मगर

मकरंद केतकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

निसर्ग कट्टा
 

मगर म्हणजे भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष अस्तित्वाबरोबरच विविध लोककथा, दंतकथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्थान मिळवलेला सरीसृप. वर्तणुकीत आणि दिसायला भीतीदायक असलेला हा जीव निसर्गाच्या साखळीत शिकारीच्याच जोडीनं मृत कलेवरांच्याही साफसफाईचं अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडत असतो. मगर पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी वावरते. मग तिला बेडकाप्रमाणं उभयचर (अँफिबियन) म्हणणं योग्य होईल का? तर नाही. याची दोन कारणं आहेत. मगर पाण्याच्या काठावर खड्डा खणून किंवा पालापाचोळ्याचं घरटं करून त्यात कठीण कवचाची अंडी घालते. तसंच ती पूर्णपणे फुप्फुसांच्या साहाय्यानं श्वसन करते. बेडूक आणि इतर उभयचर पाण्यात अथवा ओलसर जागेत अंडी घालतात. त्यांचं कवच मृदू असतं. त्याचबरोबर उभयचर काही प्रमाणात त्वचेद्वारेही श्वसन करतात. 

मगर पाण्यात जितक्या लीलया पोहते, तितकीच चपळपणे ती जमिनीवर चालू आणि पळू शकते. तसंच ती पाण्याखाली तासाभरापेक्षाही जास्त काळ श्वास न घेता राहू शकते. अतिताकदवान पचनक्षमता असलेला हा डायनासोरचा वंशज हाडं, शिंगं, खूर, दात, नखं असे शरीराचे कठीण भागही लीलया पचवू शकतो. मोठ्या आकाराची मगर तर आख्खं हरीणही गिळू शकते. आता आपण तिच्या शरीरातील विविध अवयवांच्या अद्‍भुत क्षमता बघू. 

नव्वद अंशांपर्यंत उघडू शकणाऱ्या मगरीच्या जबड्यात सुमारे साठ दात असतात. हे दात तुटले तरी नवीन दात उगवण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालू राहते. मगरीचा फक्त वरचा जबडा वर खाली होऊ शकतो. जबडा उघडणारे स्नायू तुलनेनं कमी ताकदवान असतात. पण जबडा मिटणारे स्नायू मात्र प्रचंड शक्तिशाली असतात. भक्ष्य पकडताना जेमतेम अर्ध्या सेकंदात जबडा मिटला जातो. सोपं उदाहरण द्यायचं, तर उंदीर पकडायच्या लाकडी पिंजऱ्याचा दरवाजा उघडायला शक्ती लागते. मात्र तो बंद होताना स्प्रिंग अ‍ॅक्शननं सटकन बंद होतो तसं. मगरीच्या शरीरावर अत्यंत जाड त्वचेचं सुरक्षा कवच असतं. ते वरून जरी कडक दिसलं, तरी त्याच्या आतमध्ये नसांचं जाळं असतं. मगर बाह्यउष्माग्राही असल्यामुळं तिला ऊन खाण्यासाठी उघड्यावर येऊन बसावं लागतं. शरीराचं तापमान वाढवण्यासाठी या नसांच्या जाळ्यामधून फिरणाऱ्या रक्तामधून उष्णता शोषली जाते. मगरीच्या त्वचेवर असंख्य काळे बिंदू दिसतात. हे बिंदू सेन्सर्सचं काम करतात. पाण्यात असताना शेजारून चाललेल्या माशाच्याही हालचालीनं पाण्यात निर्माण होणारी पुसटशी कंपनंसुद्धा हे बिंदू अचूक हेरतात. मगरीच्या नाकपुड्या आणि डोळे जबड्यावर वरच्या बाजूला स्थित असतात. त्यामुळं शरीराचा ९० टक्के भाग पाण्यात ठेवून मगर अचूकपणे पाण्याबाहेरील भक्ष्याचा वेध घेऊ शकते. पाण्याच्या खाली जाताना नाकपुड्या पूर्णपणे बंद होतात, तर डोळ्यांवर अर्धपारदर्शी त्वचा ओढली जाते. याला निक्टिटेटींग मेंब्रेन म्हणतात. मगरीचं जठर प्रचंड अ‍ॅसिडिक असतं. वर म्हटल्याप्रमाणं शिकारीचा प्रत्येक अवयव विरघळवून पचवला जातो. अन्नातून मिळालेली अधिकची ऊर्जा शेपटीमध्ये चरबीच्या रूपात साठवली जाते व अन्नाचं दुर्भिक्ष्य असताना त्याचा वापर केला जातो. भारतात मगरींचे तीन प्रकार आढळतात. गोड्या पाण्यातील मगर, जी भारतभर अनेक नद्यांमध्ये आढळते, खाऱ्या पाण्यातील मगर जी बंगालमधील सुंदरबन इथं आढळते आणि तिसरा प्रकार म्हणजे आता दुर्मिळ होत चाललेली व उत्तर भारतातील चंबळ, उत्तराखंड आणि इतर ठिकाणांमधील नद्यांमध्ये तुरळक आढळणारी सुसर (घडियाल). यातील सुसर तिच्या जबड्याच्या निमूळत्या रचनेमुळं ती मासे खाणंच पसंद करते. सुसरीमध्ये नराच्या जबड्याच्या टोकाला गोळा असतो व त्यावरून नर मादी वेगळे ओळखता येतात. हा गोळा घड्यासारखा दिसतो म्हणून यांना उत्तर भारतात घडियाल म्हणतात. मगरींमध्ये मात्र बाह्यरूपावरून हा फरक ओळखता येत नाही. कोणे एके काळी नामशेष होत चाललेल्या या जीवांच्या रक्षणासाठी अनेक कार्यक्रम योजले गेले व त्यामुळं आज या महत्त्वपूर्ण जीवांची संख्या पुन्हा वाढत आहे.  

संबंधित बातम्या