भोवऱ्यातले भक्षक 

मकरंद केतकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

निसर्ग कट्टा
 

वाइल्डलाइफ हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या डोक्‍यात वाघ, सिंह, हरिण वगैरे मोठे प्राणीच फ्लॅश होतात. कदाचित त्यांच्या अद्‌भुतरम्य दर्शनामुळेच अनेकांचा वाइल्डलाइफबद्दलचा दृष्टिकोन अशा ‘ग्रेटर फाऊना’पुरताच मर्यादित राहतो. पण खरं सांगायचं, तर आपल्या घरातले झुरळ, मधमाशा, डास हे कीटकसुद्धा ‘वाइल्ड’च आहेत. विशिष्ट प्राण्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून माणसानं आपल्या फायद्यासाठी हवे तसे मोल्ड केलेले प्राणी सोडले, तर इतर यच्चयावत सृष्टी वाइल्ड आहे आणि राहील. असाच कायम वाइल्ड राहणाऱ्या कीटकांपैकीच एक म्हणजे मुंगीखाऊ अँट लायन. 

ज्यांनी उन्हाळ्यात मोकळ्या मैदानात चक्कर मारलीय, त्यांनी या छायाचित्रात दिसतोय तसे अनेक भोवरे वाळूत पाहिले असतील. हे भोवरे म्हणजेच न्युरोप्टेरा या ऑर्डरमधल्या अँटलायनच्या निम्फचे म्हणजे पिल्लांचे मुंगी वगैरे कीटक पकडण्यासाठी बनवलेले सापळे असतात. 

जगातल्या बऱ्याचशा कीटकांची जीवनपद्धत ‘अंड, अळी, कोष आणि प्रौढ’ या चक्रातून फिरत असते. या प्रक्रियेला (प्रोसेसला) मेटामॉर्फोसिस म्हणतात. यातल्या प्रत्येक टप्प्यावर पुढच्या टप्प्याला चालना देणारे महत्त्वाचे बदल घडत असतात. अँटलायनसुद्धा याच चक्रातून जातो. अँटलायनची मादी वाळूत अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेला निम्फ आपल्या पुढच्या टप्प्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या म्हणजे खादाडीच्या तयारीला लागतो. त्यासाठी तो मऊ वाळू असलेली जागा निवडतो. मुंग्यांची रेलचेल असणारी जागाच सहसा निवडली जाते. मनपसंत जागा मिळाल्यावर तो उलटा गोल गोल चालत वाळूमध्ये साधारण तीन सेंटीमीटर खोलीचा आणि पाच सेंटीमीटर रुंदीचा खड्डा तयार करून खड्ड्याच्या तळाशी दबा धरून मुंगीची वाट बघत असतो. ‘किती बाई अजून काम शिल्लक आहे’ असा विचार करत आपल्याच नादात चालणारी एखादी मुंगी धपकन त्या खड्ड्यात पडते. खड्ड्यात पडल्यावर ती वर येण्याची धडपड करू लागते. पण निम्फने त्याच्या कौशल्याने त्या खड्ड्याच्या भिंती इतक्‍या गुळगुळीत करून ठेवलेल्या असतात, की मुंगी जितका वर चढायचा प्रयत्न करेल तितकी तिच्या पायाखालची वाळू सरकत राहते आणि शेवटी मुंगी तळाशीच पोचते. अँटलायनच्या तोंडात असलेल्या चिमट्यांवर सूक्ष्म केस असतात. वाळूत झालेली हालचाल ते झटकन सेन्स करतात आणि अँटलायन क्षणार्धात बाहेर येऊन मुंगीची गचांडी धरतो. मुंगी निसटून बाहेर पडायची धडपड करू लागली, तर तो तोंडाने तिच्यावर वाळू उडवून तिला परत आत पाडतो आणि त्याच्या तोंडात असलेले पाचक रस मुंगीच्या शरीरात टोचून तो त्याला हवे ते जीवनरस शोषून घेतो. मग तिचे ‘दहावा-बारावा’ वगैरे वाळूच्या तळघरातच पार पडतात. 

कोषावस्था गाठण्यासाठी त्याला अशा अनेक मुंग्या पचवाव्या लागतात आणि आवश्‍यक ती ऊर्जा जमा होईपर्यंत तो मुंग्या खात राहतो. त्याची ही अवस्था तीन वर्षसुद्धा टिकू शकते. या काळात तो ‘शी’ करत नाही. उलट शरीरातल्या जमा झालेल्या वेस्टपासून तो कोषाच्या अवस्थेत जाण्यासाठी सिल्क तयार करतो. कोषातून बाहेर पडलेल्या ॲडल्टचं आयुष्य, मात्र जेमतेम काही दिवसांचंच असतं आणि ते जातींमधील वैविध्यानुसार परागकण तसेच कीटक खाऊन जगतात. अनेकांना प्रश्‍न पडेल, की इतकं कमी आयुष्य असेल, तर मग अळीचं आयुष्य एवढं मोठं का? तर त्याचं उत्तर आहे, निसर्गानं प्रत्येकाला आपलं काम नेमून दिलेलं आहे. मुंग्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या अनेक घटकांपैकी अँटलायन एक आहे. त्याचं ते काम झाल्यावर तो पुढच्या टप्प्यात जातो. 

पण यातून एक गोष्ट मला तरी शिकण्यासारखी आढळली; ती म्हणजे, ‘तुम्ही लहान आहात, दुर्लक्षित आहात, कुरूप आहात, तरी आपलं काम थांबवायचं नाही. नेमून दिलेलं काम नेमस्तपणे यथायोग्य पार पाडायचं.’ 

माझी खात्री आहे, भगवान श्रीकृष्णांचा ‘नियतं कुरू कर्मः’ हा संदेश या कीटकांइतका फारच कमी मनुष्यगणांना कळला असेल.

संबंधित बातम्या