सस्तन प्राण्यांचा उदय 

मकरंद केतकर
सोमवार, 16 डिसेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा काळ. सोळा सतरा कोटी वर्षं पृथ्वीवर अधिराज्य गाजवणाऱ्या डायनासोर्ससाठी तसा तो नेहमीचाच दिवस होता. पण त्यादिवशी सूर्य उगवलाच मुळी मृत्यूच्या क्षितिजावर. अवकाशाच्या गोफणीतून सुटलेली एक अतिअजस्र उल्का महाप्रचंड वेगानं, आजच्या मेक्सिकोजवळ येऊन आदळली. सहसा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळं लहानसहान उल्का जळून जातात. पण आज डायनासोर्सचं भविष्य ठरलेलं होतं. या उल्केचा आकार कित्येक किलोमीटर लांबीचा होता. एखाद्या मोठ्या शहराएवढा. लक्षावधी अणूबाँब एका सेकंदात फुटल्यावर होईल इतकी प्रचंड ऊर्जा या आघातातून निर्माण झाली (हिरोशिमा नागासाकीपेक्षा अगणित पट जास्त). हजारो किलोमीटर परिघातल्या डायनासोर्सचा विनाश झाला. या आघातातून उधळल्या गेलेल्या तप्त धुळीनं अवघ्या पृथ्वीचं आसमंत व्यापलं. पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचेनासा झाला. वनस्पती सृष्टीचा नाश होऊ लागला. मग त्यावर अवलंबून असलेले शाकाहारी जीव.. मग मांसाहारी जीव.. पत्त्यांचा बंगला कोसळायला लागला. 

हे कमी होतं म्हणूनच की काय, बहुधा या हादऱ्यानं ज्वालामुखीचे उद्रेक सुरू होऊन आपल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती सुरू झाली. जीवसृष्टीवर न भूतो न भविष्यति संकट कोसळलं. पृथ्वीनं यापूर्वीही चार वेळा महाजीवसंहार पाहिला होता. ही पाचव्याची सुरुवात होती. संकटांची ही मालिका संपायला शेकडो, हजारो वर्षं गेली. जवळजवळ ८० टक्के जीवन नष्ट झालं. परंतु, चिवट जीवसृष्टीनं हा आघातही पचवला. मृत्यूच्या पाऊलखुणांमधूनच नवीन रचनांची पाती उगवली आणि सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. सरीसृपांची सद्दी संपल्यानं सस्तन प्राण्यांना आता भरपूर वाव मिळाला. डायनासोर्सच्या युगात चिचुंद्रीएवढे असणारे सस्तन प्राणी आता गरजेनुसार नव्या आकारात आणि रूपात उत्क्रांत होऊ लागले. याचाच अर्थ माणसाचे पूर्वजही पूर्वी चिचुंद्रीसारखे जीव होते. 

सस्तन प्राण्यांच्या आज तीन शाखा आहेत. मोनोट्रिम्स, मार्सुपियल्स आणि प्लॅसेंटल्स. मोनोट्रिम्स या कुळातले सस्तन प्राणी अंडी घालतात व त्यातून बाहेर आलेल्या पिलांना दूध पाजतात. उदा. फक्त ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये आढळणारे प्लॅटिप्लस आणि एकिडना. मार्सूपियल्स या शाखेतल्या सस्तन प्राण्यांना पोटाला एक पिशवी असते, ज्यात नुकत्याच जन्मलेल्या परंतू पूर्ण वाढ न झालेल्या पिलाला ठेवून त्यांचं पालनपोषण केलं जातं. उदा. कांगारू. प्लॅसेंटल या शाखेत ते सर्व सस्तन प्राणी येतात; ज्यांच्या पिलांची पूर्ण वाढ आईच्याच गर्भाशयात होते. उदा. माणूस. 

सस्तन प्राण्यांमध्ये मांसाहारी, शाकाहारी आणि मिश्राहारी असे तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारातही काही उपप्रकार आहेत ज्यात शिकार करून मांस खाणारे किंवा मेलेल्या प्राण्याचं भक्षण करणारे प्राणी येतात. जसे - वाघ, सिंह, लांडगे. याचबरोबर मांसभक्षींमध्ये कीटक खाणारे प्राणी उदा. खवले मांजर, वटवाघुळ इत्यादी. तसंच मासे खाणारे उदा. ऑटर्स यांचा समावेश होतो. शाकाहारी प्राण्यांमध्ये हरिण, गवे, हत्ती अशा प्राण्यांचा समावेश होतो. तर मिश्राहारी प्राण्यांमध्ये कोल्हे, अस्वल, माणूस वगैरे प्राण्यांचा समावेश होतो.

सस्तन प्राण्यांनी जल, पृथ्वी आणि आकाश अशी तिन्ही विश्वं व्यापली आहेत. गंमत म्हणजे वटवाघुळ हा एकमेव सस्तन प्राणी हवेत उडू शकतो. 

भारतात तसेच जगातल्या विविध देशांत आढळणाऱ्या उडणाऱ्या खारीचं विशेषण जरी ‘उडणारी’ असलं तरी ती वटवाघुळाप्रमाणं जमिनीवरून आकाशात झेपावू शकत नाही; तर उंचावरून खाली पॅराशूटसारखी तरंगत येते. जमिनीवर जेव्हा स्पर्धा वाढली तेव्हा काही प्रजातींनी महाप्रचंड अशा पाण्याचा आश्रय घेतला. आज पाण्यात राहणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये व्हेल, डॉल्फिन, मॅनटी इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. व्हेलला त्याच्या शारीरिक रचनेमुळं आपण देव'मासा’ म्हणतो. पण पाण्यात राहात असले तरी या प्राण्यांना श्वसनासाठी पाण्याबाहेर यावंच लागतं. 

आज याच साऱ्या प्राण्यांचा नातलग असलेल्या मानवानं पृथ्वीवर चालवलेला धुमाकूळ पाहता वाटतं... नियतीनं सहाव्या जीवसंहाराची तारीख निश्चित केली आहे की काय!

संबंधित बातम्या