अलबत्या गलबत्या आणि मुले 

ऋता बावडेकर
गुरुवार, 7 जून 2018

निमित्त
 

कोण म्हणतं, मुलं मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात? 

कोण म्हणतं, मुलं फक्त व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स खेळत असतात? 

कोण म्हणतं, मुलं काही वाचत नाहीत? 

आपण सगळेच हे सतत म्हणत असतो. पण मुलांनी असं वागू नये म्हणून आपण त्यांना काही पर्याय देतो का? याचा विचार आपण क्वचितच करतो. पर्याय द्यायचा नाही आणि मुलांच्या नावानं ओरडत सुटायचं, हे योग्य नाही. त्यांच्या तारुण्यसुलभ एनर्जीचा आपण विचारच करत नाही. 

झी टीव्हीची निर्मिती असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’चा प्रयोग पाहताना हे सगळं मनात आलं. रत्नाकर मतकरी यांनी काही वर्षांपूर्वी हे बालनाट्य लिहिलं. अलबत्या गलबत्या, दोन मांजरं, एक उंदीर, तीन कुत्री, राजा, राजकन्या, प्रधान असा सगळा काल्पनिक मामला असलेलं हे नाटक अधिक गाजलं ते त्यातील मिश्‍कील चेटकिणीमुळं! त्यावेळी ही भूमिका दिलीप प्रभावळकर करत असत, आताच्या प्रयोगात वैभव मांगले ही भूमिका करतात. 

नाट्यगृहात प्रवेश करत असतानाच प्रचंड ऊर्जा जाणवत होती. आतापर्यंत अनेक नाटकं बघितली, पण अशी जाणीव कधी झाली नव्हती. जागेवर बसल्यावर शांतता, मधेच थोडी कुजबूज, हसण्याचे थोडेसे आवाज.. अशा वातावरणाची आपल्या प्रत्येकालाच सवय आहे. पण त्या दिवशी आजूबाजूला प्रचंड गोंधळ होता, धावपळ होती, आरडाओरडा होता.. त्याच वातावरणात नाटक सुरू झालं. गाणं-बिणं होऊन संवादांना सुरुवात झाली. पण फक्त रंगमंचावरील कलाकार संवाद म्हणत नव्हते, तर त्यांच्या प्रत्येक संवादाला नाट्यगृहातून प्रतिसंवाद येत होता. प्रचंड हशा, टाळ्या येत होत्या. उदा. अलबत्याला एक उंदीर त्रास देऊन पळत असतो. अलबत्या म्हणतो, ‘अरे कुठं गेला हा?’ नाटकात प्रचंड रमलेला एक बालआवाज उत्स्फूर्तपणे आला, ‘अरे मागं गेलाय मागं.. बघ ना...’ असं इंटरॅक्‍शन संपूर्ण नाटक होईपर्यंत सुरू होतं. नाट्यगृहात प्रवेश करताना जाणवलेल्या एनर्जीचं रहस्य आता समजत होतं. बालनाट्य असल्यानं आलेल्या बालप्रेक्षकांचा तो उत्साह, ती एनर्जी नकळत मोठ्यांतही आली होती. त्यामुळं नाटकाबरोबरच हे इंटरॅक्‍शनही छान वाटत होतं. पहिला अंक तर प्रचंड उत्साहात पार पडला. अलबत्या, उंदीर, मांजरं यांनी मजा आणली, पण खरी धमाल चेटकिणीनं केली. तिची मिश्‍कील एंट्रीच बालक-पालकांना लुभावून गेली.. नंतर तिनं केलेले चमत्कृतीपूर्ण प्रयोग, म्हटलेले मजेशीर मंत्र, तिचा वावर सगळंच धमाल होतं. जंगलाचा सेट, त्यावेळची प्रकाशयोजना सगळंच दाद देण्यासारखं होतं. तुलनेनं दुसरा अंक थोडा लांबल्यासारखा झाला. कारण तोपर्यंत चेटकिणीचे बहुतेक चमत्कृतीपूर्ण काम झाले होते. गाणी थोडी कमी केली असती तर हा भागही बेताचा झाला असता. पण एकुणात नाटकानं बालप्रेक्षक आणि त्यांच्या पालकांचा छान ताबा घेतला होता. 

चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकानं काही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित केल्या. पूर्वी अशी नाटकं, चित्रपट, सभा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रमाण अधिक होतं. समाजाची चांगल्या गोष्टींची भूक या गोष्टी पूर्ण करत असत. पण जागतिकीकरणामुळं सगळंच बदललं. जगण्याचा रेटा वाढला. माणूस धावू लागला. अनेक गोष्टी लुप्त झाल्या. गावोगावी चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम त्यापैकीच होत! त्याची जागा इतर गोष्टींनी घेतली. आधुनिक तंत्रज्ञानानं आघाडी घेतली. व्हिडिओ, टीव्ही, मोबाईलनं आक्रमण केलं. साहजिकच तरुण पिढी तिकडं आकृष्ट झाली. खेळायची मैदानंही लुप्त होऊ लागली. पूर्वी बालसाहित्यही निर्माण होत असे. चांगली चांगली पुस्तकं मुलांना वाचण्यासाठी होती. कालांतरानं तीही कमी झाली. मुलांनी करायचं काय? 

विभक्त कुटुंबपद्धती आली. आईवडील

दोघंही नोकरी करत होते. मुलांकडं लक्ष द्यायला, त्यांनी काय बघावं, काय वाचावं; एवढंच काय कसं वागावं हे सांगायलाच कोणी घरात 

नव्हतं. अशा वातावरणात ही मुलं कृत्रिमपणाकडं ओढली गेली तर त्यांना कसा दोष देता 

येईल? 

मात्र, असं असलं तरी मुलांची ही भूक अजूनही कायम असल्याचं ‘अलबत्या’ नाटकानं सिद्ध केलं आहे. मुलं वाचत नाहीत, त्यांचे वाचनाचे-आवडीचे विषय बदलले आहेत.. असं आपणच मोठे लोक म्हणू लागलो. पण ‘अलबत्या’चा प्रयोग पाहताना जाणवलं.. मुलं ही मुलंच आहेत. अस्तित्वात नसलेली बोलणारी मांजरं, खोड्या काढणारा उंदीर, राजाराणी, चेटकीण आजही मुलांना आवडतात. त्यांना या स्वप्नरंजनात रमायलाही आवडतं. फक्त त्यांना अडकून ठेवणारी चांगल्या दर्जाची करमणूक आपण त्यांना द्यायला हवी. ती जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडतो आणि मुलं हे करत नाहीत, ते करत नाहीत.. अशा तक्रारी करत बसतो.. आणि मुलंच का? दोन घटका करमणूक मोठ्या माणसांनाही हवीच असते.. फक्त करमणुकीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते.. असे वेगवेगळे प्रयोग होत राहायला हवेत..

संबंधित बातम्या