पशुपक्ष्यांचं वर्गीकरण 

मकरंद केतकर
सोमवार, 11 मार्च 2019

निसर्ग कट्टा
 

दोस्तांनो, आपण ज्या परिसरात राहतो त्यानुसार आपल्या घराच्या भोवती आपल्याला अनेक प्रकारचे पशुपक्षी दिसतात. काही पक्षी, कीटक, सरीसृप किंवा सस्तन प्राणी हे विशिष्ट भागातच आढळतात, तर काही जीव सर्वत्र आढळतात. उदा. पश्‍चिम घाटातल्या जंगलांच्या जवळ राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घराच्या आसपास ‘मलाबार व्हिसलिंग थ्रश’ हा अतिशय सुंदर गाणारा पक्षी पावसाळ्याच्या आसपास आढळून येतो, तर दख्खनच्या पठारावर राहणाऱ्या मंडळींना ‘शॉर्ट इयर्ड आऊल’ हे स्थलांतरित घुबड हिवाळ्यात दिसू शकतं. 

अशा या विविध प्राणीपक्ष्यांना नुसतं पाहणं जरी मोठा आनंद असला, तरी त्यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी त्यांचं वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करणं हे अत्यंत आवश्‍यक असतं. याचं कारण असं आहे, की एकसारखे दिसणारे जीव त्यांच्या सवयींनुसार किंवा अधिवासानुसार वेगवेगळी वर्तणूक करू शकतात किंवा त्यांच्या आवाजामध्ये, प्रजननाच्या सवयींमध्ये साम्य अथवा फरक असू शकतो. अगदी आपल्या शहरी जीवनातलं साधं उदाहरण पाहायचं, तर आपण जी विविध वाहनं वापरतो त्यांचे कार, बाईक, ट्रक, विमान, जहाज, सायकल असे विविध प्रकार आहेत. पण एखाद्या वाहनाला नुसतं कार म्हणून काहीच अर्थबोध होत नाही. मग ती कार एसयुव्ही आहे, की सेदान आहे, की हॅचबॅक आहे की जीप आहे हे पाहावं लागतं. मग त्यानंतर ती डिझेल आहे, की पेट्रोल, की सीएनजी हे पाहावं लागतं. मग किती शक्तीचं इंजिन त्यात आहे हे पाहिलं जातं. अशा अनेक प्रकारे ‘कार’ या प्रकाराचं वर्गीकरण केलं जातं. बरोबर की नाही? मग इतकी प्रचंड मोठी जीवसृष्टी जर अभ्यासायची असेल, तर त्यांचं वर्गीकरण फार आवश्‍यक असतं. 

जीवसृष्टीचं वर्गीकरण करण्याचा हा प्रयत्न ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञाच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्वकाळापासून झालेला दिसतो. अनेक अभ्यासकांनी अनेक प्रकारे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी केलेल्या वर्गीकरणामध्ये अनेक त्रुटी आढळून येत होत्या. म्हणजे पक्ष्यांना जर उडणाऱ्या जीवांमध्ये समाविष्ट केले, तर शहामृगासारखे पक्षी उडू शकत नाहीत. सस्तन प्राणी उडू शकत नाहीत हे गृहीत धरलं, तर वटवाघूळ झकासपैकी उडतं. पाय नसलेले सरपटणारे प्राणी म्हणजे साप असं समजून बसलो, तर पाय नसलेल्या सापासारख्या पाली जगात अनेक देशांत आढळतात. त्यामुळं नेमकं कसं वर्गीकरण केलं तर ते अगदी अचूक होईल या प्रयत्नांत अनेक शास्त्रज्ञ होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, कुठलीही वैज्ञानिक गोष्ट किंवा संशोधन हे पहिल्याच प्रयत्नात निर्दोष बनवता येईल असं अजिबात नसतं. त्यासाठी ‘ट्रायल ॲण्ड एरर’ याच पद्धतीनं पुढं जावं लागतं. अगदी एडिसननंसुद्धा नऊशे नव्याण्णव वेळा प्रयत्न केले, त्यानंतर एक हजाराव्या प्रयत्नांत त्याला बल्बचा शोध लावता आला. म्हणूनच असं चुकांमधून शिकत पुढं जात असताना त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय ते सगळेच महत्त्वाचे असतात. कारण मागच्या लाटेनं धक्का दिल्याशिवाय पुढची लाट निर्माण होत नाही. तर अशाप्रकारे अनेक शतकांच्या या प्रक्रियेतून शेवटी ‘कार्ल लिनियस’ या स्वीडिश शास्त्रज्ञानं अठराव्या शतकात जिवांच्या वर्गीकरणाची अशी पद्धत शोधून काढली, जी आजही वापरली जात आहे. या पद्धतीत ‘किंगडम, फायलम, क्‍लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पिशीज’ या उतरंडीवर जिवांचं वर्गीकरण केलं जातं. 

मराठीत सांगायचं, तर ‘सृष्टी - संघ - वर्ग - गोत्र - कुळ - वंश - जाती’ असं वर्गीकरण होतं. 

एकूण सहा किंगडम्समध्ये ही जीवसृष्टी विभागून पुढं अजून तपशिलात प्रत्येक जिवांचं वर्गीकरण केलं आहे. माणसाचंच उदाहरण घ्यायचं, तर किंगडम - ॲनिमॅलिया, फायलम - कॉर्डाटा, क्‍लास - मॅमलिया, ऑर्डर - प्रायमेट्‌स, फॅमिली - होमिनिडी, जीनस - होमो आणि स्पिशीज - सेपियन्स.. काय, गोंधळ होतोय? जरा मोबाईलमधले गेम्स बाजूला ठेवून Binomial classification system असं गुगल करा बरं!

संबंधित बातम्या