वनस्पतींतील फरक 

मकरंद केतकर
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

निसर्ग कट्टा
 

मागच्या लेखात आपण वनस्पतींचं महत्त्व जाणून घेतलं. या लेखात वनस्पतींच्या उत्क्रांतीबद्दल, तसंच त्या अनुषंगानं त्यांच्यातील विविध फरकांबाबत थोडक्‍यात जाणून घेऊ. 

आपल्या सकाळच्या चहापासून रात्री झोपण्यापूर्वी घालण्याच्या नाईट ड्रेसपर्यंत वनस्पतींनी आपलं आयुष्य पुरेपूर व्यापलेलं आहे. आपल्या जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्राणवायूची निर्मितीसुद्धा वनस्पतीच करतात. निसर्गामध्ये एवढ्या अजस्र अशा जीवसृष्टीचा डोलारा फार काळजीपूर्वक रचला गेला आहे. या डोलाऱ्यातील प्रत्येक जीव कशा ना कशासाठी तरी दुसऱ्या सजीव अथवा निर्जीव घटकावर अवलंबून असतो. अशा अवलंबून असण्याला शास्त्रज्ञांनी ‘फूड पिरॅमिड’ अशी संज्ञा दिलेली आहे. या पिरॅमिडमध्ये वनस्पती प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक आहेत. कारण त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना जगण्यासाठी इतर जिवांची तशी कमीच गरज असते. त्यामुळे त्यांचं विश्‍व स्वयंपूर्ण आहे आणि म्हणूनच दृश्‍य जगात त्या फार मोठ्या संख्येने आढळतात आणि यामुळेच त्या फूड पिरॅमिडचा पाया आहेत. परंतु, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आज जगाला पोसणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर उत्क्रांतीमध्ये बऱ्याच उशिरा अस्तित्वात आल्या. पृथ्वीच्या घड्याळात पाहिलं, तर आजच्या तारखेपासून सुमारे पन्नास कोटी वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाण्यामध्ये शेवाळेसदृश वनस्पतींची जडणघडण झाली. आज आपण पाहतो त्या फुलंफळं असणाऱ्या वनस्पती त्यानंतर कोट्यवधी वर्षांनी अस्तित्वात आल्या. पाण्यातल्या शेवाळ्यानं हळूहळू जमिनीवर पसरायला सुरुवात केली आणि कालांतरानं त्यांच्या रचनेत बदल होऊन नेचेसदृश वनस्पती अस्तित्वात आल्या. यांनाच ‘फर्न’ असेही म्हणतात. यानंतर हळूहळू बीज बनवणाऱ्या वनस्पतींची जडणघडण होऊ लागली. हा काळ आहे चाळीस कोटी वर्षांपूर्वीचा. परंतु, अजूनही फूल ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. या वनस्पतींना अनावृत बिजधारी म्हणजे ‘जिम्नोस्पर्म्स’ वनस्पती म्हणतात. जिम्नोस म्हणजे नग्न, अनावृत आणि स्पर्म म्हणजे बीज. ज्या वृक्षांच्या बिया आवरणात गुंडाळलेल्या नसून उघड्या असतात, अशा वनस्पती या प्रकारात येतात. उदा. हिमालयातील देवदार वृक्ष. यानंतर म्हणजे सुमारे तेरा कोटी वर्षांपूर्वी सपुष्प वनस्पती (अँजियोस्पर्म्स = अँजिऑन - आवरण | स्पर्म = बीज) म्हणजेच सर्वांत विकसित वनस्पती अस्तित्वात आल्या. 

अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे आज जरी वनस्पती मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजन निर्माण करत असल्या, तरी पृथ्वीवर शुद्ध ऑक्‍सिजनची निर्मिती पहिल्या बॅक्‍टेरियांनी साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सुरू केली. जे कार्बन डायऑक्‍साईड शोषून ऊर्जानिर्मितीसाठी त्यातला फक्त कार्बन वायू घ्यायचे आणि ऑक्‍सिजन मुक्त करायचे. ज्याला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाशसंश्‍लेषण म्हणतो. आज हेच काम वनस्पती करतात. त्यासाठी त्या पानांमध्ये असलेल्या क्‍लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याचा उपयोग करतात. पानांनी शोषलेला कर्बद्विप्रणील वायू (कार्बन डायऑक्‍साईड), मुळांनी शोषलेले पाणी, तसेच इतर पोषक घटक यांच्या संयोगानं ग्लुकोजची म्हणजे स्टार्चची निर्मिती केली जाते. हे ग्लुकोज वनस्पतींच्या स्वतःच्या वाढीसाठी वापरलं जातं व अतिरिक्त ग्लुकोज खोड, पानं, मुळं, फुलं, फळं अशा विविध ठिकाणी साठवलं जातं. वनस्पतींनी तयार केलेलं हे अन्न खाऊन शाकाहारी प्राणी ऊर्जा मिळवतात व शाकाहारी प्राण्यांना खाऊन मांसाहारी प्राणी अन्न मिळवतात. 

सपुष्प वनस्पतींचे मुख्यतः दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. डायकॉट्‌स (द्विदल) आणि मोनोकॉट्‌स (एकदल). डायकॉट्‌स म्हणजे ज्या वनस्पतींची, बीजामधून बाहेर आल्यावर दोन पानं दिसतात अशा वनस्पती. उदा. आंबा, जास्वंद, फणस वगैरे. मोनोकॉट्‌स म्हणजे ज्या वनस्पतींचं, बीजातून बाहेर आल्यावर एकच पान दिसतं अशा वनस्पती. उदा. नारळ, गवत, ऑर्किड्‌स वगैरे. या दोन्ही वर्गातल्या वनस्पतींच्या रचनेत मुळं, पानांवरील शिरा, फळं, फुलं यांच्यात फरक आढळतो. नुसतं पानांच्या रचनेतला फरक पाहायचा म्हटला, तर एकदलीय वनस्पतींच्या पानांच्या शिरा समांतर रेषेत असतात. तर द्विदलीय वनस्पतींच्या पानांमधल्या शिरा फाटे फुटल्यासारख्या विभाजित असतात. वनस्पतींच्या अजून गमतीजमती पुढच्या लेखात. तोवर बच्चेमंडळी, जरा घराच्या आसपास हिंडून पाहा बरं तुम्हाला किती डायकॉट्‌स आणि मोनोकॉट्‌स दिसले!

संबंधित बातम्या