेतलेली लेखकीय स्वतंत्रता. त्या दोघी असेच संवाद करत किंवा किती काळ एकत्र होत्या याच्या तपशीलात न जाता त्यांनी दोघींची रचना करून इथं चांगलं नाट्य साधलं आहे. त्यामुळं इथं केवळ पत्राचं अभिवाचन असे स्वरूप राहत नाही. अमृताच्या पत्रातून खूप मोठा काळ आपल्यासमोर त्यातल्या बारकाव्यांनिशी उभा राहतो. एखादी डॉक्‍युमेंटरी व्हावी, असं सगळं हे प्रकरण आहे. मात्र, त्यातल्या कथानकाच्या मानवी आयुष्यातील भावभावनांच्या कल्लोळांचा सारा प्रवास शेखर नाईक इथं उभा करतात. त्यामुळं ही डॉक्‍युमेंटरी न होता हे नाटक होतं. ‘गुरू - गीता’ हा गुरुदत्ता आणि गीता दत्त यांच्यावरच्या गीतांचा अफलातून कार्यक्रम करणाऱ्या शेखर नाईक यांनी इथंही अमृता शेर गील हिचा जीवनपट मांडण्याची अशीच वेगळी वाट निवडली आहे. 

खरं तर पूर्णपणे प्रायोगिक स्वरूपाचं असं हे नाटक झालं असतं, पण चित्रपट, नाटक या माध्यमांचा यशस्वी वापर केलेल्या शेखर नाईक यांनी हे नाटक कुठंही जड होऊ दिलेलं नाही. काहीवेळा कंटाळा येण्यासारखे एखाद दोन क्षण येतात, पण तेवढेच. अमृता शेर-गीलचे आयुष्य समजून घेऊन तिच्या संबंधीचं लेखन वाचून गेल्यास हे नाटक मनाला जास्त भिडतं. अमृता शेर-गीलसारखी बंडखोर स्वभावाची चित्रकर्ती, की जी आपल्या चित्रांचेही कठोर मूल्यमापन करते. आपली काही चित्रं वाईट आहेत, असं स्वत:च सांगते. अशी तर्कशुद्ध प्रसंगी तर्ककठोर वाटेल अशी ही चित्रकर्ती आपल्या आयुष्यातील कुठले ही रंग हरवू देत नाही. मिळालेलं आयुष्य केवळ निरीक्षण आणि चित्रांमधून त्याचं प्रगटन कसं करता येईल, याचा ध्यास घेतलेली ही चित्रकर्ती, एका शतकापूर्वी आपल्या मातीत होऊन गेली हे सांगितलं, तर विश्वास बसणार नाही. भारतीय मातीमध्ये असलेली विविधता आणि पाश्‍चात्य जगातला खुलेपणा, मुक्तपणा जिच्या आयुष्यात वेगळे रंग घेऊन आला ते रंग मनोहारी होते. त्या साऱ्या रंगांना मराठी रंगभूमी पकडते. हा जीवनरंग काही वेगळाच आहे. कलारंग आणि नाट्यरंगातला हा संगम आवर्जून पाहावा असा आहे. प्रत्येक वेळी मनोरंजन म्हणून नव्हे, तर अभ्यास म्हणूनही काही कलाकृती बघायच्या असतात. ‘तुझी आम्री’ हे नाटक आपल्या जाणीवा समृद्ध करतं. मनोरंजन करता करता एका वेगळ्या विश्वात नेतं. भारतीय आणि पाश्‍चात्य संस्कृतीचा संगम स्पष्ट करतं. हाच याचा मूळ रंग आहे, जो मनाला व बुद्धीला प्रसन्न करतो. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी अशा वेगळ्या विषयावरच्या निर्मितीचं धाडस केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित
‘तुझी आम्री’
संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन : शेखर नाईक  भूमिका : ऋचा आपटे आणि अमृता पटवर्धन 
संगीत : चैतन्य आडकर 
नेपथ्य : राज सांडभोर
प्रकाश : प्रफुल्ल दीक्षित 
वेशभूषा : आशिष देशपांडे
निर्मिती व्यवस्था : हर्षद राजपाठक सूत्रधार : शुभांगी दामले
 

संबंधित बातम्या