अष्टपाद कोळी

मकरंद केतकर
सोमवार, 1 जुलै 2019

निसर्ग कट्टा
 

अपृष्ठवंशीय संधीपाद जीवसृष्टीतल्या कीटक या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर, आपण आता अष्टपाद जीवांची माहिती घेऊ. शास्त्रीय भाषेत त्यांना ‘अरॅक्‍नीड्‌स’ असे म्हणतात. या शब्दाची उत्पत्ती झाली आहे ग्रीक भाषेतील ‘अरॅक्‍नी’ म्हणजे कोळी या शब्दावरून. कीटक आणि कोळी हे दोन्ही जरी संधीपाद जीव असले, तरी त्यांच्यात अनेक मूलभूत फरक आहेत. त्या फरकांची आपण थोडक्‍यात ओळख करून घेऊ.

शरीर रचना : कीटकांच्या शरीराचे तीन मुख्य खंड असतात. हेड, थोरॅक्‍स आणि ॲब्डोमेन. डोके, छाती आणि पोट. छातीला पाय आणि पंख जोडलेले असतात. अष्टपादांमध्ये शरीराचे दोनच मुख्य खंड असतात. सेफॅलोथोरॅक्‍स आणि ॲब्डोमेन. सेफॅलस म्हणजे डोके. या जीवांचे डोके आणि छाती एक झालेली असते. कोळ्याचे किंवा विंचवाचे निरिक्षण केलेत (प्रत्यक्ष किंवा फोटोत) तर तुम्हाला हे नीट कळेल.

पाय : कीटकांना एकूण सहा पाय असतात, तर कोळ्यांना आठ. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीवर चालणारे लाल रंगाचे वेलवेट माईट्‌स दिसतात. तेसुद्धा याच अष्टपाद जीवांच्या कुळातले जीव आहेत. पण यांची गंमत म्हणजे यांना पिल्लावस्थेत सहाच पाय असतात. पण ॲडल्ट होत जातात तशी त्यांना पायाची चौथी जोडी उगवते आणि आठ पाय पूर्ण होतात.

शुंडा : जवळ जवळ सर्व कीटकांना डोक्‍यावर अँटिने म्हणजे शुंडा असतात. अष्टपाद जीवांना शुंडा नसतात.

पंख : जवळ जवळ सर्व कीटकांना आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये पंख असतात. अष्टपाद जीवांना पंख नसतात.                  

आता आपण अष्टपाद कुळातल्या कोळी या प्रकाराची माहिती घेऊ. कीटकसृष्टीतील अनेक कीटकांच्या जातींप्रमाणेच कोळ्यांमध्येही प्रचंड वैविध्य आढळते. कोळ्याच्या तोंडात विषारी दंश करणारे अवयव असतात. त्यांच्या साहाय्याने ते भक्ष्याच्या शरीरात विष टोचून त्याला बधिर किंवा मृत करतात आणि त्याचे भक्षण करतात. बहुतांशी कोळ्यांचे विष माणसासाठी निरूपद्रवी असते. कोळ्यांची दृष्टी क्षमता फार प्रगत नसली तरी जाती प्रजातींनुसार त्यांना आठ ते बारा डोळे असतात, ज्यामुळे त्यांना चौफेर दृष्टी मिळते. कोळ्याच्या पोटाच्या शेवटच्या भागात सात ते आठ ग्रंथी असतात, ज्यातून जाळे विणण्यासाठी आवश्‍यक असे विविध ताकदीचे आणि चिकटपणा असलेले सिल्क निर्माण होते. कोळी गरजेनुसार एकापेक्षा अधिक प्रकारचे सिल्क एकत्र विणून कमीअधिक मजबुतीचे धागे तयार करतात. कोळ्यांच्या पायामध्ये विशिष्ट अवयव असतो (लायरीफॉर्म ऑर्गन), ज्यामुळे त्यांना जाळ्यात अडकलेल्या कीटकाची जाणीव होते. कीटकाच्या हालचालीमुळे निर्माण होणारे सूक्ष्म व्हायब्रेशन्स हा अवयव टिपतो. प्रत्येक कोळी जाळे विणतो हा अनेकांचा गैरसमज असतो. फिशिंग स्पायडरसारखे कोळी जाळे न विणताही पाण्याखाली जाऊन शिकार करतात. आपल्या घरात आढळणारे चिंटुकले जंपिंग स्पायडर मोठी झेप घेऊन माशी किंवा इतर कीटक पकडतात. त्यांनाही सिल्क निर्माण करता येते पण त्याचा उपयोग ते जाळे विणण्याऐवजी इतर उपयोगासाठी करतात. काही कोळी बिळे खणून त्याच्या तोंडाशी सिल्कचे अस्तर करतात व त्याचे काही धागे बिळात घेऊन जाऊन त्यावर पाय ठेवून बसतात. जेणेकरून, बिळाच्या दाराशी जाळ्यावर बसलेल्या कीटकाने हालचाल केली, की जेमतेम अर्ध्या सेकंदात त्यांना बाहेर येऊन शिकार करता येते. मी अंबोलीत अशाच एका ‘ट्रॅपडोअर स्पायडर’ला थक्क करणाऱ्या वेगाने मॉथची शिकार करताना पाहिले होते. कोळ्यांमध्ये ‘रेकग्निशन’ म्हणजे आपल्या जातीतील सदस्याची ओळख हा प्रकार नसतो. कोळ्याच्या बहुतांशी जातीत मादी अंड्यांची काळजी घेते. पण पिल्ले बाहेर आल्यावर ती त्यांची शिकार करू शकते. या उलट वुल्फ स्पायडरसारख्या जातीत, ज्यात आई अंडी उबेपर्यंत त्यांना पोटाभोवती घेऊन हिंडते, त्यात तिची पिल्ले तिलाच खाताना अनेक वेळा आढळले आहे. पिल्लांच्या या वर्तनाला ‘मॅट्रीफॅगी’ असे नाव आहे. आहे ना आपले प्राणिविश्‍व खरोखर अजब?

संबंधित बातम्या