किंगफिशर 

मकरंद केतकर
सोमवार, 2 डिसेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

तुम्ही कधी किंगफिशरला मासा पकडताना पाहिलंय? ते चापल्य, क्षणभराकरताच विजेसारखीच हवेत ओढली गेलेली ती रंगीत रेघ आणि त्या औटघटकेत निसर्गाच्या एका चक्राचं एक आवर्तन पूर्ण होताना, त्या क्षणांचे आपण साक्षीदार होण्याचं लाभलेलं ते सुख अनुभवण्यासाठी चिकाटीनं बसण्याची गरज असते. तसा हा पक्षी सर्वसामान्यच आहे. पण त्याला उत्क्रांतीमधून लाभलेल्या क्षमता असामान्य आहेत. त्यापैकी अचूकता हे त्याचं सर्वश्रेष्ठ अस्त्र आहे. महाभारतातल्या अर्जुनाला स्वयंवरात छताला गोल फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याचा वेध घेण्यासाठी लागलेली एकाग्रता आणि संथ पाण्यात सतत फिरणाऱ्या माशांचा लक्षवेध करणाऱ्या किंगफिशरची अचूकता यात काहीही फरक नाही. ‘मी नाही त्यातला’ असं भासवत ओढ्याकाठच्या एखाद्या फांदीवर किंवा दगडावर स्वस्थचित्तानं प्रतीक्षा करणारा किंगफिशर अचानक पाण्यात सूर मारतो आणि मासा पकडून घेऊन येतो. दिसायला हे सोपं वाटतं, परंतु त्यामागं फार मोठं ‘सायन्स’ आहे. 

प्रकाशकिरणांचं वक्रीकरण म्हणजे ‘रिफ्रॅक्शन’ करणं हा पाण्याचा एक दुर्गुण आहे. प्रकाशकिरण पाण्यात शिरले, की त्यांचा अँगल बदलतो. त्यामुळे पाण्यातली वस्तू आहे त्या ठिकाणापासून वेगळ्या ठिकाणी असल्याचं भासतं. त्याचे मोठे डोळे आणि हलणाऱ्या फांदीवर बसूनही एकाच जागी स्थिर राहणारी त्याची मान त्याला लक्ष्यावर फोकस करण्यास मदत करते. हलणाऱ्या फांदीवर बसलेल्या किंगफिशरच्या प्रतिमेचं उदाहरण द्यायचं, तर घड्याळाचा लंबक जसा डावीउजवीकडं हलत असतो पण काटे स्थिर असतात; तसं त्याचं शरीर हलत असतं पण डोकं एका जागी स्थिर असतं. किनारा लांब असल्यास तो पाण्याच्या स्रोताच्या मध्यभागी येतो आणि एकाच जागी हवेत फडफडत टार्गेट निश्चित करून खोलीचा अंदाज घेत सरळ रेषेत डाईव्ह करतो. हलक्या वजनामुळे सूर मारल्यावर त्याला पाण्याचा विरोध होणं स्वाभाविक आहे. म्हणून तो सूर मारताना सत्तर-ऐंशी कि.मी प्रतितास या वेगानं पाण्यात घुसतो. पाण्यात घुसल्यावर त्याच्या पापणी आणि डोळा यांच्यामधली अर्धपारदर्शक निक्टीटेटींग मेंब्रेन खेचली जाते आणि डोळा पाण्याच्या आघातापासून बचावतो. सूर मारल्यावर मासा चोचीत पकडण्यासाठी त्याच्याकडं सेकंदाच्या एक चतुर्थांशपेक्षाही कमी वेळ असतो. मासा बाहेर घेऊन आल्यावर त्याला आधी फांदीवर आपटून बधीर करतो आणि मग डोक्याच्या बाजूने खात गट्टम करतो. त्याची भूक आणि पोट चांगलेच मोठे असावेत कारण दिवसभरात तो आपल्या वजनाइतके मासे सहज फस्त करतो. माझ्या निरिक्षणात एका पठ्ठ्यानं अर्ध्या तासात चार-पाच चिंटुकले मासे उचललेले दिसले होते. मराठीत याला खंड्या म्हणतात. याचाच एक काळापांढरा ‘पाईड किंगफिशर’ नावाचा भाऊबंद पाण्याच्या जवळ आढळतो. त्याला बंड्या म्हणतात. सह्याद्रीत आणि उर्वरित महाराष्ट्रात किंगफिशर कुटुंबातल्या पाच सहा जाती आढळतात. मासे हे काही सगळ्याच किंगफिशर्सचं मुख्य अन्न नाही. जंगलात आढळणारे किंगफिशर्स उभयचर, कीटक, खेकडे, सरीसृप तसेच इतर छोटे पक्षी यांना लक्ष्य करत आपली गुजराण करतात आणि निसर्गाच्या अन्नसाखळीत या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावतात. 

किंगफिशर्स सहसा ओढा अथवा नदीच्या काठच्या उतारावर असलेल्या मऊ, भुसभुशीत मातीत बीळ खणून त्यात अंडी घालतात. आफ्रिकेत आढळणाऱ्या एका जायंट किंगफिशरनं खणलेलं बीळ चक्क ८.५ मीटर म्हणजे जवळ जवळ पंचवीस फूट लांब होतं. पिलं जन्माला आल्यावर नर आणि मादी दोघंही आळीपाळीनं त्यांना वर दिलेल्या यादीतील जीव आणून भरवतात. पिलांना वाढीच्या वयात प्रचंड भूक लागत असल्यानं दोघंही दिवसभर सतत फेऱ्या मारून अन्न गोळा करून आणून भरवत राहतात. एके दिवशी पिसांची वाढ पूर्ण झाली, की पिलं बिळातून बाहेर येतात व निसर्गाच्या प्रचंड मोठ्या पसाऱ्यातील आपली छोटीशी भूमिका पार पाडायला उडून जातात. 

जाता जाता एक गंमत सांगतो. जपानमधल्या बुलेट ट्रेनच्या इंजिनिअर्सनी बुलेट ट्रेनला होणारा हवेचा अवरोध कमी करायला काय केलं माहितीय? त्यांनी चक्क किंगफिशरच्या डोक्याच्या आणि चोचीच्या आकाराची नक्कल केली. 

संबंधित बातम्या