माशा आणि टोळ 

मकरंद केतकर
सोमवार, 24 जून 2019

निसर्ग कट्टा
 

दोस्तांनो, आज आपण इन्सेक्‍ट्‌स ऑर्डर्समधल्या शेवटच्या दोन ऑर्डर्सची ओळख करून घेऊ. त्या आहेत डिप्टेरा आणि ऑर्थोप्टेरा. आधी डिप्टेरा या माशांच्या ऑर्डरची ओळख करून घेऊ. या ऑर्डरमध्ये विविध जातीच्या ‘ट्रू फ्लाईज’ म्हणजे खऱ्या माश्‍यांचा उदा. हाऊस फ्लाय म्हणजे घरात दिसणारी छोटी काळी माशी, फ्रूट फ्लाय, हाऊस फ्लाय, फ्लेश फ्लाय म्हणजे मांसाचा फडशा पाडणारी माशी, रक्तपिपासू हॉर्स फ्लाय अशा विविध प्रकारांचा समावेश होतो. डिप्टेरा म्हणजे अर्धपंखी कीटक. इतर कीटकांना पंखांच्या दोन जोड्या, म्हणजे एकूण चार पंख असतात. माशांच्या पंखांच्या एकूण चार जोड्यांपैकी मागील एक जोडी केवळ नाममात्र आणि अतिशय छोटी असते. या पंखांना शास्त्रीय भाषेत ‘हॉल्टर्स’ म्हणतात. (सोबत दिलेल्या छायाचित्रामधील वर्तुळ पाहा.) त्यांचा उपयोग त्यांना उडताना तोल सांभाळण्यासाठी होतो. निसर्गात स्वच्छता कर्मचाऱ्याचं काम माशा करत असतात. त्या त्यांची अंडी मांस तसेच वनस्पतिजन्य पदार्थांवर घालतात. त्यातून जन्माला येणाऱ्या अळ्या तो पदार्थ खाऊन ती जागा स्वच्छ करीत असतात. अन्नावर बसलेली माशी आपली लाळ त्यावर सोडते आणि पातळ झालेलं अन्न पिऊन टाकते. तिथून ती उडून दुसऱ्या पदार्थावर गेली, की तिच्या सोंडेला लागलेल्या लाळेतून घातक बॅक्‍टेरिया नव्या पदार्थांत प्रवेश करतात व अन्न दूषित होतं. म्हणूनच अन्न नेहमी झाकून ठेवावं. तुम्ही नुसता हात उगारला तरी माशी झटकन उडून जाते. याचं कारण आहे, माशीच्या डोळ्यात जवळ जवळ सहा हजार सूक्ष्म भिंगं असतात. ही भिंगं अनेक कोनांमधून आलेला प्रकाश एकत्र करून तिला दिव्य दृष्टी देतात. माशीच्या ‘प्रगत’ मेंदूला आपली प्रत्येक ॲक्‍शन स्लो मोशनमध्ये दिसते. त्यामुळं तुम्हाला जरी वाटलं की तुम्ही खूप वेगानं तिला मारण्यासाठी हात आपटणार आहात, तरी तिला मात्र आपला हात अगदी सावकाश खाली येताना दिसतो. पण हालचाल जरी स्लो मोशनमध्ये दिसली, तरी तिचा वेगवान मेंदू प्रचंड वेगानं गणितं करून त्याच क्षणाला तिला उडून जाण्याची सूचना देतो. निसर्गात माशीला अनेक शत्रू आहेत आणि या शत्रूंपासून बचाव करण्यासाठी तिला ही सिद्धी प्राप्त झाली असावी. 

आता आपण ऑर्थोप्टेरा या ऑर्डरची ओळख करून घेऊया. ग्रासहॉपर्स म्हणजे टोळ, क्रिकेट्‌स म्हणजे रातकिडे आणि कॅटीडिड्‌स या कीटकांचा समावेश असलेल्या या परिवारात रंग, आकार, आवाज या सगळ्यामध्येच प्रचंड वैविध्य आढळतं. ऑर्थोप्टेरा म्हणजे शरीराला समांतर असलेले पंख. हे कीटक त्यांच्या पंखांच्या दोन्ही जोड्या शरीराला समांतर ठेवून बसतात. यातल्या बहुतांश जिवांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेश होतो. हे कीटक जरी वनस्पतींच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असले, तरी शेतात येणारी टोळधाड ही शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी असते. एकावेळेला शेतात येणारे लक्षावधी टोळ पाहता पाहता उभ्या पिकाची पानं, दाणे यांचा फडशा पाडून प्रचंड नुकसान करतात. कॅटीडिड्‌स आणि क्रिकेट्‌स हे जीव, वनस्पती तसंच कीटकांचंही भक्षण करतात. ‘नर क्रिकेट’ मादीला आकर्षित करण्यासाठी आपले दोन्ही पंख एकमेकांवर घासून किर्र किर्र असा आवाज निर्माण करतात. गंमत म्हणजे त्यांचे कान त्यांच्या पुढच्या पायांवर स्थित असतात. त्यामुळं त्यांना आवाजाच्या दिशेनं चटकन वळून प्रतिक्रिया ठरवता येते. ग्रासहॉपर्स आणि कॅटीडिड्‌स यांचे नर त्यांचे पाय पंखांवर घासून मादीला आकर्षित करायला आवाज करतात. टोळ, क्रिकेट्‌स आणि कॅटीडिड्‌स हे तिन्ही प्रकार जगात अनेक जिवांचे प्रमुख खाद्य आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या प्रोटीन्समुळं जगात अनेक देशांमध्ये मानवी आहारातही या कीटकांचा समावेश होतो. भारतातही ईशान्य भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पारंपरिकरीत्या बाजारात टोपल्यांमधून वाळवलेले कीटक विकायला ठेवलेले पाहायला मिळतात. आपल्याला हे थोडं विचित्र वाटेल, पण प्रांतिक वैविध्य म्हणून आपण या परंपरेचा आदर करायला हवा. बरोबर की नाही?

संबंधित बातम्या