वाळवीचं विश्‍व 

मकरंद केतकर
सोमवार, 20 मे 2019

निसर्ग कट्टा
 

निसर्ग हा चमत्कृतीपूर्ण वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेला आहे. अमिबापासून ब्ल्यू व्हेलपर्यंत प्रत्येकाची स्वतःची अशी सुरेख वैशिष्ट्यं आहेत. ही वैशिष्ट्यं कधी रंगात दिसतात, कधी आवाजात, कधी आकारात; तर कधी त्यांच्या घरबांधणीमधून दिसतात. सोशल इन्सेक्‍ट्‌स या प्रकारात येणारे कीटक म्हणजे वाळवी. ब्लाट्टोडिया ऑर्डरमधले हे जीव क्वचितच उजेडात जमिनीच्या वर दिसतात. कारण त्यांचं बहुतांश आयुष्य जमिनीच्या खाली अंधारातच पार पडतं. वाळवी म्हटली, की आपल्याला घरातल्या फर्निचरला कुरतडणारा जीव आठवतो. बरोबरच आहे. कारण जगातल्या वाळवीच्या बहुतांश जाती मृत लाकूड, पालापाचोळा खाऊन जगतात. त्यांच्या पोटातले बॅक्‍टेरिया, मृत वनस्पतींमधील कठीण सेल्युलोज पचवायला मदत करून लाकडातील पोषक तत्त्वं मातीत मिसळायला मदत करतात. अशा प्रकारे पोट भरणाऱ्या कीटकांना डेट्रीटीव्होरसही म्हणतात, ज्यातल्या डेट्रीटस शब्दाचा अर्थ आहे पालापाचोळा. असं म्हणतात, की वाळवी नसेल तर जगात मृत वनस्पतींचे डोंगर तयार होतील, इतकं त्यांचं काम महत्त्वाचं आहे. वाळवीच्या सगळ्याच जाती काही वारूळ बनवत नाहीत. काही जमिनीखाली नुसती भुयारं करून राहतात, तर काही जमिनीवर पडलेल्या ओंडक्‍यांमध्ये घरं करून राहतात. वाळवीमधली राणी चांगली तळहाताएवढी मोठी असते. तिच्या अंड्यांनी भरलेल्या अवाढव्य पोटामुळं ती कुठंही न हिंडता भुयारातल्या तिच्या चेंबरमध्ये बसून रोज हजारो अंडी देत राहते. तेसुद्धा तब्बल पंचवीस - तीस वर्षं. तिचा जोडीदारही तिच्याबरोबरच असतो. तिचीच संतती असलेल्या कामकरी मुंग्या तिची काळजी घेत राहतात. कामकरी आणि सैनिक वाळव्यांचं आयुष्य मात्र अगदीच कमी असतं. वारूळ करणाऱ्या कामकरी वाळव्या मोठ्या कौशल्यानं त्याची अशी रचना करतात, की आतली उष्णता बाहेर निघून जाईल व बाहेरची थंड हवा वारुळाच्या छिद्रांमधून जमिनीखाली जाऊन आतमध्ये थंडावा राखेल. यासाठी सतत नवीन छिद्रं तयार करणं व जुनी बुजवणं; तसंच वारुळाचे नवे कोन तयार करणं ही कामं चालू असतात. सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे, हे वारूळ वरती जेवढं उंच दिसतं त्याच्या कमीतकमी पाचपट जमिनीच्या खाली आडवं तिडवं पसरलेलं असतं. हे वारूळ म्हणजे जणू जमिनीवर उगवलेलं हिमनगाचं टोकच. 

काही जातींमध्ये वारुळाच्या भिंती पूर्वेला पातळ व पश्‍चिमेला जाड असतात. कारण रात्रभराच्या गारव्यानंतर सकाळी उष्णता हवी असते. त्यामुळे पूर्वेकडचं ऊन आत शोषलं जाण्यासाठी भिंती पातळ असतात. दिवसाच्या शेवटी उष्णता शोषली जाऊ नये म्हणून पश्‍चिमेच्या भिंती मात्र जाड ठेवल्या जातात. एकंदर कीटकसृष्टीच अजब आहे. वाळवीमध्येच, लाकूड नीट पचवू न शकणाऱ्या काही जाती हे काम पूर्ण करायला वारूळामध्ये विशिष्ट प्रकारची बुरशी पाळतात. ती बुरशी आणि वाळवी यांची विशेष गट्टी असते. या विशिष्ट बुरशीला जगण्यासाठी लागणारी ओल, अंधार आणि अन्न हे सगळं वारूळाच्या आतल्या बाजूला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी वारुळातल्या शेतकरी वाळव्या घेतात. याची सुरुवात चावून चोथा केलेला लाकडाचा लगदा जमवण्यापासून होते. हा लगदा एका विशिष्ट जागी जमवला जातो व त्यावर त्या विशिष्ट बुरशीचे बीजकण आणून पेरले जातात. वाढीला लागलेली बुरशी तिच्या रसायनांचा वापर करून या लगद्यातील सेल्युलोज आणि लिग्नीनवर प्रोसेसिंग करते आणि त्यापासून वाळवी खाऊ शकेल असं अन्न तयार करते. गेली कोट्यवधी वर्षं हे नातं असंच अबाधित आहे. 

आता पावसाळा जवळ येतो आहे. वारुळातून पंख फुटलेले नर आणि माद्या शेकडोंच्या संख्येनं बाहेर पडतील. जमलेल्या जोड्या नवीन प्रजा वाढवण्यासाठी जमिनीच्या आत जाऊन बसतील. पुन्हा कधीही बाहेर न येण्यासाठी...

संबंधित बातम्या