खुन्या ढेकण्या 

मकरंद केतकर
सोमवार, 13 मे 2019

निसर्ग कट्टा
 

मधे एकदा एका अटक केलेल्या खुन्याचा पत्रकारांनी घेतलेला इंटरव्ह्यू मी फेसबुकवर बघत होतो. चांगले चार-पाच खून पचवलेला गडी, अजून ‘चार-पाच राहिलेच ठोकायचे’ म्हणून हळहळला होता. त्याचं एक वाक्‍य तर फारच कमाल होतं - ‘मेरा बाप भी बदमाश था। मै भी बदमाश हूं।’ आणि का ते माहीत नाही, पण तो हे भलताच खुश होऊन सांगत होता. त्याच्या या वाक्‍यानं मला आपला खुनी ढेकण्या आठवला. रक्त शोषून पिणाऱ्या ॲसॅसिन बग्सच्या पिल्लाच्या तोंडी शोभून दिसेल असा हा संवाद आहे. प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवनरसावर गुजराण करणारे जीव म्हणजे ढेकूण जमातीतले कीटक. 

सर्वसामान्यपणे त्यांना बग्स म्हणून ओळखलं जातं. हेमीप्टेरा या ऑर्डरमधले हे कीटक. बीटल्सच्या अगदी विरुद्ध, यांना तोंडाच्या जागी, तुकडे करणाऱ्या चिमट्यांऐवजी, शोषून घेणारी शुंडा (प्रोबोसिस/रोस्ट्रम) असते. यांच्यात अनेक प्रकार आणि लक्षावधी जाती आहेत. पैकी इतर कीटकांची शिकार करून जगणारे जे आहेत त्यांना शिकारी किंवा खुनी ढेकूण म्हणतात. शिकारी ढेकूण भक्ष्याच्या शरीरात त्याच शुंडेतून विष टोचून त्याचे अंतर्गत अवयव विरघळवून टाकतात आणि आतमध्ये तयार झालेला ‘पल्प’ शोषून पिऊन टाकतात. अशा या ‘रक्तपीत्या’ ढेकणांपैकी एक आहे ॲसॅसिन बग. अचानक झडप घालून बेसावध कीटकाचा फडशा पाडण्यात हे पटाईत असतात. यांच्या असंख्य जाती असल्या तरी वर फोटोत दिसणारी जात जरा हटके आहे. म्हणजे काय असतं, यांच्या आयुष्यात इतर अनेक कीटकांप्रमाणं ‘अंडं - अळी - कोष - कीटक’ असा पूर्ण मेटामॉरफॉसिस होत नाही. तर अंडं - शिशू - शिशूचे अवतार - कीटक अशा टप्प्यात प्रौढत्व गाठलं जातं. याची मादी झाडाच्या खोडात अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या पिलांचं बाह्यकवच फारच नाजूक असतं. त्यामुळं ते स्वसंरक्षणासाठी एक मस्त शक्कल लढवतात. त्यांच्याच अंगातून स्रवणारा चिकट स्राव ते मागच्या पायांनी पूर्ण अंगावर नीट पसरवतात आणि मग आजूबाजूला असलेला डेब्रीस म्हणजे कचरा, अंगावर चिकटवायला सुरुवात करतात. आधी बारीक बारीक कण चिकटवतात आणि मग नंतर मोठे मोठे पानांचे तुकडे, कोळ्यांची जाळी वगैरे चिकटवून घेतात. यामुळं केमॉफ्लाजचं प्रोटेक्‍शन तर मिळतंच, पण आकारही मोठा दिसतो. (मी अशाच एका निम्फचं सगळं कवच बाजूला करून पाहिलं होतं. तेव्हा खोदा पहाड निकला चुहा अशी माझी अवस्था झाली होती). मेटामॉरफॉसिसच्या प्रक्रियेमध्ये दर काही महिन्यांनी त्यांचा आकार वाढतो आणि मग जुनं कवच सोडून देऊन पुन्हा नवीन कवच ते तयार करतात. अशाप्रकारे साधारण पाचेकवेळा ही प्रक्रिया पार पडली, की शेवटच्या स्टेजला त्या कवचातून ॲडल्ट ॲसॅसिन बग म्हणजेच खुनी ढेकण्या बाहेर पडतो. तोसुद्धा अशाच प्रकारे अंगावर केरकचरा चिकटवून घेऊन स्वतःला लपवून ठेवतो व शिकार करतो. यांचीच एक जात मी कान्हा अभयारण्यात पाहिली होती, जी शिकार केलेल्या मुंग्यांच्या डेड बॉडीज अंगावर चिकटवून इतर मुंग्यांना फसवते. 

संपूर्ण अंग झाकून घेतलेले हे ‘निम्फ’, प्रौढांप्रमाणंच दबा धरून बसतात आणि समोर आलेल्या भक्ष्याची शिकार करून त्याचे जीवनरस शोषून घेतात. दिवसभर झाडांच्या खोडांमधल्या अंधाऱ्या जागांमध्ये आराम करणारे हे चिटुकले कच्चेबच्चे रात्री शिकारीला बाहेर पडतात. स्वतःशीच बोलत - ‘मेरा बाप भी खुनी था। मै भी खुनी हूं।’

संबंधित बातम्या