स्टारफिश आणि जेलीफिश 

मकरंद केतकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

निसर्ग कट्टा
 

मंडळी, या लेखात समुद्र किनाऱ्यावर हिंडताना आपल्याला दिसू शकणाऱ्या अजून दोन जीवांची माहिती घेऊ आणि पुढच्या लेखापासून सरीसृपांच्या विश्वात डोकावू. किनाऱ्यावर तुमच्यातील अनेकांनी तारामासा ऊर्फ सी-स्टार पाहिला असेल. पण खरंतर हा मासा नाही. हा एक अपृष्ठवंशीय जीव आहे. या जीवांमध्ये सर्वांत महत्त्वाचे अवयव म्हणजे त्यांचे हात. त्यांच्यामध्ये जातीवैविध्यानुसार पाच, दहा, वीस, चाळीस असे विविध संख्येने हात आढळतात. या हातांमध्येच त्यांच्या शरीरातले अनेक महत्त्वाचे अवयव असतात. हातांच्या खाली छोट्या छोट्या नळ्यांसारखे दिसणारे शेकडो ‘सक्शन ट्यूब’सारखे अवयव असतात. या ट्यूब्जच्या साहाय्याने ते शिंपले, कालवं इत्यादी भक्ष्यांचे घट्ट बंद असलेल्या कवच्याचे दरवाजे उघडतात आणि सावकाश शरीराच्या मध्यभागी असलेल्या तोंडापाशी नेतात. मग आतून चक्क त्यांचं पोट बाहेर येतं आणि त्या उघडलेल्या शिंपल्यात शिरून आतल्या प्राण्याला खेचून घेतं. सी स्टारचे अगदीच अविकसित असे डोळे त्यांच्या हातांच्या टोकाला असतात, ज्यातून त्यांना उजेड आणि अंधार एवढंच कळतं. 

त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुटलेल्या अवयवाचं पुनर्निर्माण. एखाद्या शिकाऱ्यानं केलेल्या हल्ल्यातून बचावताना अनेकदा त्यांचे हात तुटतात. यानंतर शरीराचा तुटलेला हात तर पुन्हा निर्माण होतोच पण काही जातींमध्ये तुटून पडलेल्या हातापासूनही संपूर्ण नवीन तारामासा जन्माला येतो. तारामासा हालचालीसाठी हातांच्या खाली असलेल्या शेकडो ट्यूब्जचा वापर करतो. या ट्यूब्ज, तसं पाहिलं तर अगदी दुर्बळ असतात. पण त्यांना ताकद देण्यासाठी तो समुद्राचं पाणी शरीराच्या वरती व मध्यभागी असलेल्या ‘सीव्ह प्लेट’ नावाच्या एका छिद्रातून आत खेचून ट्यूब्जमध्ये पंप करतो. ज्यामुळं त्या नळ्यांमध्ये ताठरता येते आणि त्यांच्या साहाय्यानं तो चालू शकतो. अशी अदभुत शक्ती लाभलेला हा तारामासा पाण्याबाहेर मात्र जगू शकत नाही. 

आता आपण बघू जेलीफिश या अजून एका भन्नाट जीवाची दुनिया... किनाऱ्यावर वाहून आलेले हे जीव आपण कधीतरी पाहिले असतील. अत्यंत नाजूक पारदर्शक असा पिशवीसारखा असलेला हा जीव मासा नाही. कारण त्याला पाठीचा कणा नाही. एवढंच काय तर त्याला मेंदू, रक्त, अस्थी, कल्ले, हृदय यातलं काहीच नसतं. ९५ टक्के पाणी आणि मेसोग्लिआ नामक जेलीसदृश द्रव्यानं बनलेले आणि पुष्कळ तंतूभुजा असलेले हे जीव समुद्रातील सूक्ष्म जीवांवर गुजराण करतात. पोटातल्या खळग्यात पाणी ओढून घेऊन त्यातले सूक्ष्मजीव फिल्टर केले जातात. काही मोठे जेलीफिश - मासे व इतर कवचधारी प्राणी खाऊन जगतात. एक सेंटिमीटर इतक्या छोट्या जेलीफिशपासून शंभर फूट लांब भुजा असलेला जेलीफिश इतकं प्रचंड वैविध्य या जीवांमध्ये आढळतं. 

जेलीफिश मुख्यतः ओळखले जातात ते त्यांच्या भुजांमध्ये असलेल्या विषारी डंखांमुळं. या भुजांवर असलेल्या पेशींना नायडोसाईट्स (cnidocytes) म्हणतात; ज्यात विषारी काटे असतात. या पेशींना बाहेरून स्पर्श झाला, की त्यांचं आवरण फाटून त्यात समुद्राचं पाणी शिरतं आणि त्या प्रेशरनं आतले विषारी काटे सेकंदाचा लाखावा भाग इतक्या कमी वेळात स्पर्श करणाऱ्या जीवाच्या शरीरात टोचले जातात. मनुष्याच्या दृष्टीनं जातीप्रजातींनुसार या विषाची तीव्रता कमीजास्त असू शकते. बॉक्स जेलीफिश हा प्रकार मनुष्यासाठी घातक मानला जातो. या विषामुळं पक्षाघात होतो. तसंच तीव्र दंशामध्ये हृदय बंद पडल्यामुळं मृत्यू होऊ शकतो. जेलीफिशचं पुनरुत्पादन अलैंगिक पद्धतीत पाण्यात शुक्राणू आणि अंडी सोडून आणि विभाजन पद्धतीत शरीराचं विभाजन करून केलं जातं. पण ‘इममॉर्टल जेलीफिश’ (Turritopsis dohrnii) नामक एक प्रजाती उपासमार झाल्यास अथवा तणावग्रस्त झाल्यास आपले अवयव झाडून टाकून चक्क परत बाल्यावस्थेत जाते व आयुष्य पुन्हा सुरू करते. जणू अमर्त्य जीवच. असं करू शकणारा हा पृथ्वीवरचा बहुधा एकमेव जीव आहे. बोलो निसर्गबाबा की.. जय!

संबंधित बातम्या