महत्त्व निरीक्षणशक्तीचे...

मकरंद केतकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

निसर्ग कट्टा
 

कुठलीही भटकंती करताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कुतूहल जागृत असणे आवश्‍यक आहे. ‘यात काय बघायचं’ असं म्हणून जर आपण पुढे निघून गेलो, तर ज्ञानात भर पडण्याची मोलाची संधी आपण गमावू शकतो. निसर्गात हिंडताना आपला पोशाख निसर्गाच्या रंगांशी मिळता जुळता असावा. भडक रंगांचे कपडे तसेच पर्फ्युम्स इ. चा वापर टाळावा. हिंडताना शरीराच्या सुरक्षेसाठी फुलशर्ट, फुलपॅंट, पायात बूट, डोक्‍यावर टोपी असावी. सोबत दुर्बीण,अधिक झूम असलेला कॅमेरा, तसेच दुर्बीण असल्यास अजूनच उत्तम. कुठेही भटकायला जाण्यापूर्वी जसं तिथे काय काय पाहाचंय याची आपण यादी बनवतो; तशीच यादी जर आपण तिथे दिसू शकणाऱ्या जीवांची बनवली तर आपली भटकंती अजूनच जिवंत होऊ शकेल. विविध ऋतूत एकाच ठिकाणी विविध जीव दिसू शकतात. त्यामुळे एकाच ठिकाणाला विविध ऋतूंत भेट दिल्याने तिथली समृद्धी आपल्याला अजून चांगल्या प्रकारे कळू शकते. उदाहरण म्हणून आपण वासोटा वनदुर्गाला समोर ठेवू. तिथे जाताना तुम्हाला कासचे पठार, कोयनेचा जलाशय, तसेच सह्याद्रीतील घनदाट जंगल अशा तीन प्रकारच्या अधिवासांची ओळख होते. यापैकी फक्त कासचे पठार जरी डोळ्यासमोर ठेवले तर तिथे अनेक गोष्टी दिसतात. पावसाळ्यानंतर रंगीबेरंगी फुलांनी सजणारे कासचे पठार उन्हाळ्यात जरी भकास वाटत असले तरी नीट पाहिल्यास तिथे तुम्हाला, गळ्याला जपानी पंख्यासारखा रंगीबेरंगी पंखा असलेले ‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’ दिसू शकतात. दगडावर बसून नर सरडे त्या पंख्यांची उघडझाप करून मादीला आकर्षित करायचा प्रयत्न करतात आणि आपली हद्द राखून इतर सरड्यांना तसे सूचीत करतात. रात्री या पठारावरून प्रवास करत असाल तर रातवा हा पक्षी तसेच विविध जातींची घुबडं त्यांच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी तुमचं लक्ष वेधून घेतील. कदाचित एखादा गवा, भेकर, सांबर किंवा बिबट्याही समोर येऊ शकेल.  पावसाळ्यात रात्री इथे तुम्हाला अनेक जातींच्या बेडकांचं तसेच सापांचं दर्शन होऊ शकेल. हिवाळ्यात याच पठारावर तुम्हाला विविध स्थानिक पक्षी तसेच स्थलांतरित पक्षी दिसू शकतील. असंच निरीक्षण विविध जागांचं केल्यास तिथे विविध वन्यजीव दिसू शकतील.

कुठलाही अधिवास पाहताना जमिनीपासून झाडाच्या शेंड्यापर्यंत जर नीट निरीक्षण केलं तर सहसा दुर्लक्षित होणाऱ्या जिवांचे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर यापूर्वी न पाहिलेली एखादी अद्‌भुत घटनाही पाहायला मिळू शकते. त्या घटनेचे फोटो तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करून एखाद्या निसर्ग अभ्यासकास दाखविल्यास कदाचित विज्ञानाला अपरिचित असणारी एखादी घटनाही पहिल्यांदा जगासमोर येऊ शकते. हिंडताना प्राण्यांच्या पायांचे ठसे, त्यांनी उकरलेली माती, त्यांची विष्ठा, झाडावरचे ओरखडे, उपटून टाकलेली पिसं, प्राण्यापक्ष्यांचे अलार्म कॉल्स यांकडेही आवर्जून लक्ष द्यावे. त्यामुळे, तुम्ही तिथे येण्यापूर्वी काय घटना घडली होती, कुठला प्राणी येऊन गेला किंवा पुढे काय असू शकेल याचा अंदाज येऊ शकतो. प्राण्यांच्या नैसर्गिक दैनंदिनीत ढवळाढवळ न करता त्यांच्या दर्शनाचा आस्वाद घेणे ही एक कला आहे जी सरावाने आत्मसात होते. त्याचबरोबर मोठ्याने गोंगाट करणे, दगड मारणे, वन्यजीवांना चिडविणे , त्यांना खाऊ घालणे या गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत एवढी नैतिकता पाळणेही सुज्ञ व संवेदनशील माणसांचे कर्तव्य आहे.

संबंधित बातम्या