पक्षीविश्‍व 

मकरंद केतकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

दोस्तांनो, आजपासून पुढचे काही दिवस आपण पक्षीविश्‍वाची ओळख करून घेऊ. पक्षी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. लहानपणापासून काऊचिऊच्या गोष्टी ऐकत आपण सगळेच लहानाचे मोठे झालो आहोत. मोजके अपवाद सोडले तर सुंदर शरीर, मंजुळ आवाज, आकर्षक रंग व मनमोहक सवयी यामुळे पक्ष्यांचा सहवास सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पण भूतकाळात डोकावून पाहिलं तर पक्ष्यांचे पूर्वज भीतीदायक रूपाचे होते हे आढळून येतं. वटवाघुळाप्रमाणं त्वचेच्या साहाय्यानं उडणाऱ्या डायनासोर्समध्ये पिसांची गरज नेमकी का निर्माण झाली याचा शोध सुरू आहे. पण १८६० मध्ये जर्मनीत सापडलेल्या आर्किओप्टेरिक्स व पक्ष्यासारखा आकार आणि अंगावर पिसं असलेल्या डायनासोरच्या जीवाश्मावरून असं लक्षात येतं, की साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी पिसं असलेल्या डायनासोर्सची शाखा वेगळी झाली. याला चोचीमध्ये दात होते, अंगावर पिसं होती, पंखांमध्ये नख्या होत्या आणि मुख्य म्हणजे पालीसारखी शेपूटही होती. इथून पुढं या शाखेचा प्रचंड विकास झाला आणि वेगवेगळ्या अधिवासात राहण्यासाठी अनुकूल अशी शरीररचना असलेल्या पक्ष्यांचा विकास झाला. आज जगात पक्ष्यांच्या दहा हजारांहून अधिक जाती सापडतात, ज्यांची विभागणी जवळपास २८ शाखा आणि २५० कुळांमध्ये केलेली आहे. ही विभागणी पक्ष्यांची शरीररचना, अधिवास, आवाज, खाण्यापिण्याच्या सवयी, हालचालीची पद्धत, प्रजननाची पद्धत अशा विविध घटकांवर आधारलेली आहे. यानुसार त्यांच्यात फक्त हवेत उडणारे, फक्त पाण्यात पोहणारे, दोन्ही करू शकणारे, जमिनीवर चालणारे, दिवसा किंवा रात्री सक्रिय असलेले असे अनेक प्रकार आहेत हे आपल्या लक्षात येतं. नुसत्या खाद्यसवयी पाहिल्या तरी त्यात मांसभक्षी, कीटकभक्षी, वनस्पतीभक्षी, मधभक्षी, अवशेषभक्षी असे विविध प्रकार आहेत. खाण्याच्या या पद्धतींमुळं त्यांच्या चोचीही विशिष्ट आकाराच्या बनलेल्या आहेत. उदा. गरुडाची चोच मांस फाडण्यासाठी बाकदार असते, तर मासेखाऊ बगळ्याची लांब आणि टोकदार असते. हालचालीच्या सवयी पाहिल्या, तर जास्तीत जास्त वेळ जमिनीवर चालणाऱ्या मोराचे पाय लांबसडक व मजबूत असतात; तर हवेत अधिक काळ तरंगणाऱ्या पाकोळीचे पाय अगदी चिंटुकले व फक्त बसायला आधार देण्यापुरते बनलेले असतात. 

पक्षी राहण्यासाठी घरटी बांधतात हा अजून एक मोठा गैरसमज आहे. पक्षी घरटी बांधतात ती फक्त वंश वाढवण्यासाठी. पिल्लं मोठी होऊन उडून गेल्यावर त्या घरट्याचं काही काम उरत नाही. सूर्यास्तानंतर पक्षी त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या झाडांच्या फांद्यांवर पानांच्या आड विश्रांती घेतात. अशा या अद्‍भुत जीवांची अंतर्गत शरीररचना पाहिली तर ती त्यांच्या जीवनासाठी किती योग्य आहे याची खात्री पटते. शरीराला आकार देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे हाडांचा सापळा. सरीसृपांपासून विकसित होताना पक्ष्यांच्या पुढच्या पायांना उडण्याच्या दृष्टीनं जास्त महत्त्व प्राप्त झालं. पुढच्या पायांची हालचाल अधिक होत असल्यानं त्याच्याशी संबंधित स्नायू अधिक शक्तिवान झाले. हे वाढलेले स्नायू सामावून घेण्यासाठी त्यांच्या छातीचं हाडही आकारानं फार मोठं होतं गेलं. मांसाहार करणाऱ्या लोकांनी सोललेली कोंबडी डोळ्यासमोर आणली तर त्यांना आठवेल, की पहिले नजरेत भरते ‘चिकन ब्रेस्ट.’ उत्क्रांतीमध्ये कोंबडीसारख्या बहुतांश वेळ जमिनीवर चालणाऱ्या पक्ष्यांमध्ये उडण्याची क्रिया कमी असली तरी एवढा अवजड देह गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध अधांतरी नेण्यासाठी मजबूत स्नायूंची गरज भासतेच. 

यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे अत्यंत हलक्या वजनाची आणि पोकळ असलेली हाडे. या हाडांमध्ये इतर प्राण्यांप्रमाणंच पेशी निर्माण करणारा बोन मॅरो असला, तरी त्याच्या आसपास हवेनं भरलेल्या पोकळ्या असतात ज्या हाडाचं वजन कमी करण्यास मदत करतात. पक्ष्यांची पचनसंस्थाही प्रचंड वेगवान असते. त्यामुळंच रात्रभर उपाशी राहिलेले पक्षी सकाळ झाल्या झाल्या चिवचिवाट करून सर्वप्रथम अन्न शोधायच्या कामाला लागतात. यापुढच्या काही लेखांमधून आपण विविध पक्ष्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ. तोपर्यंत तुमच्या घराच्या आसपास दिसणाऱ्या पक्ष्यांच्या वर्तणुकीचं, चोचींचं व शरीररचनेचं नक्की निरीक्षण करा.  

संबंधित बातम्या