सर्प-अंधश्रद्धा

मकरंद केतकर
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

मित्रांनो, अज्ञानापोटी भीती जन्म घेते व त्यातून पुढे अंधश्रद्धा. न उकलणाऱ्या प्रश्नाचे जिज्ञासेने उत्तर शोधण्याऐवजी त्यात चमत्कार आणि मनोरंजन शोधले जाऊ लागले, की श्रद्धेची जागासुद्धा अंधश्रद्धा घेते. अविचाराने केलेल्या छोट्याशा कृतीनेसुद्धा निसर्गाचे त्यापुढच्या काळात फार मोठे नुकसान होते. जसे, पाण्यात दगड टाकला की त्यातले तरंग पसरत जाताना मोठे मोठे होत जातात तसे. जगातले अनेक कीटक, प्राणी, पक्षी, सरीसृप आणि विशेषतः साप हे या अंधश्रद्धांची शिकार होत असतात. म्हणूनच आजच्या लेखाचे प्रयोजन विविध चुकीच्या समजुतींचे निराकरण करून तुम्हाला सजग व संवेदनशील करणे हे आहे. तशा विविध भागात विविध प्रकारच्या अंधश्रद्धा प्रचलित आहेत, पण त्यातल्या काही प्रमुख सर्प-अंधश्रद्धांचे निराकरण करून घेऊया.

साप पुंगीच्या तालावर डोलतो : अनेक जण नाग, अजगर वगैरे सापांना ‘साप’ या कॅटेगरीत धरत नाहीत. त्यांच्यासाठी नाग हा वेगळाच प्राणी आहे. पण वास्तविक नागसुद्धा सापच आहे. जसे की माणूस या शीर्षकाखाली भारतीय, युरोपियन, जपानी, चीनी अशा वेगवेगळ्या वंशाचे लोक आहेत तसे. सापांमध्ये फक्त नाग या जातीच्या सापाला फणा काढून उभे राहता येते आणि त्या स्थितीत शत्रूला डोके फिरवून पाहता येते. याच सवयीचा गारुडी गैरफायदा घेतात. सापाला कान नसतात आणि त्याला ऐकू येत नाही. त्यातूनही त्याला संगीताचे वगैरे ज्ञान तर मुळीच नसते. तो पुंगीकडे ‘धोका’ याच नजरेने पाहतो. त्यामुळे त्याच्यासमोर पुंगीच काय, चप्पल फिरवली तरी तो हालणाऱ्या चपलेकडे पाहून डोलेल. अनेकदा श्रद्धाळूंना नाग चावू नये म्हणून गारुडी क्रूरपणे त्याचे दात उपटतात व तोंड दाभणाने शिवतात. अशा सापांचाही मृत्यू होतो. आपली भोळीभाबडी श्रद्धा त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरते.

एक साप मारला, की बदला घ्यायला सात साप येतात : सरीसृपांमध्ये मिलन काळात मादीच्या शरीरातून नरांना आकृष्ट करायला विशिष्ट गंध निघतात. शास्त्रीय भाषेत त्याला ‘सेक्स फेरोमॉन्स’ म्हणतात. या गंधामुळे त्या परिसरातील अनेक नर तिच्याकडे आकृष्ट होतात. अशी माजावर आलेली मादी मारली, तर मेल्यावरही तिच्या शरीरातून हे गंध निघत राहतात व नर आकृष्ट होत राहतात त्यामुळे ही अंधश्रद्धा.

सापाच्या अंगावर केस असतात : साप खवलेधारी (स्क्वामाटा) जिवांच्या कुळात येतात. त्यांच्या अंगावर माशांसारखे, परंतु कोरडे खवले असतात. कधीकधी कात टाकताना तिचे काही तुकडे सापाच्या अंगावर तसेच चिकटतात व त्यामुळे पाहणाऱ्याला त्याच्या अंगावर केस असल्याचा दृष्टिभ्रम निर्माण होतो.

प्रार्थना केल्यास साप टोचलेले विष परत शोषून घेऊ शकतो : हे अजिबात शक्य नाही. इंजेक्शनने टोचलेले औषध डॉक्टर परत काढून घेऊ शकतो का? नाही ना? तसेच सापही विष परत शोषून घेऊ शकत नाही.

धामण गोठ्यात शिरून जनावरांचे दूध पिते : दूध हे सापाचे अन्न नाही. जगातला प्रत्येक साप जन्मापासूनच मांसाहारी जीव असतो. बेडूक, उंदीर, पक्षी, अंडी आणि इतर विविध जिवांचा त्यांच्या आहारात समावेश होतो. गारुडी सापांना अनेक दिवस विशेषतः नागपंचमीच्या आधी काही दिवस तहानलेले ठेवतात. दूध समोर आल्यावर त्यांचे डोके त्यात जबरदस्तीने बुडवले जाते. तहानलेला असल्याने नाग नाइलाजाने दूध पितो. मात्र, दूध पचवण्याची क्षमता नसल्याने त्याचा अतिसाराने मृत्यू होतो.

दुतोंडी साप दोन्ही बाजूंनी चालतो : ही अंधश्रद्धा मांडूळ जातीच्या सापाबद्दल आहे. त्याची शेपटी त्याच्या तोंडासारखी दिसते. संकटकाळात तो वेटोळे करून डोके खाली लपवतो व शेपटी हल्लेखोरापुढे करून स्वतःचे डोके आणि जीव वाचवतो. कुठलाही साप गांडुळासारखा दोन्ही दिशांना सरपटू शकत नाही. दुसरे म्हणजे, जर दोन्ही बाजूला तोंड असेल, तर तो ‘नैसर्गिक विधी’ कुठून करेल?

साप बदला घेतो : सापाचा मेंदू फक्त नैसर्गिक जाणिवांचे समाधान करण्यासाठी बनलेला आहे. त्याला अन्न, मिलन, स्वसंरक्षण, निवारा या गोष्टींशिवाय इतर गोष्टींचे आकलन होत नाही. ‘बदला घेणे’ ही कृती या प्राणिविश्वात स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्या माणसाशिवाय कोणीही करत नाही.

संबंधित बातम्या