कासव 

मकरंद केतकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

कासव म्हणजे जगातल्या अजूनही जिवंत असलेल्या काही डायनासोर स्पिशीजपैकी एक म्हणता येईल, असा अजब जीव आहे. शरीराच्या घडणीनुसार कासवांची मुख्य दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे. क्रिप्टोडिरा (Cryptodira) आणि प्लुरोडिरा (Plurodira). क्रिप्टोडिरा प्रकारातील कासवं आपली मान सरळ रेषेत आत ओढून घेतात, तर प्लुरोडिरा प्रकारातली कासवं आपली मान आडवी करून कवचाच्या आत लपवतात. जगभर आणि भारतातही कासवांचे टर्टल, टेरापिन आणि टॉर्टिस (ज्याचा उच्चार अनेक लोक टॉरटॉईज असाही करतात) असे तीन प्रकार आढळतात. या तिन्हीची थोडक्यात ओळख करून घेऊ. 

टर्टल्स 
टर्टल्स आणि टेरापिन्स हे दोन्ही प्रकार जवळपास सारखेच. पण नख्याविरहित असतात ती टर्टल्स आणि पायांना नख्या असतात ती टेरापिन्स अशी ढोबळ विभागणी करता येऊ शकते. त्या दृष्टीनं पाहिलं तर टर्टल्स मुख्यत्वे समुद्रात आढळतात. यांच्या पायांचा आकार पाण्यातल्या वावरासाठी आवश्यक असा वल्ह्यासारखा असतो. याचं जवळपास सर्वांना माहिती असणारं उदाहरण म्हणजे ऑलिव्ह रिडले टर्टल्स, जे भारताची पश्चिम किनारपट्टी (उदा. कोकणातील वेळास) व पूर्व किनारपट्टीवरील किनाऱ्यांवर दरवर्षी अंडी घालायला येतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, ओरिसातील गहिरमाथा या ठिकाणी तर चक्क सहा लाखांपेक्षा जास्त ऑलिव्ह रिडले टर्टल्स दरवर्षी अंडी घालायला येतात. 

टेरापिन 
जमीन तसेच पाणी अशा दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या कासवांना टेरापिन्स म्हणतात. तमिळनाडूतल्या मुदुमलईच्या जंगलात हिंडत असताना मला सोबत दिलेल्या छायाचित्रांतले ‘इंडियन ब्लॅक टेरापिन’ या जातीचं कासव आढळलं होतं. हे टेरापिन जमीन तसंच पाण्यात वावरत असल्यानं नख्या आणि चपटे पाय असा दोन्हीचा मिलाफ त्याच्यात आढळतो. टर्टल्स आणि टेरापिन्स मिश्राहारी असतात. उपलब्धीनुसार मासे, कीटक, वनस्पती अशा सर्वप्रकारच्या अन्नाचा त्यांच्या आहारात समावेश होतो. 

टॉर्टिस 
हा प्रकार प्रामुख्यानं जमिनीवरच राहतो. क्वचित ते पाण्यातही शिरतात पण मुख्य वावर जमिनीवरच असल्यानं त्यांचे पाय दंडगोलाकार आणि पाण्यात पोहण्यासाठी फारसे उपयुक्त नसतात. यांच्या आहारात प्रामुख्यानं फळं, मुळं, पानं यांचा समावेश असतो. यांचं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्टार टॉर्टिस. याच्या कवचावरील सुंदर तारकाकृती डिझाईन्समुळं याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. यामुळंच या कासवासह अनेक कासव प्रजातींना वन्यजीव कायद्यानं संरक्षण देण्यात आलेलं आहे. 
हे तिन्ही प्रकार दिसायला जरी मद्दड असले, तरी स्वभावानं अतिशय तिखट असतात. त्यांना तोंडात दात नसतात मात्र चोचीसारख्या तोंडाच्या कडा अतिशय धारदार असतात. म्हणजे त्यांच्या आकारानुसार एखादी काडी त्यांच्या तोंडात घातली तर काडकन तुकडा मोडू शकतील इतक्या धारदार! 

कासवाच्या कवचाचे दोन भाग असतात. पाठ आणि पोट. कवचाच्या आतून वक्राकार झालेला पाठीचा कणा असतो. तसेच छातीच्या हाडाला पसरट अशा फासळ्याही जोडलेल्या असतात. शेकडो कोटी वर्षांच्या उत्क्रांतीत पाठीवरचे खवले पसरट होत गेले, छातीची हाडं पसरट झाली आणि त्यानुसार त्यांचे आतले आणि बाहेरचे अवयव विकसित झाले. 
इतर अनेक सरीसृपांच्या जातींप्रमाणंच यांचंही प्रजनन अंड्याद्वारेच होतं. पण यातली अनेकांना ठाऊक नसलेली गंमत सांगतो. अनेक प्रकारच्या रेप्टाईल्समध्ये आढळते त्याप्रमाणं कासवांच्याही अंड्यातील जिवाची लिंगनिश्चिती अंड्याभवतालच्या तापमानानुसार होते. याला ‘टेंपरेचर-डिपेंडंट सेक्स डिटरमिनेशन’ (TSD) असं म्हणतात. म्हणजे, अंड्यात भ्रूण तयार होताना, एका विशिष्ट कालावधीत, अंड्याभवतालचं तापमान तीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल तर अधिक संख्येत माद्यांचा जन्म होतो. पण त्याच काळात हेच तापमान तीस अंशांच्या खाली आले तर जन्माला आलेल्या पिल्लांमध्ये नर जास्त आढळतात. संशोधनात असं आढळलं, की विशिष्ट तापमानाला अंड्यामधील लिंगनिश्चिती करणारे विशिष्ट हार्मोन्स सक्रिय होतात व त्यानुसार लिंगनिश्चिती होते. या छोट्याशा लेखानं, आपल्या संस्कृतीनं विष्णूचा अवतार मानून दैवी रूप दिलेल्या हा जिवाबद्दल आपल्या मनात आदराबरोबर कुतूहलही वाढवण्यास हातभार लावला असेल अशी मला आशा आहे.     

संबंधित बातम्या