खा‘उन’ पि‘उन’ 

मकरंद केतकर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

मंडळी, मध्यंतरी काही जणांनी मला ‘थंड रक्ताचे जीव’ या संज्ञेबद्दल सविस्तर माहिती सांगण्याची विनंती केली. त्यानिमित्त हे थोडंसं अधिक... 

पृथ्वी म्हणजे निसर्गाची एक भन्नाट प्रयोगशाळा आहे. इथं त्यानं सर्वोत्तमाच्या निर्मितीसाठी सजीवसृष्टीच्या असंख्य महाकठीण परीक्षा घेतल्या. कोट्यवधी वर्षांच्या कसोट्या पार करून, अनेक जीवांना मागं सोडून, आज दिसतेय ती चराचर सृष्टी तयार झाली. निसर्ग हा जसा वैज्ञानिक आहे, तसाच तो उत्तम शिक्षकही आहे. फक्त तो आधी परीक्षा घेतो, नापासांना शिक्षा करतो आणि नंतर जगलेल्यांना धडा घ्यायला लावतो. या सर्व प्रयोगांमध्ये अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे ऊर्जा. सर्वसामान्यपणे जगात दोन प्रकारचे जीव आहेत. होमिओथर्मिक (उष्ण रक्ताचे) आणि पॉईकिलोथर्मिक (थंड रक्ताचे). थंड रक्ताचे प्राणी म्हणजे ज्यांचं रक्त थंडगार असतं ते प्राणी, असा अनेकांचा गैरसमज आहे. जे जीव सर्वसामान्य परिस्थितीत खाल्लेल्या अन्नाद्वारे ऊर्जा मिळवून शरीराचं तापमान नियंत्रित करतात त्यांना होमिओथर्मिक म्हणतात. पण जे जीव बाह्य स्रोतांद्वारे ही ऊर्जा मिळवतात व शरीराचं तापमान नियंत्रित करतात त्यांना पॉईकिलोथर्मिक म्हणतात. बहुतांश होमिओथर्मिक जीव ‘सोसेल इतपत उष्मा’ तसेच ‘मानवेल इतपत थंडी’ या प्रकारात शारीरिक क्रियांना वातावरणातील घटकांची जोड देऊन शरीराचं तापमान नियंत्रित करतात आणि दैनंदिन कार्य चालू ठेवतात. अर्थात दोन्हीचा अतिरेक असेल, तेव्हा मात्र ते सुप्तावस्थेत जातात. 

थंड रक्ताचे प्राणी मात्र बाह्य तापमानातील थोड्याफार फरकाच्याही बाबतीत संवेदनशील असतात आणि प्रतिकूल परिस्थितीत ते विश्रांती घेतात. त्यासाठी ते जमिनीखालच्या जागा किंवा झाडाच्या ढोल्या वगैरे निवडतात. या काळात त्यांच्या शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय अतिशय मंद होतं. ही अवस्था जवळपास मृतावस्थेसारखीच असते. शरीरात साठवलेली ऊर्जा अत्यंत काटेकोर पद्धतीनं वापरून, अनुकूल तापमान निर्माण होईपर्यंत विश्रांती घेतली जाते. ऊर्जा वाचवण्यासाठी त्यांचं हृदयही मिनिटाला केवळ चार किंवा पाच ठोके देऊन रक्त फिरवतं. शरीरात चरबीच्या रूपानं साठवलेली ऊर्जा या काळात वापरली जाते. या चरबीच्या आधारावर, एक पूर्ण वाढलेली मगर दोन दोन वर्षं काही न खाता जिवंत राहू शकते. अजगरसुद्धा वर्षभर या अवस्थेत जीव जगवू शकतो. अर्थात शरीरात चरबीचा साठा किती आहे, यावरही गोष्टी अवलंबून असतात. 

अर्थात बर्फ, वाळवंट, समुद्र अशा वेगवेगळ्या वातावरणात राहणाऱ्या सरीसृपांची प्रतिकूल तापमानाची व्याख्या वेगवेगळी असते. 

आपल्या येथील साप आणि सरड्यांच्या बाबतीत बोलायचं, तर साधारण ३० ते ३२ अंश सेल्सिअस तापमान त्यांच्या शरीराच्या योग्य चयापचयासाठी आवश्यक असतं. जसं त्याच्या खाली तापमान घसरतं, तशा त्यांच्या हालचाली मंदावतात. म्हणूनच भर पावसाळ्यातील थंडाव्यानंतर श्रावणामधे उघडीप येताच साप, सरडे आदी जीव उन्हं खायला उघड्यावर आलेले दिसू लागतात. आपल्याकडं बरोबर याच काळात श्रावणातला पहिला सण नागपंचमी हा आहे. यावरून आपल्या पूर्वजांची निरीक्षणशक्ती किती सूक्ष्म होती, याची आपण कल्पना करू शकतो. सरीसृपांच्या वाढलेल्या वावरानं निर्माण झालेली भीती नागपंचमीच्या सणाद्वारे कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. थंडी वाढू लागल्यावर मात्र सरीसृपांची संख्या कमी दिसू लागते आणि कडक उन्हाळ्यात तर साप फारच तुरळकपणे दिवसा उघड्यावर दिसतात. 

अर्थात या पद्धतीचे तोटेही आहेत. ऊर्जा संपल्यावर त्यांना पुन्हा उष्णता मिळवावी लागते. तसंच ऊर्जेच्या क्षयामुळं त्यांची हालचाल फारच मंदावते आणि ते शिकाऱ्यांना बळी पडू शकतात. 

पण मग आता अशी शरीरव्यवस्था असण्याचा फायदा काय असावा? तर उत्तर आहे, अन्नातील ऊर्जेचा उपयोग, शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी होत नसल्यानं, थंड रक्ताच्या प्राण्यांना जीवित राहण्यासाठी कमीत कमी अन्नाची गरज लागते. म्हणूनच ते प्रतिकूल तापमान, तसंच अन्नाचं दुर्भिक्ष्य असलेल्या कठीण परिस्थितीतही आपला जीव जगवू शकतात. 
 

संबंधित बातम्या