हर्मिट क्रॅब 

मकरंद केतकर
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

निसर्ग कट्टा
 

मागच्या लेखात आपण समुद्र किनाऱ्यावरच्या खेकड्याबद्दल जाणून घेतलं. आज आपण त्याच किनाऱ्यावर आढळणाऱ्या अजून एका वैशिष्ट्यपूर्ण जिवाची माहिती घेऊ. 

समुद्राच्या अक्षय लाटा आणि त्यांच्या भरतीओहोटीमुळं किनाऱ्यावर बहरणारं जीवन सगळ्यांनाच भुरळ घालतं. वाळूतले शंख-शिंपले गोळा करायला आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच. अशाच एखाद्या सहज म्हणून उचललेल्या शंखाला अचानक पाय फुटतात आणि दचकून प्रश्‍न पडतो की हे काय आहे? ही गंमत आहे हर्मिट क्रॅब नावाचा समुद्री जीव! 

हर्मिट क्रॅब्स हेसुद्धा आर्थ्रोपोडा या फायलममधले म्हणजे संधीपाद जीव आहेत. कीटक, विंचू, कोळी, खेकडे आदी जीव या फायलममध्ये येतात. हर्मिट क्रॅबच्या नावामध्ये जरी क्रॅब असलं आणि दिसायला काहीसा खेकड्यासारखा असला, तरी हा खेकडा नाही. याचं वरचं अर्धं शरीर कठीण कवचानं तयार झालेलं असतं, तर उरलेलं अर्धं शरीर सोललेल्या कोळंबीसारखं मृदू असतं. याच उर्वरीत मृदू शरीराचं रक्षण करण्यासाठी हे जीव शंखासारख्या लांबुडक्‍या आयत्या घराचा आसरा घेतात. या जीवांमध्ये मीलनानंतर मादी समुद्रात जाऊन अंडी घालते. या अंड्यामधून बाहेर आलेले हर्मिट क्रॅब्स अळ्यांसारखे दिसणारे सूक्ष्म जीव असतात; जे पाण्यावर तरंगत राहतात. या काळात ते पाण्यावर तरंगणारे सूक्ष्म जीव तसेच वनस्पतींचे अवशेष खाऊन वाढतात. सहा ते सात टप्प्यांमधून गेल्यानंतर त्यांचे पाय, चिमटे व इतर अवयव विकसित होतात. नंतर ते आसऱ्याच्या शोधात किनाऱ्यावर किंवा समुद्रतळाशी जातात. एखादा चांगलासा शिंपला किंवा शंख बघून ते त्यांचं मृदू पोट त्यात सरकवतात. सुरुवातीच्या काळात वाढत्या शरीरामुळं त्यांना दर महिन्याला नवीन घर शोधावं लागतं. मात्र प्रौढावस्थेत आल्यानंतर ते वर्षं-दीड वर्षानंतर घर बदलतात. प्रौढावस्थेत त्यांच्या आकारवाढीचं प्रमाणही अगदी नगण्य असतं. तसंच नवीन घराच्या लांबी - खोली वगैरेनुसार त्यांच्या शरीराच्या वाढीचा वेग ठरतो. आतून गुळगुळीत असलेल्या शंखातून निसटू नये म्हणून त्यांच्या पोटाचा आकारही वक्र असतो. ज्यामुळं त्यांना शंखाच्या आत व्यवस्थित ग्रीप घेता येते. अर्थात नवीन घरासाठी शंखच पाहिजे असं काही नसतं. नारळ, शिंपले, गोगलगायींची कवचं आणि अगदीच वेळ पडली, तर बीचवर असलेल्या छोट्या रिकाम्या बाटल्या, डबे इत्यादीसुद्धा यांना घरासाठी चालू शकतात. संकटकाळात चटकन शंखाच्या आत जाऊन लपता येणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं घराच्या बाबतीत ते अगदी ‘चुझी’ असतात. त्यामुळं असं चांगलं घर मिळवण्यासाठी प्रसंगी त्यांच्यात मारामाऱ्याही होतात. सुमारे अकराशे जातींच्या या हर्मिट क्रॅबच्या कुटुंबात काही जाती समुद्रतळाशी राहतात, तर काही किनाऱ्यावर राहतात. किनाऱ्यावर राहणाऱ्या जातींना त्यांचे कल्ले ओले ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळं ते ओल्या किनाऱ्यापासून फार लांब जात नाहीत. या जिवांची गुजराण वनस्पतिजन्य पदार्थ, तसेच इतर जैविक पदार्थ खाऊन होते. जातीप्रजातींनुसार दहा ते सत्तर वर्षं इतकं प्रदीर्घ आयुष्य जगणाऱ्या या जिवांचे मुख्य शत्रू विविध पक्षी, मासे, खेकडे इत्यादी जीव आहेत. त्यामुळं ते सदैव आपला जीव मुठीत - आय मीन शंखात, धरून हिंडत असतात. यांच्या घर बदलण्याच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची नोंद झाली आहे. ती म्हणजे विविध आकाराचे हर्मिट क्रॅब्स किनाऱ्यावर एकत्र येतात आणि मोठ्यापासून लहानांपर्यंत अशा एका ओळीत एकामागोमाग एक उभे राहतात. मग सगळ्यात मोठा जो असतो, तो त्याच्या नव्या शोधलेल्या मोठ्या घरात प्रवेश करतो. मग त्याच्या मागचा त्याच्या रिकाम्या झालेल्या घरात, मग त्याच्या मागचा याच्या शंखात; अशा पद्धतीनं पटापट सगळे आपापल्या नव्या मोठ्या घरात शिरतात. स्वयंशिस्तीनं होणारा तडजोडीचा हा वस्तुपाठ आपल्यालाही अंगिकारायला हरकत नाही, नाही का?

संबंधित बातम्या