‘सह्याद्री’ची ओळख 

मकरंद केतकर
सोमवार, 4 मार्च 2019

निसर्ग कट्टा
 

मंडळी, जीवसृष्टीतील वनस्पतीसृष्टीची माहिती आपण घेतली. इथून पुढे आपण कीटक, सरीसृप, समुद्री जीव, पक्षी तसेच सस्तन प्राण्यांची माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी, आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं, तर आपला अभिमान असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेची ओळख करून घेऊ. कारण जीवसृष्टीची इतकी विविधता आपल्याकडं आढळण्यामागं या पर्वतरांगेचा फार मोठा हात आहे. 

गुजरातमधील डांग जिल्ह्यापासून थेट कन्याकुमारीपर्यंत साधारण सोळाशे किलोमीटर धावणारी ही पर्वतरांग जगभरात पश्‍चिम घाट या नावानं ओळखली जाते. ही पर्वतरांग मॉन्सूनचे वारे अडवते व त्यामुळं इथं प्रचंड पाऊस पडतो. यामुळंच इथं मोठ्या प्रमाणात जंगल व जैवविविधता आहे. जेव्हा तुम्ही सह्याद्रीतला कुठलाही दगड हातात घेता तेव्हा तुमच्या हातात साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास असतो. पृथ्वीवर आपल्याला दिसणारी जमीन ही खरंतर अस्थिर आहे. साडेचार अब्ज वर्षं उलटूनही पृथ्वीचा गाभा अजूनही द्रव स्वरूपात आहे. त्यामुळं सोप्या शब्दात सांगायचे, तर दुधावर जशी साय तरंगते, तसे हे प्रचंड मोठे भूखंड लाव्हारसावर तरंगत आहेत. गेल्या अब्जावधी वर्षांत ते कधी एकत्र आले, तर कधी विलग झाले. तर, ‘सह्याद्री’च्या निर्मितीपूर्वी झालं असं, की सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पॅंजिया नावाच्या भल्यामोठ्या खंडामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका ही सारी मंडळी एकमेकांना चिकटून चिकटून होती. हळूहळू हे खंड विलग होऊ लागले व आफ्रिकेला टाटा करून अतिशय संथ वेगाने भारताचा त्रिकोण (द्वीपकल्प) उत्तरेकडं निघाला. त्याच्या या प्रवासात, वाटेत मादागास्करपाशी रियुनियन बेटांजवळ ज्वालामुखीची जिवंत विवरं (ॲक्‍टिव्ह व्होल्कॅनो) होती. या आग ओकणाऱ्या विवरांजवळून जेव्हा हे द्वीपकल्प प्रवास करू लागलं, तेव्हा भारताच्या पश्‍चिम भागात जमिनीच्या खालून हा लाव्हारस प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला. हळूहळू तो लक्षावधी चौरस किलोमीटर भूभागावर पसरला. अर्थात ही क्रिया अतिशय संथपणे घडली, अनेक वर्षं घडली. अशाप्रकारे लाव्हारसाचा एक थर तयार झाला. यानंतर दुसरा थर येण्यापूर्वी शेकडो वर्षं गेली. या दरम्यान पहिल्या थराच्या वरच्या भागाचं विदारण होऊन तिथं माती तयार झाली. लाव्हाचा दुसरा थर आल्यावर ही माती भाजली गेली. ती आजही आपल्याला लाल रंगाची दिसते. सिंहगडावर कधी गेलात तर पुणे दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडं तुम्हाला त्या लाल मातीचे पट्टे दिसतील. याला ‘रेड बोल’ असे म्हणतात. आता पुन्हा काही शे वर्षं गेली. परत नवा थर आला. परत माती भाजली गेली. अशी ही क्रिया साधारण तीस हजार वर्षं वारंवार होत राहिली. या दरम्यान इथल्या डायनासोर आदी जीवसृष्टीचा संपूर्ण विनाश झाला. 

हळूहळू भारत या सगळ्या जाळपोळीतून पुढं निघाला. भूखंडाच्या पुढच्या प्रवासात ज्वालामुखी नसल्यानं सह्याद्रीची वाढ थांबली. या दरम्यान समुद्राकडील बाजू धसत गेली व कोकणाची पट्टी तयार झाली. त्यामुळंच जर कोकणातून सह्याद्री पाहिला उदा. ताम्हिणी घाटाचा पायथा, माळशेज घाटाचा पायथा, खोपोली इत्यादी; तर सह्याद्रीची सरळसोट उभी भिंत दिसते. लाव्हारस ज्या टप्प्यांमध्ये बाहेर आला त्यानुसार सह्याद्रीच्या निर्मितीचे अभ्यासकांनी तीन टप्पे केले आहेत. यांना ‘सबग्रुप्स’ म्हणतात. ते आहेत सर्वांत आधी नाशिक सबग्रुप, मग लोणावळा सबग्रुप आणि शेवटचा वाई सबग्रुप. या भल्यामोठ्या प्रवासाच्या शेवटी भारत आशियाच्या कुशीत शिरला, ज्यामुळं तिथल्या टेथीस नावाच्या समुद्राचा तळ वर उचलला जाऊन हिमालय तयार झाला. आज जरी सह्याद्री भव्य वाटत असला, तरी एकेकाळच्या वैभवाचे अवशेष म्हणावे इतकी त्याची झीज झाली आहे. अंदाजच बांधायचा, तर निर्मितीच्या अखेरीस सुमारे पंधरा लाख चौरस किलोमीटर इतकी अगडबंब व्याप्ती असलेलं हे लाव्हाचं रूप आता झीज होऊन, सह्याद्री आणि दख्खनचं पठार मिळून सुमारे पाच लाख चौरस किलोमीटर इतकंच उरलं आहे आणि पाताळात सुमारे दोन किलोमीटर खोलवर पसरलं आहे. लोणावळा, महाबळेश्‍वर वगैरे ठिकाणांहून कोकणाकडच्या दऱ्या पाहिल्या तर तुम्हाला हे थर पाहता येतील. अतिशय सुंदर निसर्गवैभव परिधान केलेला हा पुराणपुरूष कोट्यवधी वर्षांनंतरही तसाच खंबीर उभा आहे. त्यानं आपल्या पूर्वजांना सांभाळलं, आपल्याला खेळवलं आणि आपण जर त्याला टिकवलं तर आपल्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना तो सांभाळेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या