फुलपाखरू आणि पतंग 

मकरंद केतकर
सोमवार, 25 मार्च 2019

निसर्ग कट्टा
 

दोस्तांनो, कीटक म्हटलं की अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. पण फुलपाखरू म्हटलं की छान वाटतं. याचं कारण असं आहे, की तुम्हाला लहानपणी रंगीत प्राणीपक्षी दाखवताना आईबाबांनी सुंदर सुंदर रंगीत फुलपाखरंही दाखवलेली असतात. पण त्याचबरोबर रात्री दिव्यांवर भिरभिरणारे, फुलपाखरांसारखेच मोठे पंख असणारे, काहीसे गडद रंगांचे फुलपाखरांसारखेच दिसणारे पतंगही तुम्ही पाहिले असतील. काय फरक असेल बरं दोघांत? चला तर मग आता आपण लेपिडॉप्टेरा या ऑर्डरमधल्या या दोन जिवांची ओळख करून घेऊ. 

फुलपाखरू (बटरफ्लाय) आणि पतंग (मॉथ) हे दोन्ही जीव लेपिडॉप्टेरा या एकाच ऑर्डरमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या पंखांवर अतिशय सूक्ष्म खवले असतात. जर तुम्ही कधी फुलपाखरू किंवा पतंग चिमटीत पकडला असेल, तर तुमच्या बोटांना जो रंग लागतो, तो रंग म्हणजेच हे रंगीत खवले. यातले काही प्रकारचे खवले तर प्रकाशातील विविध लांबींचे तरंग परावर्तित करून चक्क रंगाचा आभास निर्माण करतात. त्यामुळे विविध अंशातून फुलपाखराला पाहिल्यास गडद ते फिका अशा एकाच रंगाच्या विविध शेड्‌स दिसू शकतात. बहुतांश नर आणि मादी फुलपाखरांचे रंग वेगवेगळे असतात. फुलपाखरू आणि पतंग यांच्यात काही अपवाद सोडले तर पुढील फरक आढळतात; फुलपाखरे मुख्यत्वे दिवसा सक्रिय असतात, तर पतंग रात्री सक्रिय असतात. फुलपाखरे बसताना पंख मिटून बसतात, तर पतंग बसल्यावर पंख उघडून बसतात. दोघांनाही पंखांच्या दोन जोड्या असतात. फुलपाखरांच्या शुंडा म्हणजेच अँटेना या बारीक काडीसारख्या असून त्यांच्या टोकाला छोटासा गोळा असतो. पतंगांच्या अँटेना या कंगव्यासारख्या असतात. बहुतांश फुलपाखरांच्या अंगावर अगदी कमी केस असतात तर बहुतांश पतंग केसाळ असतात. पतंगांच्या अनेक जातींमध्ये (उदा. ॲटलास मॉथ) ते जन्माला आल्यावर त्यांना सोंड आणि तोंडाचे अवयव नसतात. केवळ प्रजनन करणे आणि मरून जाणे एवढाच त्यांच्या प्रौढ आयुष्याचा उद्देश असतो. 

पक्षी जसे स्थलांतर करतात तशीच फुलपाखरेही स्थलांतर करतात. विशेष करून हिवाळ्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात फुलपाखरे उडत जाताना दिसू शकतात. जगातला सर्वांत मोठा स्थलांतराचा प्रवास करणारं फुलपाखरू माहितीय कुठलं आहे? अमेरिकेतील मोनार्च फुलपाखरं; मेक्‍सिकोपासून सुरू होणारा त्यांचा प्रवास सुमारे पाच हजार किलोमीटर अंतर पार करून कॅनडा येथे संपतो आणि मग काही काळ तेथे राहून ते परतीचा प्रवास सुरू करतात आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या मूळ स्थानी परत येतात. 

फुलपाखरू म्हटलं, की ते नेहमी फुलांवरच भिरभिरणार असा आपला गैरसमज असतो. पण अनेक जाती अशा आहेत की ज्या कधीच फुलांवर येत नाहीत. त्या प्राण्यांची विष्ठा किंवा सडलेले मांस यावर स्वतःची गुजराण करतात (उदा. पर्पल एम्परर). फुलपाखरं बागेत यावीत म्हणून सहसा फुलझाडं लावली जातात. परंतु, मधाबरोबरच फुलपाखरांना क्षारांचीही गरज असते. ही गरज भागवण्यासाठी फुलपाखरं ओलसर चिखलाच्या जागी एकत्र जमतात. त्यामुळं तुम्हाला जर फुलपाखरं पाहायची असतील, तर तुमच्या बागेत किंवा गॅलरीत जर तुम्ही सतत थोडा ओला चिखल उपलब्ध करून दिलात तर विशेषकरून उन्हाळ्यात तुम्हाला तुमच्या घरातच अनेक जातींची फुलपाखरं पाहायला मिळू शकतील. या क्षार शोषण्यामागं अजून एक कारण आहे. शोषलेले क्षार नराकडून मादीला पुनरूत्पादनामध्ये ‘गिफ्ट’ म्हणून दिले जातात. जेणेकरून तिच्या पोटातल्या अंड्यांची वाढ नीट व्हावी. म्हणून मीलनकाळात जास्तीत जास्त क्षार शोषण्याची नरांची धडपड चालू असते. 

फुलपाखरं आणि पतंग या दोघांमध्येही बहुतांश जातींचे सुरवंट विशिष्ट वनस्पतींची पानं खाऊन वाढतात. मॉथ्समध्ये काही जातींचे सुरवंट इतर कीटकांनाही खातात. फुलपाखरू आणि मॉथ या दोघांचेही सुरवंट स्वतःच्या संरक्षणासाठी विविध आयुधांनी सज्ज असतात. यामध्ये खाज देणारे केस, उग्र दर्प, लपवून ठेवणारा रंग अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. असं म्हणतात, की फुलपाखरं आणि पतंग हे जगातले बेस्ट वनस्पतिशास्त्रज्ञ आहेत. कारण कुठल्या वनस्पतीवर आपली अंडी घालायची, हे त्यांना बरोबर कळतं. उदा. मॉरमॉन जातीची फुलपाखरं आपली अंडी कढीपत्ता किंवा लिंबूवर्गीय वनस्पतींवरच घालतात. जेणेकरून त्यांच्या सुरवटांना योग्य ते खाद्य उपलब्ध होऊ शकेल. आता आठवून बघा बरं, तुमच्या बागेतल्या कुठल्या झाडांवर सुरवंटं दिसतात?
 

संबंधित बातम्या