डॉक्टर ऑफ द फॉरेस्ट 

मकरंद केतकर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

मंडळी, निसर्गाची अन्नसाखळीच ‘याड’ लावणारी आहे. निसर्गात जमिनीपासून झाडाच्या शेंड्यापर्यंत वेगवेगळ्या सजीव साखळ्यांमध्ये खाऊगल्लीचा खेळ चालू असतो. झाडाच्या खोडात लपणारे सगळेच किडे काही झाडाला अपाय करणारे नसतात. पण जे अपाय करणारे असतात ते जर प्रमाणाबाहेर वाढले (विशेषतः ‘सेरंबीसीड’ कुळातले वूड बोअरिंग बीटल्स) तर निश्चितच चांगल्या झाडांना जमीनदोस्त करू शकतात. अशा वेळी मार्व्हल कॉमिक्समधल्या, जगाला वाचवणाऱ्या सुपरहिरोसारखा उडत येतो आपला वूडपेकर - अर्थात सुतारपक्षी! झाडाच्या खोडामध्ये लपलेल्या ‘ईव्हील्स’ना खाणारा वूडपेकर हा ‘डॉक्टर ऑफ द फॉरेस्ट’ या नावानंही ओळखला जातो. विविध आकारांमध्ये आणि सुंदर रंगांमध्ये आढळणारे हे पक्षी ओरडायला लागले, की ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशन एपिसोड्सची आठवण येते. त्याचा आवाज जरी अत्यंत टिपेचा ‘कीकीकीकी किर्रर्रर्र’ असा असला, तरी त्याचं खोडावर वरखाली करणं नेत्रसुख देणारं असतं. उत्क्रांतीदरम्यान त्यांच्या पूर्वजांनी पुढच्या पिढ्यांना दिलेल्या देणग्यांच्या जोरावर हे पक्षी खोडांवर छिद्र करतात आणि लांबसडक जिभेनं आतमध्ये लपलेल्या किड्यांना खेचून बाहेर काढून मटकावून टाकतात. वूडपेकर्सची सिग्नेचर स्टाईल म्हणजे खोडावर पाय आणि शेपूट रोवायची आणि प्रचंड वेगानं आघात करत छिद्र पाडायचा प्रयत्न करायचा. खोडावर चिकटण्यासाठी यांच्या बोटांची रचनाही इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी असते. म्हणजे सहसा पक्ष्यांमध्ये तीन बोटं पुढं आणि एक मागं असतं. यांची दोन पुढं आणि दोन मागं असतात. त्यामुळं जास्त चांगली व्हर्टिकल ग्रीप घेता येते. त्यांच्या या आघाताचा वेग आणि संख्या किती असते माहितीय? सेकंदाला वीसेकवेळा आणि दिवसातून हजारो वेळा. तुम्ही नुसतं सातआठ वेळा डोकं गदागदा हलवून बघा म्हणजे तुम्हाला त्याच्या क्षमतेचा अंदाज येईल. मग इतक्या वेळा चोच आपटून त्यांच्या मेंदूला इजा होत नसेल का? तर अजिबात नाही. 

एक लक्षात घ्या, नुकसान होतं ते अचानक थांबल्यामुळं. वेगामुळं नाही. 

सुतारपक्ष्याचा मेंदू आपल्या मेंदूसारखा द्रव्यामध्ये तरंगत नसून अगदी टाइट पॅक केलेला असतो. त्याच्या कवटीमध्ये, जिथं चोच कवटीला चिकटलेली असते, तिथं आतमधल्या बाजूला स्पंजसारख्या टिश्यूजचं एक्स्ट्रा पॅकिंग असतं. ज्यामुळं आघाताचा धक्का मेंदूपर्यंत न पोचता बाहेरच्या बाहेर शोषला जातो. याचबरोबर त्यांच्या मेंदूची स्थितीही त्यांच्या खोडावर चिकटण्याच्या पोश्चरला साजेशी अशी म्हणजे जमिनीला परपँडीक्युलर अशी असते. अशा स्थितीत मेंदूचा जास्तीत जास्त भाग चोचीच्या बाजूला फेसिंग असतो. त्यामुळं आघाताचा इंपॅक्ट मोठ्या पृष्ठभागावर विभागला जातो. 

यालाच अजून सपोर्ट मिळतो तो त्याच्या जिभेचा. वाचायला जरा विचित्र वाटेल पण त्याची जीभ त्याच्या चोचीच्या तिप्पट लांबीची असते आणि गळ्याच्या आतमधून वरच्या दिशेला कवटीच्यावरून नाकाच्या आतल्या बाजूपर्यंत आलेली असते. म्हणजे पत्र्याची मेजरिंग टेप जशी स्प्रिंगनं गुंडाळलेली असते तशी. या लांबलचक जिभेच्या ‘रिइन्फोर्समेंट’मुळं मेंदूला अजून प्रोटेक्शन मिळतं. खोडावर छिद्र पाडत असताना त्यातून उडणारे कपचे डोळ्याला इजा पोचवू शकतात. त्यामुळं प्रत्येकवेळी चोच खोडाला टेकली की त्याच्या पापणीच्या आतमध्ये असलेला एक दुधी रंगाचा अर्धपारदर्शक पडदा (निक्टिटेटींग मेंब्रेन) डोळ्यावर ओढला जातो. 

सुतारपक्ष्याचं जर तुम्ही निरीक्षण केलंत, तर आढळेल की तो खोडावर वरती सरकत असताना खोडावर बसलेले किडे खातो; तसंच खोडावरच्या खपल्या उचकटून त्याच्याआड लपलेलेही किडे खातो. याच्याच जोडीला, तो मूव्हमेंट करत असताना चोचीनं अधूनमधून खोडावर टकटक करत राहतो. जिथं खोड आतून पोकळ आहे तिथून त्याला वेगळा आवाज येतो आणि तिथं तो छिद्र पाडायला सुरुवात करतो. छिद्र पडलं, की त्याची ही लांबलचक जादुई जीभ तो खोडात ‘ओततो’ आणि आतले किडे बाहेर ओढून मटकवतो.

असा हा विलक्षण डॉक्टर गेली लक्षावधी वर्षं झाडांची तब्येत तपासत आणि फीमध्ये किडे वसूल करत रानावनात हिंडतो आहे. झाडांना आजारावर ‘उतारा’ देत! 
 

संबंधित बातम्या