सरीसृप 

मकरंद केतकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

निसर्ग कट्टा
 

दोस्तांनो, वनस्पती तसेच अपृष्ठवंशीय जीवसृष्टीची अद्‍भुत वैशिष्ट्यं पाहिल्यानंतर आपण आता पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जगाचा दरवाजा उघडू आणि पुढच्या काही लेखांमधून बेडूक, साप, पाल, देवपाल, देवगांडूळ, कासव, मगर अशा आपल्या परिचयाच्या विविध मित्रांची ओळख करून घेऊ. सुरुवातीला आपण उभयचरांची माहिती घेऊ. 

सुमारे तीस कोटी वर्षांपूर्वी पाण्यातून जमिनीवर आलेले पहिले पृष्ठवंशीय उभयचर जीव म्हणजे बेडकांचे खापर खापर खापर वगैरे पणजोबा. या प्राण्यांना जीवनचक्राच्या सुरुवातीला व काही प्रकारांमध्ये उर्वरित आयुष्यातही पूर्णवेळ पाण्याची आवश्यकता असते. म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. उभयचरांची परिपूर्ण व्याख्या करायची झाल्यास - उष्माग्राही (poikilothermic), त्वचाश्वासी (skin breathers), अनावृत त्वचेचे (with naked skin) आणि त्रिकक्षीय हृदयाचे (with three chambered heart) अशी करता येईल. संपूर्ण जगात उभयचरांच्या सुमारे ७ हजार प्रजाती आढळून येतात. त्यांपैकी ९० टक्के प्रजाती बेडूक व भेकांच्या आहेत. सर्वांत छोटा बेडूक न्यू गिनी येथील पेडोफ्राइन अमाउएनसीस (Paedophryne amauensis)- ७.७ मिमी इतक्या लहान आकाराचा असून उभयचरातील सर्वांत मोठा प्राणी अ‍ॅन्डरीआस डेव्हिडीअ‍ॅनस (Andrias davidianus) ऊर्फ Chinese giant salamander ही सुमारे १.८ मीटर आकाराची देवपाल आहे. परंतु नामशेष झालेले अनेक उभयचर याहूनही मोठे होते. आत्तापर्यंतच्या ज्ञात नामशेष प्रजातींपैकी सुमारे ९ मीटर लांबीची प्रीओनोसुकस (Prionosuchus) ही ब्राझीलमधील प्रजाती सर्वांत मोठी आहे. भारतात उभयचरांच्या साधारण ३५० हून अधिक प्रजाती आहेत व संशोधनामुळं त्यात नित्य नवीन प्रजातींची भर पडत आहे. उदा. पुणे येथील डॉ. आनंद पाध्ये, शौरी सुलाखे आणि टीमनं २०१७ मध्ये सासवड येथून प्रकाशात आणलेला उकऱ्या बेडूक (Sphaerotheca paschima). जैवविविधतेनं संपन्न असणाऱ्या पश्चिम घाटात उभयचरांच्या सुमारे १५० च्या आसपास प्रजाती आढळतात, तर उर्वरित महाराष्ट्रात उभयचरांच्या सुमारे ५० प्रजाती आढळतात. 

उभयचरांचे मुख्य तीन वर्ग पाडता येतात, 
१) अपुच्छ (Anura) उदा. बेडूक (Frogs) आणि भेक (Toads). 
२) सपुच्छ (Urodela) उदा. देवपाल (Salamander) 
३) अनवृतसर्प (Gymnophiona) उदा. देवगांडूळ (Caecilian). 
महाराष्ट्रात यातील अपुच्छ व अनवृतसर्प याच प्रवर्गातील उभयचर आढळून येतात. यापैकी अनावृतसर्प प्रवर्गातील उभयचर हे सार्द्र व नियमित पावसाच्या सदाहरित वनांमध्येच जीवनमान व्यतीत करू शकत असल्यानं महाराष्ट्रात फक्त पश्चिम घाटाच्या परिसरातच आढळून येतात. महाराष्ट्रात यांच्या ६ प्रजाती आढळून येतात. 

पुच्छ प्रवर्गातील उभयचरांच्यादेखील बहुतेक प्रजाती पश्चिम घाटात आढळून येत असल्या तरी त्यांच्यामधील, कमी आर्द्रतेत व थोड्या जास्त तापमानात आणि अनियमित पावसाळी प्रदेशात राहू शकणाऱ्या प्रजाती संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतात. बेडूक आणि भेक यांच्यातील फरक म्हणजे, बेडकांची त्वचा पातळ, ओलसर, गुळगुळीत व बुळबुळीत असते. त्यावर लांबट वळकट्या व पुटकुळ्या (tubercles) असतात. बेडकांच्या तुलनेत भेकांची त्वचा जाडीभरडी, कोरडी व खडबडीत असते. त्यामुळं भेक सहसा पाण्यापासून दूर कोरड्या वातावरणातही राहू शकतात. भेकांच्या मानेवर डोळ्यांच्या मागं पॅरॉटीड ग्रंथी असतात. शिकाऱ्यानं केलेल्या हल्ल्यादरम्यान या ग्रंथी जोरात दाबल्या गेल्यास त्यातून विषारी पदार्थ बाहेर येतो व भक्षक त्या कडवट चवीमुळं भेकाला थुंकून टाकतो. एवढं असूनही साप मात्र भेकांची व्यवस्थित शिकार करतात. माणसाला या विषापासून काहीही धोका नाही. किंबहुना हाताळल्यावर माणसाला धोकादायक ठरेल असा कुठलाच बेडूक अथवा भेक भारतात आढळत नाही. 

पुढच्या लेखात आपण बेडकांच्या जीवनचक्राची माहिती घेऊ.

संबंधित बातम्या