कोळ्यांच्या गमतीजमती 

मकरंद केतकर
सोमवार, 8 जुलै 2019

निसर्ग कट्टा
 

मागच्या लेखात आपण कोळ्यांची शारीरिक वैशिष्ट्यं पाहिली. उत्क्रांतीमध्ये, भवतालात झालेल्या बदलांना प्रतिसाद म्हणून गरजेनुसार शारीरिक रचनेत आणि शिकारीच्या पद्धतीत बदल होत गेले. जाळं विणून शिकार करणं, या पद्धतीला पर्याय म्हणून झेप घेऊन शिकार करणं, पाठलाग करून शिकार करणं, जमिनीच्या जवळ लटकून राहून शिकार करणं, बिळ खणून त्यात लपून राहून शिकार करणं, पाण्यात शिरून शिकार करणं अशा विविध पद्धती विकसित होत गेल्या. असंख्य कुळं आणि त्यांची असंख्य वैशिष्ट्यं. आपण यातल्या काही जातींची वैशिष्ट्यं पाहू. 

कोळ्यांमध्ये नरापेक्षा मादी आकारानं मोठी असते. खूप मोठी. हिवाळ्यात आपल्या इथल्या जंगलात सापडणाऱ्या भल्यामोठ्या जायंट वूड स्पायडरच्या मादी आणि नराच्या आकाराची तुलना करायची झाली, तर मादीच्या तुलनेत नर म्हणजे संत्र्याशेजारी शेंगदाणा ठेवल्यावर दिसेल तितका लहान दिसतो. समागमाच्या काळात प्रेईंग मॅंटीसप्रमाणंच कोळ्याचीही मादी नराला खाऊ शकते. म्हणून मादीच्या थेट जवळ न जाता नर तिच्यापासून काही अंतर ठेवून विशिष्ट पद्धतीनं धागे हलवून नृत्य करतात. मादी जर राजी नसेल, तर त्यांच्यावर हल्लाही करू शकते. पण ‘कदमोंका बेहतरीन इस्तेमालही उनको मंजिल के करीब ले जाता है।’ जाळं विणणारे सिग्नेचर स्पायडर्स आपल्या जाळ्याच्या चारही टोकांना सही केल्यासारख्या खुणा करतात. याचं कारण कदाचित असं असावं, की त्यांचं जाळं जंगलात कमी उंचीवर असतं. त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांना ते लांबूनच दिसावं यासाठी ही युक्ती असावी असा संशोधकांचा अंदाज आहे. रानावनात हिंडताना झाडांच्या मुळाशी पांढरी जाळी व मध्यभागी नळी अशी रचना असलेल्या जाळ्या दिसतात. रॉकेल ओतायच्या फनेलसारखा यांचा आकार दिसतो म्हणून यांना ‘फनेल वेब स्पायडर’ असं म्हणतात. या फनेलच्या नळीच्या दारात कोळी लपून बसतो आणि किडामुंगी त्यात अडकली, की विजेच्या वेगानं बाहेर येऊन त्याला आत घेऊन जातो. सर्व कोळ्यांच्या मुखामध्ये ‘चेलीसरी’ (chelicerae) नावाचे अवयव असतात, जे विषग्रंथींमधून विष ओढून टोचायचं काम करतात. नेटकास्टिंग स्पायडरसारख्या जाती भलंमोठं जाळं विणायचे कष्ट न घेता पुढच्या पायांमध्ये ताणून धरता येईल असं छोटसं आयताकृती जाळं विणतात. जमिनीच्या जवळ असलेल्या एखाद्या फांदीवरून धाग्याच्याच सहाय्यानं खाली डोकं वर पाय पद्धतीत लटकून पुढच्या पायात जाळं ताणून धरून दबा धरून बसतात. जमिनीवरून चालणारं भक्ष्य त्यांच्या टप्प्यात आलं, की पायात धरलेलं जाळं त्याच्या अंगावर दाबतात आणि त्याची शिकार करतात. 

फुलांमध्ये लपून शिकार करणारे क्रॅब स्पायडर्स तर अजूनच भन्नाट असतात. ज्या रंगाचं फूल त्या रंगाचा क्रॅब स्पायडर. माझ्या डोंगरभटकंतीत करवंदाची फुलं तोडून खाण्याच्या नादात फुलांबरोबर एक-दोन वेळा हे क्रॅब स्पायडर्सही चिमटीत आले आहेत. पावसाळ्यानंतर सह्याद्रीत सोनकीची पिवळीधम्मक फुलं बहरतात. या बहराचा फायदा घेण्यासाठी मधमाशा घोंगावू लागतात. पिवळ्या फुलांमध्ये बेमालूम मिक्‍स होणारे पिवळ्या रंगाचे क्रॅब स्पायडर्स दबा धरून बसतात आणि मधमाशी फुलावर आली, की खेल खतम! आपल्या घरात आढळणारे चिंटुकले जंपिंग स्पायडर्स त्यांच्या लांबीपेक्षा कितीतरी पट मोठी झेप घेऊन शिकार करतात. माणसानं फुटबॉलचं मैदान एका झेपेत पार करण्याशी याची तुलना करता येईल. यातल्याच काही जातीतले कोळी दुसऱ्या जातीच्या कोळ्यांची शिकार करतात. पावसाळ्यात ओढ्यांच्या काठावर दिसणारे फिशिंग स्पायडर्स पाण्यावर तरंगत राहतात आणि मासा जवळ आला, की झडप घालून शिकार करतात. सगळंच अद्‌भुत. पण मी पाहिलेली सर्वांत अद्‌भुत गोष्ट सांगू? मेळघाटात हिंडत असताना एका फांदीच्या टोकाकडं माझं लक्ष गेलं. एक चिंटुकला स्पायडर हवेमध्ये सिल्कचा धागा सोडत होता. तो धागा लांब लांब होत गेला. वाऱ्याची एक हलकीशी झुळूक आली आणि त्यावर त्या धाग्याच्या सहाय्यानं स्वार होऊन तो कोळी अलगद तरंगत तरंगत दिसेनासा झाला...

संबंधित बातम्या