सॅंड बबलर क्रॅब 

मकरंद केतकर
सोमवार, 22 जुलै 2019

निसर्ग कट्टा
 

मंडळी, आजच्या लेखात आपण ‘क्रस्टेशियन्स’ म्हणजे कवचधारी जिवांची ओळख करून घेऊ. क्रस्टेशियन्स संधिपाद जिवांच्याच कुळात येतात. यातले बहुतांश जीव पाण्यात राहतात. यामध्ये लॉबस्टर्स, कोळंबी, कालवं असे विविध जीव आढळतात. त्यांच्यात विविधताही प्रचंड आहे. जमिनीवर मात्र खेकड्यांसारखे काही मोजकेच जीव आढळतात. टणक, परंतु लवचिक कवच हे या वर्गातल्या प्राण्यांचं वैशिष्ट्य. असं म्हणतात, की जमिनीवर जितकी जीविधा आढळते त्याच्या कैकपट जीविधा समुद्रामध्ये आहे. हा अंदाज चुकीचा असण्याचं तसं काही कारण नाही. कारण पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी ७२ टक्के भाग हा समुद्रानेच व्यापलेला आहे. किंबहुना ‘पृथ्वीवर आधी फक्त पाणीच होतं आणि जमीन नंतर तयार झाली’ असाही एक मतप्रवाह आहे. ते काही असो, पण याच जमिनीवर उभं राहून अथांग समुद्र न्याहाळणं, समुद्रातून किनाऱ्यावर आलेली शंखशिंपलेरुपी रंगीबेरंगी आश्‍चर्य गोळा करणं, किनाऱ्यावरच्या वाळूत तुरूतुरू चालणारे खेकडे पाहणं; तसंच त्यांनी वाळूपासून केलेल्या बॉलबेअरिंगसारख्या छोट्या गोळ्यांचं नक्षीचं कौतुक करणं आवडत नाही असा माणूस फारच विरळा. वाळूचे हे गोळे तयार करणारा कलंदर कलाकार म्हणजेच सॅंड बबलर क्रॅब.  

समुद्रामध्ये प्रत्येक क्षणाला बायो-डेब्रीस म्हणजे जैविक कचरा तयार होत असतो. जमिनीवर जसे गिधाडं, कावळे, घारी, तरस हे जीव स्वच्छता मोहीम राबवत असतात, तसेच हे खेकडे याच खरकट्या जैविक कचऱ्यातून आपला उदरनिर्वाह भागवत असतात. हे खेकडे दिनचर आहेत. जेमतेम दोन तीन सेंटीमीटर रुंदीचे हे खेकडे भरतीच्या काळात, वाळूत केलेल्या बिळाचं दार बुजवून आत लपून बसतात. या बिळांमध्ये हवा ट्रॅप केलेली असते. जिचा उपयोग त्यांना श्‍वसनासाठी होतो. यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या पायांवर पडद्यांसारखे (tympana) अवयव असतात जे त्यांना श्‍वसनास मदत करतात. जशी ओहोटी सुरू होते, तसे ते बिळांमधून बाहेर येऊन आपल्या नांग्यांच्या साहाय्यानं भराभर वाळू तोंडात सरकवायला सुरुवात करतात आणि तोंडातील विशिष्ट अवयवांद्वारे त्यातले अन्नघटक चाळून वेगळे करतात. ही क्रिया त्यांना वेगानं पार पाडावी लागते, कारण वाळू ओली असेपर्यंतच त्यांना हे करता येतं. प्रत्येक पूर्ण वाढलेला खेकडा वाळू चाळून एका मिनिटात सुमारे आठ सॅंडबॉल्स तयार करतो. पुन्हा भरती येईपर्यंत वाळू चाळून असे शेकडो गोळे ते तयार करतात. अर्थात ही संख्या जरी मोठी असली, तरी त्यातून मिळणारं अन्न हे ‘खोदा पहाड निकला चुहा’ एवढंच असतं. त्यामुळं ‘उदरंभरणं’चा त्यांचा हा खटाटोप वाळू ओली असेपर्यंत अखंड चालू असतो. 

हे सगळं काम त्यांना उघड्या छताखाली पार पाडायचं असल्यानं निसर्गानं यांचं रंगरूपही वाळूच्या कणांशी मिळतंजुळतं केलं आहे. वरून पाहिलं तर कवचाचा रंग व त्यावरील नक्षी वाळूसारखीच दिसते. त्यामुळं ते पटकन दृष्टीस पडत नाहीत. त्यांचा पळण्याचा वेगही प्रचंड असतो. म्हणजे तुलना करायची झाली, तर ‘उसेन बोल्ट’ जसा दहा सेकंदांत शंभर मीटर या वेगानं पळतो तसं. तसेच प्रत्येक खेकडा ही गोळेदार नक्षी तयार करताना त्याच्या बिळाच्या चारही दिशांनी वर्तुळाकार, अर्धवर्तुळ, ताराकृती अशा विविध पॅटर्न आणि अंतरामध्ये तयार करतो. या नक्षीमध्ये त्यानं बिळाच्या दिशेनं मोकळे असणारे रस्ते सोडलेले असतात. त्यामुळं संकटाची चाहूल लागताच त्यांना पटकन बिळात शिरून आसरा घेता येतो. पुनरूत्पादनाच्या पद्धतीमध्ये, समागमानंतर मादी तिची फलित अंडी पोटात असलेल्या कप्प्यांमध्ये सांभाळते व पिल्लं जन्माला आल्यावर कप्प्याचं दार उघडून त्यांना बाहेर सोडून देते. 

समुद्र किनाऱ्यावर या खेकड्यांच्या जोडीनं घोस्ट क्रॅब, पर्पल क्रॅब, रेड रीफ क्रॅब असे इतर कलंदर कलाकारही आढळतात व त्यांचीही दिनचर्या पाहात राहावी अशी असते. तेव्हा यापुढं जेव्हा कधी किनाऱ्यावर वाळूची नक्षी बघाल, तेव्हा त्या कलाकृतीला दाद देण्याबरोबरच निरीक्षणाचीही जोड देण्यास विसरू नका.

संबंधित बातम्या