साप-निसर्गचक्राचा अविभाज्य घटक

मकरंद केतकर
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

निसर्गाच्या चक्रात आपले कार्य बिनबोभाट बजावणारा जीव म्हणजे साप. कोट्यवधी वर्षांपूर्वी त्यांची जडणघडण कशी झाली या कोड्याचे तुकडे जुळवताना शास्त्रज्ञांना अंदाज आला की उत्क्रांतीदरम्यान कदाचित काही घटना अशा घडल्या, की त्यामुळे पालीसारख्या दिसणाऱ्या डायनासॉर्सच्या काही जातींना बिळात राहणे भाग पडले. त्यांचे बरेचसे दैनंदिन व्यवहार त्या निमुळत्या घरात होऊ लागले आणि मोठ्या पायांची गरज नाहीशी होत हळूहळू त्यांचे पाय लुप्त होत गेले. पण सापांना एकेकाळी पाय होते याचा सज्जड पुरावा आजही आपल्याला अजगराच्या शरीरावर पाहायला मिळतो. अजगराच्या गुदद्वाराजवळ घोरपडीच्या बोटांना असतात तशा नख्या असतात. जे त्याच्या पूर्वजांच्या पायाचे अवशेष आहेत. अशा प्रकारे अधिवास बदलल्यानंतर सापांचे जसे पाय नामशेष झाले तसेच त्यांच्या शरीरातील अवयवही ''मॉडीफाय'' होत गेले. सर्वप्रथम त्यांचे शरीर त्या वेड्यावाकड्या जागेत किंवा अगदी कमी जागेत मावू शकेल अशा पद्धतीने नळीसारखे लांबुडके व लवचीक झाले. शरीर नळीसारखे झाल्यावर आतले अवयवही त्यानुसार बदलत गेले. उदा. सापांना पूर्वी दोन फुप्फुसे होती. पण जागेच्या तडजोडीमध्ये एक फुप्फुस अगदी छोटे व नाममात्र उरले व दुसरे मोठे व लांब झाले. इतर प्राण्यांच्या बरगड्या अचल असतात. परंतु, साप चालतोच मुळी त्याच्या हालणाऱ्या बरगड्यांच्या आधारे. त्यांना जोडलेले स्नायू बरगड्यांना पुढे मागे ओढून सापाला पुढे मागे जाण्यास अथवा बाजूला वळण्यास मदत करतात. बहुतांशी सापांची दृष्टी अधू असते व त्यांना फार लांबच्या गोष्टी दिसत नाहीत. जमिनीखाली राहणारे आदिम साप, उदा. वाळा, यांना तर केवळ उजेड आणि अंधार एवढाच फरक कळतो.                    

हरणटोळांसारख्या काही सापांना मात्र माणसासारखीच द्विनेत्री दृष्टी (बायफोकल व्हिजन) असते. सापांना कान नसतात, परंतु त्यांना जमिनीत होणारी कंपने पोटाच्या त्वचेच्या मार्फत जाणवतात. त्यांना नाकाने वास घेता येत नाही, मात्र ही कमी त्यांची जीभ भरून काढते. हवेत लवलवणारी सापाची जीभ हवेतील गंधकण टिपून, टाळूला असलेल्या ''जेकबसन्स ऑर्गन'' या ग्रंथीला चिकटवते. तिथल्या सेन्सर्सद्वारे हे गंधकण वाचले जातात व त्याद्वारे त्याला आजूबाजूला नक्की काय आहे याचे ज्ञान होते.            

थोडक्यात साप जिभेने वास घेतो आणि एका अर्थी पाहतोही. याच जोडीला काही अधिक प्रगत साप, उदा. सह्याद्रीतल्या जंगलांत सापडणारा चापडा नावाचा विषारी साप आणि अजगर यांना नाकाच्या शेजारी उष्णताग्राहक खळगे असतात. याच्या साहाय्याने त्यांना मिट्ट काळोखात भक्ष्याच्या अंगातून उत्सर्जित होणारी अत्यंत मंद उष्णताही टिपता येऊन शिकारीचा तसेच त्यांच्या दिशेने येणाऱ्या शिकाऱ्यांचा वेध घेण्यास मदत होते.         

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, की आपल्याला एक्स-रेमध्ये जशी आतल्या अवयवांची आकृती दिसते, त्याप्रमाणे त्यांना अंधारात त्यांच्या भक्ष्याची आकृती दिसत असावी.                    

प्रत्येक साप विषारीच असतो, ही चुकीची समजूत आहे. मानवी वस्तीच्या आसपास आढळणारे नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस असे चार जातींचे मुख्य विषारी साप सोडले, तर बाकीचे साप बिनविषारी किंवा मानवासाठी धोकादायक नाहीत. सापाचे विष हे अनेक प्रकारच्या घातक प्रथिनांचे सूप आहे. या विषाचा वापर साप भक्ष्याला मारण्यासाठी आणि अपवादात्मक परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करतो.       

केवळ काही सापच विषारी का? या प्रश्नाचे उत्तर अजून शास्त्रज्ञांना पूर्णपणे सापडलेले नाही. बहुधा पारिस्थितीक गरज म्हणून विषाची व ते सोडणाऱ्या दातांची जडणघडण झाली असावी. उंदीर हे सापाच्या मुख्य भक्ष्यांपैकी एक आहे. उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात सुमारे एक हजार उंदीर तयार होतात. शेतीतील सुमारे ३५ टक्के धान्य उंदीर संपवतात. मग आता सांगा, शेतातले उंदीर खाऊन आपल्या पानातले अन्न सुरक्षित ठेवणाऱ्या या जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे की नाही? तेव्हा आपल्या परिसरातील सर्पमित्रांचे फोन नंबर्स सेव्ह करून ठेवा आणि आपल्या या मित्रालाही जगण्याची संधी द्या.
 

संबंधित बातम्या