अक्षयपात्राच्या अन्नपूर्णा 

मकरंद केतकर
सोमवार, 6 मे 2019

निसर्ग कट्टा
 

रूणूझुणू रूणूझुणू (हा शब्द देणाऱ्या ‘माउली’ तुम्ही धन्य आहात) नाद करत या जीवसृष्टीचा ताल सांभाळत लयीत उडणारे कीटक म्हणजे मधमाशा. गरमागरम फुलक्‍यावर लावून खाताना रसनेला रंगत आणणारा आणि कधीही खराब न होणारा अक्षयगुणी असा ‘मध’ हा पदार्थ निर्माण करणाऱ्या या विश्‍वव्यापी अन्नपूर्णा आहेत. मध हा जगातला बहुधा एकमेव पदार्थ आहे, जो कधीच खराब होत नाही. इजिप्तमधल्या पिरॅमिड्‌समधून तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या उत्तम दर्जाच्या मधाचे घट मिळाले आहेत.

तुम्ही झाडं तोडलीत, कडे फोडलेत... हरकत नाही; आम्ही तुमच्या सोसायट्यांवर घर करू, अशा खमक्‍या स्वभावाच्या या मधमाशा सर्वांच्या परिचयाच्या आहेत. यांच्याशिवाय शेती होणार नाही, आंबे खायला मिळणार नाहीत आणि जांभळानं जिभाही रंगवता येणार नाहीत, इतकं यांचं अस्तित्व महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या षटकोनी कप्प्यांच्या पोळ्याशी सलगी करायला जाऊन आणि मग त्यांच्या शेपटीतील नांगीचा डंख खाऊन शौर्याच्या कहाण्या फुगवून सांगणारा एकतरी इसम तुमच्या परिचयाचा निश्‍चितच असणार. पण त्यांच्या तिखट स्वभावाला नाक मुरडण्यापेक्षा हे सगळं शस्त्र-शास्त्र थोडंसं समजून घेतलं, तर त्वचेला तजेला आणणाऱ्या मधाइतकंच ते बुद्धीलाही नवीन खाद्य पुरवेल. 

सैन्याच्या कडक शिस्तीसारखंच काम करणाऱ्या यांच्या फौजा तीन भागात विभागलेल्या असतात. राणी माशी, नर माशा आणि कामकरी माशा. कामकरी माश्‍यांमधल्याच काही पोळ्यात राहून पोळ्याचा कारभार सांभाळणाऱ्या सेवक माशा होतात. यांच्या नव्या घरोब्याची सुरुवात होताना, राणीमाशी आधीचं पोळं सोडून नवीन जागा शोधायला बाहेर पडते. ती बाहेर पडली, की सोबत जवळपास निम्मी फौज तिच्या मागं येते. नवीन जागा निवडून झाली, की सेवक माशा पोळं करायला सुरुवात करतात. त्यासाठी त्यांच्या पोटामधल्या एका ग्रंथीमधून निघणारं मेण वापरलं जातं. पोळं करताना मधाची कोठारं, अळ्यांसाठी कप्पे, इतर मधमाशांना विश्रांती घेण्यासाठी कप्पे हे सगळं केलं जातं. पोळ्यानं आकार घेतला, की राणीमाशी एकेका कप्प्यात एकेक अंडं घालायला सुरुवात करते. मधमाशांमध्ये फक्त राणीमाशीच अंडी घालू शकते. या दरम्यान कामकरी माशा बाहेर जाऊन मकरंद, तसेच परागकण गोळा करून आणतात. परागकणांद्वारे त्यांना प्रोटिन्स मिळतात. हा मकरंद त्यांच्या पोटातल्या मधुकुंभामध्ये साठवला जातो. त्यांनी गोळा करून आणलेला मकरंद आणि परागकण त्या पोटातून तोंडावाटे बाहेर काढून सेवक माशांना भरवतात. सेवक माशा त्यांच्या पोटातल्या प्रक्रियेद्वारे त्याचा मध तयार करतात. हा मध मग कप्प्यांमध्ये साठवला जातो आणि त्यांच्या अळ्यांना, राणीमाशीला तसेच फौजेला अन्न म्हणून पुरवला जातो.कामकरी माश्‍या अधूनमधून उर्वरित कुटुंबाला पाणीसुद्धा पाजतात. सगळ्यात महत्त्वाची आणि आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे नेमस्तपणे आपापलं काम करणाऱ्या हजारो मधमाश्‍या गरजेनुसार अक्षरशः मिनिटभरामध्ये आपल्या कामांची अदलाबदल करू शकतात. माणसांच्या जगातल्या कुठल्याही कंपनीला त्यांच्या स्टाफच्या जॉब रोल्सची इतक्‍या कमी वेळात अशी अदलाबदल करता येणं निव्वळ अशक्‍य आहे. अंड्यातून निघालेल्या सगळ्याच अळ्या काही नर माशा, सेवक किंवा कामकरी माशा होत नाहीत. त्यातल्या काही अळ्यांना परागकण आणि सेवक माशांच्या शरीरातून निघणारे स्राव यांचं मिश्रण असलेल्या विशिष्ट प्रकारच्या अधिक पोषक अन्नामध्ये अक्षरशः बुडवून ठेवलं जातं. त्यासाठी त्यांना साठवणारे कप्पेही अधिक मोठे असतात. या पदार्थाला ‘रॉयल जेली’ असं म्हणतात. या अधिक पोषक आहारामुळं त्यांच्या शरीरात जनुकीय बदल होऊन त्या अंडी देऊ शकणाऱ्या राणीमाशा तयार होतात. उर्वरित अंड्यांमधून नर माशा, कामकरी आणि सेवक माशा तयार होतात. अंड, अळी, कोष आणि मधमाशी या एकवीस दिवसांच्या चक्रातून तयार होणाऱ्या मधमाशांचं आयुष्य साधारण तीनेक आठवड्यांचं असतं. राणीमाशी सर्वांत जास्त म्हणजे पाचेक वर्षं जगते. कामकरी आणि सेवक माशा काही आठवडे आणि नर मात्र केवळ समागमापुरतेच जगतात आणि समागम न झाल्यास काही आठवडे जगतात. मधमाशांच्या जगभर वीसेक हजार जाती आहेत. कमीअधिक फरकानं हाच आयुष्यक्रम त्या जगतात. नवीन राणीमाशी तयार झाली, की जुनी राणीमाशी पोळं सोडते आणि तिच्याबरोबर तिचे फॉलोअर्सही तिच्या मागं येतात. 

हे सगळं तर झालं. मग या फोटोमधल्या सोनेरी ठिपक्‍यांचा काय विषय आहे, असं तुमच्या डोक्‍यात जर आलं असेल तर त्याचं असं आहे, मधमाशा अतिशय स्वच्छताप्रिय असतात. पोळ्यामध्ये त्या अजिबात घाण साठू देत नाहीत. सेवक माशा अळ्यांची, राणीमाशीची तसेच स्वतःची विष्ठा पोळ्यापासून दूर नेऊन टाकतात. बाहेरचं तापमान प्रतिकूल असेल, तर त्या ‘शी’ न करता पोळ्यातच बसून राहतात. या फोटोत दिसणारे सोनेरी ठिपके हे मधमाशांची विष्ठा आहे. कर्नाटकमधल्या दांडेलीत सिंथेरी रॉक्‍स या जागी नदीच्या पल्याड असलेल्या कड्यावर ही पोळ्यांची तोरणं आहेत आणि नदीच्या अल्याड असलेल्या दगडांवर पसरलेली ही सोनसरी नक्षी. हिवाळ्यात आम्ही तिथं जातो, तेव्हा ही विष्ठा अजिबात नसते. उन्हाळ्यात मात्र साऱ्या दरीमध्ये एक उग्रसर गंध भरून राहिलेला असतो. कितीतरी ‘टुरिष्ट’ लोक्‍स तिथं येऊन नाकं मुरडत असतात. पण तरीसुद्धा, त्या गंधाच्या पल्याड, मला एक मनमोहक परिमळ जाणवतो. सर्व चक्र नियमित चालल्यामुळं घमघमणाऱ्या शेतांचा, पिकू लागलेल्या आंब्यांचा आणि रंगू लागलेल्या जांभळांचा.

संबंधित बातम्या