अद्‌भुत वनस्पतीसृष्टी 

मकरंद केतकर
गुरुवार, 31 जानेवारी 2019

निसर्ग कट्टा
 

मागच्या काही लेखांमध्ये आपण जीवसृष्टीची उत्क्रांती, तसेच जीवाश्‍मांचे महत्त्व पाहिले. कोट्यवधी वर्षांच्या स्थित्यंतरामधून आज आपल्याला दिसणारी जीवसृष्टी निर्माण झाली. या सर्व जीवांमध्ये आजही काही ना काही बदल निश्‍चितच घडत आहेत. मात्र, त्याचे स्वरूप लक्षात यायला अजून कदाचित हजारो वर्षांचा कालावधी लागेल. सुमारे पन्नास कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात आलेले, स्वतःचे अन्न तयार करू शकणारे आणि आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग व्यापून राहिलेले जीव म्हणजे वनस्पती. 

आपल्या आहाराला, पोशाखाला तसेच दैनंदिन राहणीमानाला विविध प्रकारे उपयोगी पडणारे हे अद्‌भुत जीव आहेत. अगदी चिंटुकल्या शेवाळापासून शेकडो फूट उंच असणाऱ्या जायंट रेडवूड वृक्षांपर्यंत या वनस्पतीसृष्टीत प्रचंड वैविध्य दिसून येते. अगदी एकाच अधिवासात आढळणाऱ्या वनस्पतींमध्येही त्यांच्या पाने, फुले, खोड, फळे, मुळे या सगळ्यांमध्ये फरक असतो. जंगलाची रचना पाहिली तर प्रचंड मोठ्या भूभागावर एकाच प्रकारच्या वनस्पतींची भरमार शक्‍यतो आढळत नाही. 

आपण जी शेती करतो किंवा फळझाडांच्या बागा लावतो त्याला ‘मोनोकल्चर’ म्हणतात. यामध्ये त्या भागात इतर जातींच्या वनस्पतींची वाढ जाणीवपूर्वक थांबवली जाते, जेणेकरून त्यांच्यातली स्पर्धा संपुष्टात येऊन आपल्याला हव्या असलेल्या वनस्पतींना पुरेसे अन्न व पाणी मिळेल. परंतु, याचा सर्वांत मोठा तोटा म्हणजे विशिष्ट रोग आल्यावर त्या एकाच प्रकारच्या सर्व वनस्पतींचे आयुष्य एका झटक्‍यात धोक्‍यात येते (उदा. मागच्या वर्षी कापसाचे नुकसान करणारी बोंड अळी). याच्या उलट जंगलात ‘पॉलिकल्चर’ असते. म्हणजे विविध जातींच्या वनस्पती एकाच भागात वाढतात. त्यामुळे समजा एका जातीला विशिष्ट रोगाची लागण होऊन त्या वनस्पती नष्ट झाल्या, तरी इतर जातीच्या वनस्पती जंगलाची तब्येत संतुलित राखतात. 

तसे पाहिले, तर वनस्पतींचा आपण फक्त आपल्या स्वार्थाच्या दृष्टीने विचार करतो. उदा. अन्न, लाकूड, सावली, जळण, सुशोभीकरण वगैरे. पण व्यापक स्वरूपात जर पाहिले, तर वनस्पती पृथ्वीचा एसी आहेत. आणि हे मी अगदी खात्रीलायकरीत्या सांगू शकतो, कारण मी पुण्यात जिथे राहतो तो भाग ‘एनडीए’च्या जंगलाच्या परिघावर आहे. शहरातून मी जसा माझ्या घराजवळ येतो, तशी हवा थंड होत जाते आणि माझ्या सोसायटीत प्रवेश करताना तर थंडीच्या दिवसात अगदी कुडकुडायला होते इतका फरक जाणवतो. वनस्पतींच्या आच्छादनामुळे मातीची धूप, विशेषतः पावसाळ्यात, कमी होते कारण जमिनीकडे झेपावणारे पावसाचे थेंब आधी पानांवर आदळतात. त्यामुळे त्यांचा वेग कमी होतो व ते संथ वेगाने मातीवर पडतात. झाडांची गळणारी पाने, फांद्या जमिनीवर पडतात. मातीतले बॅक्‍टेरिया या जैविक कचऱ्याचे रूपांतर ‘ह्युमस’मध्ये करून मातीचा कस वाढवतात. हीच कसदार माती वनस्पतींच्या वाढीसाठी अजून पोषक ठरते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे जंगलात मुबलक पाणी उपलब्ध राहते. 

सह्याद्रीमधल्या अगदी उन्हाळ्यातल्या भटकंतीतही मी अनेकवेळा, जिथे घनदाट जंगल आहे तिथे भरपूर पाणी पाहिले आहे. कोकणातल्या रोह्याजवळ असलेल्या फणसाडच्या अभयारण्यात गेलात तर तिथल्या ‘धरणाची गाण, फणसाड गाण’ अशा विविध जागी तुम्हाला मे महिन्यातल्या कडक उन्हाळ्यातही झुळझुळणारे पाणी पाहायला मिळेल. वनस्पती जरी वरकरणी अचर (म्हणजे न हलणाऱ्या) व निरुपद्रवी दिसल्या तरी त्यांना मेंदू आहे की काय अशी शंका यावी इतक्‍या हुशारीने त्या वागतात. मग ते अन्न मिळवणे असो, स्वतःचा बचाव करणे असो किंवा पुनरुत्पादन करणे असो. सूर्यप्रकाशाची तहान आहे म्हणून नाजूकशी वाटणारी वेलसुद्धा जमिनीतून बाहेर आल्यावर हावरटासारखी आडवी तिडवी पसरत नाही. ती आधी आधार शोधते आणि मग सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते. पुढच्या काही लेखांमधून आपण वनस्पती विश्‍वाच्या अंतरंगात डोकावू... 

संबंधित बातम्या