आगंगंगंगंगं... विंचू चावला 

मकरंद केतकर
सोमवार, 15 जुलै 2019

निसर्ग कट्टा
 

कोळ्यांनंतर बहुसंख्येनं आढळणारे अष्टपाद जीव म्हणजे विंचू. कोट्यवधी वर्षांपासून त्यांच्या शरीरात कुठलाही बदल झालेला नसल्यानं त्यांना जिवंत जीवाश्‍म म्हणतात. अतिशय वेदनादायक विषाचा डंख मारणारा विंचू हा वास्तविक घाबरट जीव आहे. आठ पाय, दोन चिमटे आणि एक नांगी यांच्या सहाय्यानं विलक्षण आयुष्य जगणारा हा जीव निसर्गात कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची मोठी भूमिका बजावत असतो. कोळ्याप्रमाणंच विंचवालाही आठ किंवा अधिक डोळे असतात. मात्र त्यांची दृष्टी काहीशी अधू असते. विंचू हा असा एकमेव प्राणी आहे, ज्याच्याकडं विशिष्ट प्रकारची ज्ञानेंद्रियं असतात, जी इतर कुठल्याही प्राण्यांमध्ये आढळत नाहीत. उदा. चिमट्यावर ३५ ते ८० च्या संख्येत असलेले केस जे ३६० अंशातून फिरू शकतात व त्यातून त्यांना तापमान तसंच वाऱ्याच्या दिशेचं ज्ञान मिळतं. त्यांच्या पोटावर असलेली कंगवेंद्रिय (pectines), स्पर्श, वास आणि तापमान यांचं ज्ञान त्यांना करून देतात. इतर अष्टपादांप्रमाणंच पायांवर असलेली खाचेंद्रिय (Slit sense organs) त्यांना दबावाचं ज्ञान देतात. विंचू जशी कीटकांची शिकार करतात, तसेच ते पक्षी, छोटे सस्तन प्राणी व इतर सरीसृपांचीही शिकार करतात. विंचवांचे चयापचय (metabolism) मंद असते. त्यामुळं खाद्य न मिळाल्यास ते सहा महिने ते एक वर्षसुद्धा अन्नावाचून जगू शकतात. विंचवांच्या शिकाऱ्यांमध्ये मांजर, कोल्हे, खोकड, लांडगा, बिबट्या, वाघ इत्यादी सस्तन प्राणी व पक्ष्यांमध्ये विशेषकरून सर्वजातीची घुबडं, साळुंक्‍या आणि बगळे इत्यादींचा समावेश होतो. विंचू हे मुख्यतः निशाचर जीव असल्यानं घुबडांकडून त्यांची शिकार होण्याचं प्रमाण जास्त आहे. कीटक व कोळ्यांप्रमाणंच विंचूही अपृष्ठवंशीय वर्गात येतात. त्यांच्या शरीरात पाठीचा कणा नसून अंगावर कडक कवच असतं. या कवचाचीसुद्धा एक गंमत आहे. कवचात बीटा कार्बोलीन नावाचं एक संयुग असतं. हे संयुग अतिनील किरण रिफ्लेक्‍ट करतं. अतिनील प्रकाश निर्माण करणाऱ्या विजेरीनं (अल्ट्राव्हायोलेट टॉर्च) अंधारात पाहिलं असता त्यांचं कवच अंधारात निळ्या हिरव्या रेडियमसारखं चमकतं व त्यांना शोधणं अगदी सोपं जातं. अनेक प्रकारचे कीटक, खेकडे तसेच कोळ्यांप्रमाणंच, वाढ होताना विंचूसुद्धा ठराविक कालावधीनंतर कात टाकतात. म्हणजे, आकार वाढला की जुन्या कवचाचा त्याग करतात. नवीन कवच मऊ असतं व ते वाळून कडक होईस्तोवर त्यांना शिकाऱ्यांकडून अधिक धोका असतो. पूर्ण वाढ होईस्तोवर साधारण सहा ते सात वेळा कात टाकली जाते.

विंचवाची प्रजननाची पद्धत अनोखी आहे. कोळ्यांप्रमाणंच विंचवांमध्येही स्वजातीभक्षण (कॅनिबलिझम) हा प्रकार आढळतो. त्यामुळं नराला समागमापूर्वी अतिशय सावधपणे मादीच्या जवळ जावं लागतं. मादी नरापेक्षा आकारानं मोठी असते. विशिष्ट पद्धतीनं थरथरत नर तिच्याजवळ येतो आणि सावधपणे तिच्या नांगीपासून स्वतःचा बचाव करत तिचे दोन्ही हाताचे चिमटे आपल्या हातात धरून नृत्य करतो. काही मिनिटं हे नृत्य चालतं. बहुधा आपला हेतू स्पष्ट करण्यासाठी हे नृत्य होत असावं. त्यानंतर नर आपली शुक्राणूभारीत पिशवी (spermatophore) विशिष्ट अंशात कोन करून जमिनीवर चिकटवतो आणि मादीला ओढत आणून त्यावर बसवतो. मादी अलगदपणे ते शोषून घेते. यानंतर नर तिथून पळ काढतो अन्यथा त्याची शिकार होण्याचा धोका असतो. जातीप्रजातींमधल्या फरकानुसार, दोन ते अठरा महिन्यांनी मादी अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देते. मादी नवजात पिल्लांना, दोन ते तीन काती टाकून सक्षम होईपर्यंत आपल्या पाठीवर घेऊन हिंडते. यालाच आपण ‘विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर’ असं म्हणतो. त्यानंतर पिल्लं आपापल्या मार्गानं निघून जातात. विंचवाचं विष त्याच्या शेपटीच्या टोकाला असलेल्या नांगीत असतं. ते त्याच्या भक्ष्यासाठी जरी घातक असलं, तरी मनुष्यासाठी प्रत्येक जातीचं विष घातक नसतं. कोकणात आढळणाऱ्या ‘हॉटेनटोटा’ या कुळातल्या विंचवाच्या दंशानं अनेक लोकांचे प्राण जात असत. यावर महाड येथे कार्यरत असलेल्या डॉ. हिंमतराव बावस्करांनी औषध शोधून काढलं; ज्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला.

संबंधित बातम्या