पृथ्वीची टाइम स्केल काय? 

मकरंद केतकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

निसर्ग कट्टा
 

दोस्तांनो, वाईल्डलाईफ म्हणजे खूप मोठ्ठं जंगल आणि त्यात राहणारे मारकुटे, ओरडणारे, चावणारे, हल्ला करणारे जीव असाच बऱ्याच जणांचा समज असतो. खरंतर तसं नाही. वन्यजीव म्हणजे माणसानं स्वतःच्या फायद्यासाठी पाळीव न बनवलेला कुठलाही जीव. मग त्यात मुंगीपासून हत्तीपर्यंत काहीही असू शकतं. मुळात वन्यजीव म्हणजे वनात राहणारा जीव ही ‘वाईल्डलाईफ’ची व्याख्या काही अंशीच बरोबर आहे. माझ्यादृष्टीनं वन्यजीव म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक वृत्तींनुसार जगत निसर्गाचं संतुलन सांभाळण्यात आपली भूमिका पार पाडणारा जीव. मग हा जीव आपल्या घरात आला तरी तो (पाळीव न बनवल्यास) त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसारच वागणार. उदा. आकाशात मुक्त विहार करणारा पोपट जर चुकून तुमच्या घरात आला तर तो घाबरेल, तुमच्यापासून लांब जाईल. तोच पोपट जर लहानपणापासून पिंजऱ्यात वाढला तर तुमच्या अंगाखांद्यावर खेळेल, तुमच्या शिटीला प्रतिसाद देईल. काही जीव असे असतात, की ते तुमच्या घराच्या आसपास किंवा घरातही राहतील पण त्यांचे वर्तन हे त्यांच्या नॅचरल इन्स्टिंक्‍टला धरूनच असणार. उदा. कचऱ्यात पिझ्झा पडला असेल तर तिथे आलेला साप पिझ्झा न खाता, तिथे वावरणाऱ्या उंदरालाच खाणार. 

सांगायचा मुद्दा हा, की प्रत्येक वेळी जंगलात जायची वाट न पाहता आपल्या घराच्या आसपास आढळणाऱ्या जिवांचे निरीक्षण आपण केले तरी आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होऊ शकते. तसेच या ज्ञानामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे - तुम्हाला ते नको असतील तर तुम्हाला तुमच्या राहणीमानात आवश्‍यक तो बदल करता येऊ शकेल आणि दोन, ते हवे असतील तर त्यांना पोषक असा अधिवास निर्माण करता येऊ शकेल. 

आता पुढच्या काही लेखांमधून आपण घराच्या आसपास असणाऱ्या जीवसृष्टीची ओळख करून घेऊ आणि मग नंतर जंगलांमध्ये किंवा नैसर्गिक अधिवासांमध्ये आढळणाऱ्या जिवांची माहिती घेऊ. 

आपल्या घरामध्ये सर्वांत जास्त प्रमाणात दिसणारे जीव म्हणजे कीटक. अगदी सूक्ष्म अशा ‘ऊ’पासून मोठ्ठ्या फुलपाखरापर्यंत. कीटक सृष्टी ही पृथ्वीवरील सर्वांत जुन्या जीवसृष्टींपैकी एक. कोणे एकेकाळी म्हणजे जवळजवळ पन्नास कोटी वर्षांपूर्वी किटकसृष्टीच्या उत्क्रांतीला सुरवात झाली. त्याकाळी पृथ्वीवर वातावरणामध्ये प्राणवायूचे प्रमाण प्रचंड होते त्यामुळे कीटकांचा आकारही प्रचंड होता. सुमारे तीस कोटी वर्षे जुन्या फॉसिल रेकॉर्डसनुसार चतुराचे पूर्वज साधारण एक फूट लांब होते. पुढे पृथ्वीवर अनेक उलथापालथी होत गेल्या व वातावरणातला प्राणवायू कमी होत गेला. यामुळे जिवांचा आकार कमी होत गेला. 

पुढच्या लेखांमधून अनेकवेळा अमुक कोटी वर्षे, तमुक कोटी वर्षे असे उल्लेख येणार आहेत. त्यामुळे पृथ्वीची ‘टाइम स्केल’ तुम्हाला थोडक्‍यात समजवतो म्हणजे आपण या टाईमलाईनवर नक्की कुठे आहोत याचा तुम्हाला अंदाज येईल. असे समजा तुमच्यासमोर पृथ्वी नावाचे एक डिजिटल घड्याळ आहे आणि आजच्या तारखेपर्यंत या घड्याळात चोवीस तास पूर्ण झाले आहेत. आता हे घड्याळ कधी सुरू झाले हे पाहायला आपण भूतकाळात पाहिले तर सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. आपण ती वेळ आपण ००ः०० म्हणजे रात्रीचे बारा अशी धरू. यानंतर एकेक सेकंद, एकेक मिनीट, एकेक तास उलटत गेला. पृथ्वीच्या घड्याळ्यातला हा एकेक सेकंद काही लाख वर्षांचा आहे बरं का. पृथ्वी जन्मली त्यावेळी ती प्रचंड तापलेली धूळ, वायू व धातूंचा गोळा होती. यानंतर मधले अनेक तास पृथ्वी थंड होण्यात गेले. या दरम्यान पृथ्वीवर धुमकेतूंचे असंख्य आघात होतच राहिले. एकदा तर चक्क एक छोटा ग्रहच पृथ्वीवर येऊन आदळला व त्यातून उसळलेल्या दगडाधोंड्यामुळे चंद्राची निर्मिती झाली. हळूहळू पृथ्वी शांत होत गेली व साधारण सकाळी ९ वाजता पहिले एकपेशीय जीव पृथ्वीवर आले आणि जीवसृष्टीची उत्क्रांती सुरू झाली. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास पाण्यामध्ये वनस्पतींचे पूर्वज निर्माण झाले, रात्री सव्वानऊ वाजता मासे जन्माला आले, रात्री साडेनऊच्या सुमारास वनस्पती जमिनीवर आल्या. रात्री दहाच्या सुमारास कीटक निर्माण झाले. रात्री पावणे अकरा वाजता डायनासोर्स व सरपटणारे प्राणी, रात्री अकरा वाजता सस्तन प्राणी आणि शेवटी रात्री ११ः५९ः५९ म्हणजे घड्याळाचे चोवीस तास पूर्ण व्हायला एक सेकंद सुरू झाल्यावर केव्हातरी म्हणजे पन्नासेक लाख वर्षांपूर्वी माणसाचे पूर्वज निर्माण झाले. आपले पूर्वज या धरेवर जन्मल्यापासून आपण पृथ्वीवरील निम्मी जंगलं संपवली आहेत आणि निसर्गाच्या विनाशाला हातभार लावला आहे. या सगळ्या जीवसृष्टीसाठी आपण कानामागून येऊन नुसते तिखटच नाही, तर डोकेदुखी झालेलो आहोत, नाही का?

संबंधित बातम्या