खंडोबाचा घोडा 

मकरंद केतकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

निसर्ग कट्टा
 

मंडळी, आज आपण पाहूया मॅंटोडिया या ऑर्डरमधल्या कीटकाची गंमत! 
ट्रेकिंग करताना, शेतात किंवा बागेत हिंडताना कधीतरी वाळक्‍या गवतातली एखादी काडी एकदम चालायला किंवा एखादं एकटंच हिरवं पान डोलायला लागल्यावर नवख्यांना प्रश्‍न पडतो, ‘हा काय लोचा आहे?’ तर हा लोचा आहे प्रेईंग मॅंटीस नावाचा कीटक. मराठीत याला ‘खंडोबाचा घोडा’ किंवा ‘नमस्कार कीटक’ म्हणतात. आधी ‘प्रेईंग मॅंटीस’ या नावाचा अर्थ बघू. ‘प्रेईंग’ म्हणजे प्रार्थना करणारा आणि ‘मॅंटीस’ म्हणजे ग्रीक भाषेत देवदूत. शिकारीच्या पवित्र्यात असताना या कीटकाचे पुढचे पाय प्रार्थना करताना जोडलेल्या हातासारखे दिसत असल्याने त्याला ‘प्रेईंग मॅंटीस’ (प्रार्थना करणारा देवदूत) असे नाव आहे. ‘खंडोबाचा घोडा’ जसा चित्रात पुढचे पाय वर करून उभा असलेला दिसतो, तसाच काहीसा हा दिसतो म्हणून मराठीत ‘खंडोबाचा घोडा’ हे नाव पडले असावे. 

जगात याच्या शेकडो जाती आहेत. त्यांचे रंग, आकारही वेगवेगळे आहेत. आजूबाजूच्या निसर्गात बेमालूम मिसळून जाणारे रंग हे यांचे वैशिष्ट्य. कारण याच रंगांच्या भरवशावर ते कॅमोफ्लाज होऊन शिकार करतात. याच्या बटबटीत आणि बाहेर आलेल्या डोळ्यांमध्ये शेकडो भिंग असतात व त्यामुळे त्याला १८० अंशाच्या कोनातील व्हीजन मिळते. या कीटकाची सर्वांत पुढील पायांची जोडी हातासारखे काम करते. त्यांना शास्त्रीय भाषेत ‘रेप्टोरियअल लेग्स’ असे म्हणतात. पकडलेली शिकार निसटून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर काटेही निर्माण झाले आहेत. यांना पंखांच्या दोन जोड्या असतात; ज्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित उडू शकतात. याचे मुख्य भक्ष्य जरी कीटक असले, तरी हा वेळप्रसंगी पाली तसेच छोट्या पक्ष्यांचीही शिकार करताना आढळला आहे. 

अनेक कीटक व अष्टपादांप्रमाणेच यांच्यामध्येही मादीपेक्षा नर आकाराने लहान असतो. यांचं मीलन मोठं मजेशीर असतं. प्रणयोत्सुक मादीच्या शरीरातून विशिष्ट गंध निघतात. त्यांचा मागोवा घेत मादीकडं नर आकृष्ट होतो. पण सगळ्यांचं आयुष्य इतकं सोपं थोडीच असतं? मादीजवळ पोचल्यावर नराला विशिष्ट प्रकारे नाचून मादीसमोर स्वतःला सिद्ध करावं लागतं. जर तिची अनुमती मिळाली तरच नर तिच्या पाठीवर चढू शकतो. आता येतो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट. ‘प्रेईंग मॅंटीस’ची मादी समागमानंतर नराला खाऊन टाकते. पोटात वाढत असलेल्या अंड्यांना अधिक प्रोटिन्स मिळावेत म्हणून मादीकडून नराची शिकार होते. अर्थात अशाप्रसंगी नर जर सावध असेल, तर समागमानंतर चटकन पळूनही जातो. पण सगळ्यात भन्नाट गंमत म्हणजे समागम चालू असतानाच मादीनं नराचं डोकं खाऊनही त्याचं शरीर तसंच पुढं कित्येक तास समागम करत राहिलेलं आढळलेलं आहे. याचं कारण असं आहे, की सस्तन प्राणी किंवा पक्षी यांच्याप्रमाणं श्‍वास घेण्यासाठी कीटकांना चेहऱ्यावर जोडलेलं नाक नसतं. तर त्याऐवजी, पोटाच्या दोन्ही बाजूला सूक्ष्म छिद्रं असतात, ज्यांना स्पायरॅकल्स म्हणतात. डोकं तुटल्यानंतर जखम झालेला भाग लगेच सील होतो. श्‍वसन क्रियेचा मेंदूशी संबंध नसल्यानं आणि कीटकांचं रक्त ऑक्‍सिजन वाहून नेण्याचं काम करत नसल्यानं कीटक जिवंत राहतो. यानंतर मादी बारीक फांदीवर, स्वतःच्या शरीरातून निघणाऱ्या एका चिकट स्रावाची टोपली बनवून त्यात अंडी घालते. या टोपलीला इंग्लिशमध्ये ‘उथेका (Ootheca)’ म्हणतात. काही आठवड्यांनी त्या अंड्यांतून डायरेक्‍ट पिल्लंच बाहेर येतात व दर काही कालावधीनंतर कात टाकत टाकत प्रौढावस्थेला पोचतात. 

हा कीटक पूर्णपणे बिनविषारी असून मानवाला उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतो. त्यामुळं आपल्या स्वार्थासाठी का होईना पण त्याचं अस्तित्व टिकावं म्हणून आपण ‘प्रे’ करूया. मग भले तसं करताना आपण खंडोबाचं गाढव दिसलो तरी काय हरकत आहे?
 

संबंधित बातम्या