उलुक 

मकरंद केतकर
सोमवार, 9 डिसेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

पक्षिनिरीक्षकांचे आवडते पक्षी म्हणजे शिकारी पक्षी. अर्थातच बर्ड्‌स ऑफ प्रे ऊर्फ रॅप्टर्स. भारतात बुलबुलएवढ्या आकाराच्या कॉलर्ड फाल्कोनेटपासून भल्यामोठ्या गोल्डन ईगलपर्यंत विविध आकाराचे शिकारी पक्षी आढळतात. तसं तर खाटीक, धनेश, कावळे आणि इतर अनेक पक्षी कीटक, पशुपक्षी, सरीसृप इत्यादींची शिकार करतात. पण वक्र चोच, तीक्ष्ण नखं आणि भन्नाट नजर ही या शिकारी पक्ष्यांची वैशिष्ट्यं आहेत. यापैकी घुबड हा पक्षी त्याच्या शरीररचनेमुळं आणि खिळवून ठेवणाऱ्या मोठ्ठ्या डोळ्यांमुळं जगभर आकर्षणाचा विषय बनून राहिलेला आहे. बहुतांश घुबडं निशाचर असली तरी आपल्याकडं दिसणारी जंगल आऊलेट, फॉरेस्ट आऊलेट अशी छोट्या आकाराची घुबडं दिवसाही शिकार करताना आढळतात. फक्त त्यांना पाहण्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागेल. 

शिकार करण्यासाठी अगदी अचूक डिझाईन असलेल्या घुबडाच्या शरीराची काही वैशिष्ट्यं आहेत. घुबडांचे डोळे अत्युच्चम क्षमतेचे असले, तरी ते त्यांच्या खोबणीत फिरू शकत नाहीत. मात्र ही कसर भरून काढताना त्यांची मान कुठल्याही दिशेला २७० अंशांच्या कोनात फिरू शकते. त्यामुळं तुमच्याकडं पाठ करून बसलेलं घुबड एका झटक्यात मान वळवून तुमच्याकडं पाहतं. घुबडाचे कान अत्यंत तिखट असतात. पालापाचोळ्यात झालेली किंचितशी खसपसही त्यांना पीनपॉईंट कळते आणि पाचोळ्याच्या खाली असलेला सरडाही ते झडप घालून पकडू शकतात. 

आता दोन प्रश्न विचारतो. तुमच्या डोक्यावरून कधी घुबड उडत गेलंय का? आणि गेलं असलं तर त्याच्या पंखांचा फडफडाट ऐकलाय का? आणि या दोन प्रश्नांपैकी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होकारार्थी दिलं तर तुम्ही खोटं बोलत असण्याची दाट शक्यता आहे. पाठलाग करून हल्ला करणं; तसंच अ‍ॅम्बुश - म्हणजे दबा धरून ‘सरप्राईज अ‍ॅटॅक’ करणं ही यच्चयावत शिकाऱ्यांची खासियत! सस्तन प्राण्यांमध्ये मार्जारकुळातले प्राणी ‘मांजरीच्या पावलांनी’ सरप्राईज अ‍ॅटॅक करतात. मी पाहिलेले काही बिबटे तर सागाच्या वाळक्या पानांवरून अक्षरशः हवेत चालल्यासारखे आवाज न करता निघून गेले होते. पक्ष्यांमध्येही घुबडाची अशीच अचंबित करणारी ‘नीरव’ फ्लाइट मी कैक वेळा पाहिली. अगदी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या पंखांचा आवाज कधी ऐकू आला नाही. का असावं बरं असं? याचं गुपित दडलंय त्याच्या पिसांमध्ये! 

वर म्हटल्याप्रमाणं बहुतांश घुबडं रात्री शिकार करतात. रात्री आधीच दिसायची बोंबाबोंब. त्यातून जर तुमची चाहूल भक्ष्याला लागली, तर चोच कोरून पोट भरायची वेळ नक्की. म्हणून उत्क्रांतीमध्ये घुबडाच्या मोठ्ठ्या डोळ्यांच्या घडणीबरोबरच, पिसांमध्येही असाधारण बदल घडले. याच्या पिसांचं टेक्श्चर मलमली कापडासारखं स्मूथ असतं. त्यामुळं पिसं एकमेकांवर घासूनही आवाज होत नाही. दुसरं म्हणजे, पंखांच्या फ्रंटलाईनवर कंगव्याच्या दातांसारखी अतिसूक्ष्म पिसं असतात. ही पिसं हवेची चाळण करून तिचा प्रवाह विस्कटून टाकतात. तसंच पंखांच्या मागच्या बाजूला असलेली झिगझॅग पिसंही हवेची एकसंधता मोडतात. पंखांचा विस्तारही मोठा असल्यानं एक दोन फ्लॅप्समध्येच घुबड बरंच अंतर कापतं. यामुळं कबुतर उडल्यावर येतो तसा ‘व्हुफ्फ व्हुफ्फ’ आवाज अजिबात न करता झेपावलेल्या घुबडाची, लांब धारदार नखं भक्ष्याला कळायच्या आतच त्याच्या भोवती आवळली गेलेली असतात. 

अशा अचाट नैसर्गिक क्षमता लाभलेल्या या असामान्य पक्ष्याला, भारतीय संस्कृतीनं मात्र नेमकं कुठलं स्थान दिलंय हेच कळत नाही. कारण एकीकडं आपण लक्ष्मीचं वाहन म्हणून घुबडाला मानाचं स्थान दिलं आहे; तर दुसरीकडं याच घुबडांना काळ्या जादूमध्ये बळी देण्यासाठी वापरतात. हा बळीसुद्धा एकेक अवयव उपटून अतिशय क्रूर पद्धतीनं दिला जातो. निसर्गानं घुबडाला त्याचं योग्य ते स्थान अन्नसाखळीत दिलं आहे. पण आपल्या डोक्यातल्या वैचारिक काळोखामुळं आपण अजूनही त्याचं नेमकं स्थान निश्चित करू शकलो नाही. त्या काळोखात निपजणारे वाईट विचारांचे राक्षस निपटण्यासाठी आता उलुक देवतेनंच ‘सायलेंट’ भरारी घ्यावी ही प्रार्थना. 
 

संबंधित बातम्या