चतुर 

मकरंद केतकर
मंगळवार, 11 जून 2019

निसर्ग कट्टा
 

गेली पंचवीस - तीस कोटी वर्षं पृथ्वीवर चतुराईनं अस्तित्व टिकवून असलेला कीटक म्हणजे चतुर होय. ओडोनाटा (ओडोन - दात) ऑर्डरमधल्या या कीटकाच्या तोंडात दातासारखे दिसणारे चिमटे असल्यानं त्यांच्या ऑर्डरला ओडोनाटा हे नाव दिलेलं आहे. माणसाला हेलिकॉप्टर बनवण्याची प्रेरणा ज्या कीटकावरून सुचली तोच हा चतुर. एका जागी स्थिर राहणं, झटक्‍यात पुढं-मागं, वर-खाली, डावीकडं-उजवीकडं जाणं इत्यादी कसरतींसाठी लागणारं कौशल्य चतुराकडं आहे. 

चतुरांचा इतिहास पाहिला तर कोट्यवधी वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज तब्बल दीड ते दोन फूट लांबीचे उडणारे जीव होते. केवळ चतुरच नाही, तर इतर अनेक कीटक त्यावेळी प्रचंड आकाराचे होते. या प्रचंड आकारामागचं कारण काय बरं असावं, याचा अभ्यास करताना संशोधकांना असं आढळलं, की त्यावेळी वातावरणात मुक्त प्राणवायूचं प्रमाण आजच्या तुलनेत महाप्रचंड होतं. सायनोबॅक्‍टेरिया नामक सूक्ष्म जिवांनी अन्न बनवण्यासाठी फोटोसिंथेसिस करताना कार्बनडायऑक्‍साइड शोषून त्यातला ऑक्‍सिजन ‘वेस्ट प्रॉडक्‍ट’ म्हणून टाकून दिल्यामुळं वातावरणात वायुरूप प्राणवायूचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. तो जमिनीत आणि समुद्रातही शोषला गेला. या दरम्यान अनेक धातूंबरोबर त्याचं ऑक्‍सिडेशन झालं. यात तयार झालेल्या लोखंडाचे ‘बॅंडेड आयर्न फॉर्मेशन्स’ आजही मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात. दिल्लीत इंदिरा गांधींच्या समाधी स्थळावर उभा केलेला दगड असाच अडीच अब्ज वर्षांपूर्वीचा बॅंडेड आयर्न रॉक आहे. एवढं सगळं झालं, तरी हा ‘वाढता वाढता वाढे’ प्राणवायू एका पॉइंटला इतका प्रचंड वाढला, की या प्राणवायूनं मिथेन आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेसचा प्रभाव जवळजवळ संपवून टाकला. कार्बनडायऑक्‍साईडवर जगणारे जीव जवळजवळ नष्ट झाले आणि पृथ्वीचं तापमान प्रचंड घसरून चक्क हिमयुग आलं. या कालखंडाला ‘स्नोबॉल अर्थ’ असे म्हणतात. म्हणजे, अवकाशातून पाहिलं तर पांढरीशुभ्र दिसणारी पृथ्वी. परंतु विश्‍वात कुठलीच अवस्था चिरंजीव नसते. हळूहळू यानंतर अशा अनेक घडामोडी घडल्या, की हिमयुग सरून पुन्हा जीवांची उत्क्रांती सुरू झाली. परंतु, तरीही आजच्या तुलनेत प्राणवायूचं प्रमाण खूप जास्त होतं. हा जास्तीचा प्राणवायू या जिवांच्या अधिक वाढीसाठी पोषक ठरला. नंतर मात्र हे प्रमाण घसरत घसरत आजच्या पातळीपर्यंत आलं व त्यानुसार या जिवांचा आकारही बदलला. 

आज आपल्या दिसणाऱ्या चतुरांमध्ये, ‘चतुर’ म्हणजे ड्रॅगनफ्लाय आणि ‘टाचणी’ म्हणजे ‘डॅमसेलफ्लाय’ असे दोन प्रकार आहेत. टाचणी नावाप्रमाणंच अगदी नाजूक असते आणि मुख्य म्हणजे बसताना पंख मिटून बसते. तर चतुर पंख उघडून बसतात. चतुर आणि टाचणी दोघांचंही जीवनचक्र पाण्यामध्ये सुरू होतं. मादी पाण्यामध्ये तिचं लांबसडक पोट बुडवून गवताच्या किंवा इतर पाणवनस्पतींच्या देठावर अंडी घालते. दोन ते पाच आठवड्यांनी अंड्यांतून पिल्लं बाहेर येतात. या अवस्थेत त्यांना पंख नसतात. ही छोटी छोटी पिल्लं त्यानंतर आजूबाजूला पोहणारे इतर कीटक, त्यांच्या अळ्या, चिंटुकले मासे तसेच त्यांचे स्वतःचे भाऊबंद यांना खाऊन मोठी होऊ लागतात. पाण्यात असताना त्यांना पाण्यात विरघळलेला प्राणवायू शोषून घेण्यासाठी पोटामध्ये कल्ले असतात. प्रौढावस्थेत मात्र पोटातील ‘स्पायरॅकल्स’ या अवयवांद्वारे हवेतील प्राणवायूचं श्‍वसन केलं जातं. ही पिल्लावस्था काही महिने ते काही वर्षं इतकी मोठी असू शकते. अनेक वेळा कात टाकून झाल्यावर शेवटच्या टप्प्यात पोचलेलं पिल्लू पाण्याबाहेर येतं आणि एखाद्या आधाराला चिकटून बसतं. मग हळूहळू खोळीची पाठीच्या वरची त्वचा फाटत जाते व त्यातून सावकाश पूर्ण पंख असलेला चतुर बाहेर पडतो. प्रौढांचं आयुष्य काही आठवड्यांचंच असतं. मात्र तेसुद्धा इतर कीटकांची शिकार करून जगतात. यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या डासांचाही समावेश आहे. बहुतांश चतुरांच्या जाती या स्वच्छ पाण्यातच वाढतात. त्यामुळं एखाद्या पाणवठ्यावर चतुरांचं असित्व असणं, हे त्या पाणवठ्याच्या उत्तम तब्येतीचं लक्षण समजलं जातं.

संबंधित बातम्या