पॅरासिटॉईड वास्प 

मकरंद केतकर
सोमवार, 17 जून 2019

निसर्ग कट्टा
 

इतर सगळ्या जीवसृष्टीप्रमाणंच कीटकसृष्टीत शिकार आणि शिकारी ही जोडी आढळते. शिकार करून जगणाऱ्या ॲसिसीन बग्सबद्दल आपण याच लेखमालेत मागं वाचलं असेल. आता शिकारी माशीबद्दल माहिती घेऊ. तसं आपण सगळ्याच माशांना ‘माशी’ म्हणतो पण इंग्रजीत ह्यांना विशिष्ट नावं आहेत. जसं, बी, फ्लाय आणि वास्प. ह्यांचं वर्गीकरणही वेगवेगळं आहे. म्हणजे बी आणि वास्प या मुंग्यांच्या हायमेनोप्टेरा (Hymenoptera) या ऑर्डरमध्ये येतात. हायमेन म्हणजे त्वचा (मेंब्रेन) आणि टेरा म्हणजे पंख. त्यांचे पंख त्वचेसारखे काहीसे चिवट असल्यानं हे नाव. ‘फ्लाय’ वर्गातील माशा डिप्टेरा (Diptera) ऑर्डरमध्ये येतात. डाय म्हणजे विभाजित. 

‘बी’ या वर्गातील माशांच्या अंगावर खूप लव असते, तसंच त्यांना पंखांच्या दोन जोड्या असतात. उदा. हनीबी. ‘फ्लाय’ या वर्गातील माशांच्या अंगावर फार लव नसते आणि पंखांची एकच जोडी असते. उदा. हाऊस फ्लाय. 

‘वास्प’ या वर्गातील माशांच्या अंगावरही फार लव नसते, मात्र पंखांच्या दोन जोड्या असतात. उदा. पेपर वास्प. 

बी आणि वास्पमधील अजून एक मुख्य फरक म्हणजे ‘बी’नं डंख मारल्यावर तिची नांगी तुटून बाहेर येते व बी मरते. कारण ‘बी’ची नांगी खरखरीत असते व ती त्वचेत घुसल्यावर अडकून बसते. वास्प मात्र अनेकवेळा डंख मारूनही सहीसलामत राहते. कारण तिची नांगी गुळगुळीत असते. 

‘बी’ वर्गातील माश्‍या, फुलातील मकरंद तसंच परागकण खाऊन जगतात. वास्प मात्र जातीप्रजातींमधील फरकानुसार मकरंद तसंच इतर कीटक व मृत प्राण्यांचे मांस खाऊन जगतात. सोबतच्या छायाचित्रात दिसणारी माशी ‘पॅरासिटॉईड वास्प’ या कुळातली आहे. पॅरासिटॉईड म्हणजे परजीवी. प्रौढ माशी जरी ‘व्हेजिटेरियन’ असली तरी हिच्या अळीला वाढीसाठी प्रोटिन्सची गरज असते व ती गरज भागते तिच्या आईनं पुरवलेल्या शिकारीतून. त्यासाठी ही माशी मातीमध्ये खड्डा खणून बिळ तयार करते व शिकारीच्या शोधात बाहेर पडते. बिळाच्या जवळपास झुरळ किंवा क्रिकेटसारखा किडा दिसला, की ही त्याला दंश करते. हा पहिला दंश असतो जो शिकारीला थोडंसं बधिर करतो. यानंतर ‘डॉक्‍टर्स प्रिसिजन’नं कीटकाच्या मेंदूमध्ये बरोब्बर त्याच्या चेतासंस्थेला असा दुसरा दंश करते, की ज्यामुळं कीटकाच्या पायांची हालचाल मंदावते व तो माशीचा गुलाम होतो. यानंतर त्याच्या अँटिना पकडून माशी त्याला बिळामध्ये घेऊन जाते व त्याच्या अंगावर बरोबर अशा जागी अंडं घालते, की जिथं नवजात अळीला कीटकाच्या अंगाला छिद्र पाडून रस शोषता येईल. यानंतर माशी बाहेर पडते आणि खड्ड्याचं दार थोडंसं बुजवून वर एक दगड किंवा काड्या वगैरे रचून तिथून निघून जाते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी हळूहळू त्या कीटकाच्या शरीरात प्रवेश करते आणि आतमधल्या फ्लुईड्‌स आणि अवयवांना अशा पद्धतीनं खाते, की तिला कोषात जाईस्तोवर पोषण मिळेल व कीटक जिवंत राहील. कीटकाची फुफ्फुसं, हृदय आणि मेंदू हे सर्वांत शेवटी खाल्लं जातं. संशोधकांचा असा अंदाज आहे, की अळी कीटकाच्या अंतर्भागात विशिष्ट द्रव्य पसरवते, ज्यामुळं बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन न होता कीटकाची जखम ताजी राहते. अशाप्रकारे कीटकाला पोटभर पोखरून झाल्यावर दहा ते बारा दिवसांनी अळी कीटकाच्या शरीरातच कोषावस्थेत जाते. तिचं माशीमध्ये रूपांतरण पूर्ण झाल्यावर ती त्याच्या शरीरातून बाहेर येते आणि बिळाच्या तोंडावरचा दगड बाजूला सारून बिळातून बाहेर पडते. या माशांमध्ये कोळ्यांवर वाढणाऱ्या, दुसऱ्या माशांवर वाढणाऱ्या, सुरवंटांवर अंडी घालणाऱ्या, कोळ्याच्या जाळ्यात कोळ्याच्या अंगावर अंडं घालणाऱ्या अशा अनेक जाती आहेत. पण अळीच्या वाढीची पद्धत साधारण अशीच असते. 

उत्क्रांतीच्या टप्प्यात विविध जिवांनी आत्मसात केलेल्या या विविध पद्धती खरंच अचंबित करणाऱ्या आहेत यात शंकाच नाही. तेव्हा यापुढं अशी एखादी खड्डा खणणारी माशी दिसली, तर तिच्या भावी शिकारीला ‘रेस्ट इन पीस’ आणि भावी अळीला ‘हॅपी बर्थडे’ म्हणायला विसरू नका. 

संबंधित बातम्या