जंगल बघावे कसे ?

मकरंद केतकर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

निसर्ग कट्टा
निसर्गाचे विविध अधिवास, सजीव, वृक्ष-वेली यांची माहिती जर आपल्याकडे असेल तर निसर्गाशी संवाद साधणे सुलभ होते. निसर्गाशी संवाद कसा वाढवावा हे सांगणारे नवे सदर...

प्रिय वाचक, 
आपल्यापैकी अनेकजणांना निसर्गात भटकायला आवडते. ही भटकंती कधीकधी फक्त निसर्गाच्या विविध भौगोलिक रूपांचा आनंद घेण्यासाठी असते, तर कधी कधी त्यातल्या जीवसृष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी. भरपूर वनस्पती असलेल्या असलेल्या कुठल्याही प्रदेशाला आपल्याकडे सहसा जंगलच म्हटले जाते. खरंतर त्यातही प्रचंड वैविध्य आहे. त्यामुळे ‘जंगल कसे बघावे’ हा जरी आपल्या लेखाचा विषय असला, तरी मी या लेखातून तुमच्यासोबत जंगलांचा विशिष्ट अधिवास व त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवांविषयी अधिक बोलणार आहे. मी आपल्याला विविध वनस्पती, कीटक, सरीसृप, उभयचर, पक्षी, सस्तन प्राणी तसेच भौगोलिक घडामोडींची ओळख करून देणार आहे. 

पृथ्वीवर भौगोलिक, तापमानीय व इतर अनेक घडामोडींमुळे गेल्या साडेतीन अब्ज वर्षांच्या काळात अगणित प्रकारचे जीव निर्माण झाले. या भल्यामोठ्या प्रक्रियेमध्ये विविध स्थित्यंतरे घडली, ज्यामुळे जिवांना बदलत्या अधिवासांना अनुरूप असे बदल स्वतःमध्ये घडवावे लागले. उदा. जिथे पूर्वी जमीन होती तिथे जलाशय निर्माण झाले. किंवा जिथे वाहत्या नद्या व जंगले होती तिथे गवताळ प्रदेश निर्माण झाले. जे जीव या स्थित्यंतरांशी सामना करू शकले नाहीत ते हळूहळू नष्ट झाले व उरलेले जीव पुढच्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज झाले. संशोधकांच्या अंदाजानुसार अशा प्रकारे सुमारे ९९ टक्के जीवसृष्टी काळाच्या ओघात विविध कारणांनी नष्ट झाली. आज आपण पाहतो आहे ती जैवविविधता मागे उरली. असे असले, तरी आजही आपल्याला विविध अधिवासातल्या नवनवीन प्रजातींचा शोध लागतोच आहे. 

आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचं तर आपल्याकडे पर्वत, अतिपावसाचे प्रदेश व तेथील सदाहरित वने, निमसदाहरीत वने, नद्या, जलाशय, कमी पावसाचे प्रदेश व तेथील शुष्क काटेरी वने तसेच गवताळ प्रदेश, कातळ तसेच डोंगरमाथ्यावरील खडकाळ प्रदेश असे विविध नैसर्गिक अधिवास आढळतात. या अधिवासांमध्ये पायवाटा, गवत, खुरटी झुडपे, काटेरी झाडे, मध्यम आकाराचे वृक्ष, उंच वृक्ष, दगड असे घटक असतात. ज्याचे नीट निरीक्षण केल्यास निसर्गातल्या सहचरांची दृष्टीभेट होऊ शकते. या अधिवासांमध्ये जसे काही अधिवासनिष्ठ जीव आढळतात, तसेच सर्व प्रकारच्या अधिवासांमध्ये राहणारे जीवही आढळतात. लेखाच्या पुढील भागात आपण आपण अधिवासात शिरताना काय पाहावे, कसे पाहावे, कुठे पाहावे, कधी पाहावे या गोष्टींची ओळख करून घेऊया. 

संबंधित बातम्या