पाल 

मकरंद केतकर
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

आपल्या घरात सहज दिसणारा आणि निरुपद्रवी असला तरी अनेकांना अत्यंत किळसवाणा व भीतीदायक वाटणारा सरपटणारा प्राणी म्हणजे पाल. पाल खरंतर अत्यंत भेदरट जीव आहे. मऊ शरीराची, मोठ्ठे डोळे असणारी आणि सर्रकन इकडून तिकडं पळणारी पाल पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. या भीतीचं मूळ माणसाच्या उत्क्रांतीमध्ये आहे. रानटी अवस्थेत जीवन जगत असताना पाल, साप वगैरे जीवांबद्दल अज्ञान असल्यानं त्यांच्याबद्दल भीती रुजत गेली. पिढी दर पिढी ही भीती तशीच पास-ऑन - संक्रमित होत गेली. त्यामुळंच आजही पाल पाहून अनेकजण दचकतात. 

तर असा हा वास्तविक निरुपद्रवी असणारा जीव कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये असलेल्या पालीच्या एका जीवाश्माचं वय दहा कोटी वर्षं आहे. इतर सरीसृपांप्रमाणंच पालही थंड रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे, त्यांना शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी उष्णतेच्या बाह्यस्रोताची गरज असते. अन्नामधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून ते शरीराचं तापमान स्थिर ठेवू शकत नाहीत. त्यामुळं, अतिथंडी व अतिउष्णता हे दोन्ही त्यांना मारक ठरतं. पालीच्या जगभरात दोन हजारांहून अधिक प्रजाती आहेत. जेमतेम काही मिलीमीटर लांब पालीपासून काही फूट लांबीच्या पाली आढळतात. पालींच्या प्रजननामध्येही विविधता आढळते. काही जाती ‘पार्थिनोजेनिक’ असतात. म्हणजे सगळ्या माद्याच. नर नाहीच. दुसऱ्या प्रकारात नर मादी मीलन हा सर्वज्ञात प्रकार आढळतो. काही जातींत अंड्यामधून नवे जीव जन्माला येतात, तर काही जातींत ती अंडी पोटातच पक्व होऊन थेट पिलांना जन्म दिला जातो. हाच प्रकार सापांमध्येही आढळतो. 

बहुतांश पाली रात्री बाहेर पडतात. अंधारातही उत्तम दिसावं यासाठी त्यांचे डोळे मोठ्या आकाराचे असतात. तसंच त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रकाश ग्रहण करणाऱ्या पेशीही अधिक प्रमाणात असतात. त्यामुळं अगदी अंधुक प्रकाशातही त्यांना बऱ्यापैकी स्वच्छ दिसतं. आपल्याकडं जमिनीवर राहणाऱ्या ‘युब्लिफेरीडी’ कुळातल्या पाली सोडल्या, तर इतर पालींना डोळ्यांची पापणी नसते. त्यामुळं त्या जिभेनं चाटून स्वतःचे डोळे स्वच्छ करतात. पालींची त्वचा कोरडी असते आणि अनेक सूक्ष्म खवल्यांची बनलेली असते. सापांप्रमाणंच पालीही कात टाकतात. मात्र, ही कात सापाच्या कातीसारखी एकसंध न निघता तुकड्या तुकड्यात निघते. सापांप्रमाणंच पालींमध्येही मृत पेशी शरीरातून बाहेर टाकण्याची वेगळी व्यवस्था नसल्यानं सर्व मृत पेशींचा त्वचेवर एक थर साचतो व तो कातीच्या रुपानं वेगळा होतो. पालीच्या बोटांच्या तळव्याला अगदी सूक्ष्म केस असतात. हे केस आपल्या चपलेला असलेल्या ‘वेल-क्रो’प्रमाणं खालच्या पृष्ठभागाला चिकटतात व त्यामुळं पाल भिंतीवर उलटीसुद्धा चालू शकते. याच्याच जोडीला नखंही असल्यानं अधिक भक्कम पकड मिळते. पालीला उत्क्रांतीतून लाभलेलं वरदान म्हणजे शेपूट तुटून परत उगवणं. संकट काळात पाल झटका देऊन शेपूट तोडून टाकते. हल्लेखोराचं लक्ष वळवळणाऱ्या शेपटीकडं जातं व पाल तिकडून सटकते. यानंतर साधारण दोन महिन्यांच्या कालावधीनंतर ही शेपूट परत उगवते. 

या प्राण्याबद्दल विशेष तिरस्कार निर्माण होण्यामागं अजून एक गैरसमज म्हणजे पाल विषारी असते आणि ती अन्नात पडल्यानं विषबाधा होते. मी अभ्यासाच्या निमित्तानं अनेक पाली हाताळल्या आहेत आणि मला त्या चावल्याही आहेत. माझ्या अभ्यासानुसार सांगायचं, तर पालीच्या जबड्यात विष नाही आणि त्वचेतही नाही. त्यामुळं ती निश्चितच विषारी नाही. मग अन्नात विषबाधा कशी होते? पालीच्या आतड्यात सालमोनेलासारखे अनेक उपद्रवी बॅक्टेरिया असतात. पाल उकळत्या अन्नात पडते तेव्हा ती घाबरून विष्ठा करते आणि त्यामार्गानं बॅक्टेरिया अन्नात पसरून अन्न दूषित होते. म्हणून आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, की पाल विषारी नसून तिच्या शरीरातील बॅक्टेरियांमुळं अन्नात विषबाधा होते. 

संबंधित बातम्या