सांबर आणि बारासिंगा 

मकरंद केतकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

आज आपण शाकाहारी जीवांपैकी सांबर आणि हार्ड ग्राऊंड बारासिंगा या दोन जीवांची ओळख करून घेऊ. हरणांमध्ये सारंग आणि कुरंग असे दोन प्रकार असतात. इंग्लिशमध्ये त्यांना डियर आणि अँटेलोप असं म्हणतात. त्यापैकी सारंग या कुळातल्या प्राण्यांची शिंगं वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. या कुळात सांबर, चितळ, बाराशिंगा आदी प्रकारची हरणं येतात. यांच्यामध्ये फक्त नरांनाच शिंगं येतात. कुरंग कुळातल्या प्राण्यांची एकदा उगवलेली शिंगं पुन्हा गळत नाहीत. यामधे चिंकारा, काळवीट, चौसिंगा, नीलगाय हे प्राणी येतात. कुरंग कुळातल्या काही प्राण्यांमध्ये माद्यांना शिंग येत नाहीत आणि काहींमध्ये शिंगं असतात. 

सारंग या कुळातला पहिला रुबाबदार प्राणी म्हणजे सांबर. जंगलामध्ये खणखणीत आवाजात धोक्याची सूचना देणाऱ्या या रुबाबदार प्राण्याला मी कितीही तास पाहात राहू शकतो. सारंग कुळातील हरणांच्या शिंगांची वाढ होत असताना त्यावर मखमली त्वचेचं आवरण असतं व त्यामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. या काळात ही हरणं इतर नरांशी संघर्ष शक्यतो टाळतात. शिंगांची पूर्ण वाढ झाल्यावर मखमली आवरण वाळून जातं व पोपडे पडतात. या काळात नर हरणं झाडांवर व दगडांवर आपली शिंगं घासून हे पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात. साधारण दोनशे ते अडीचशे किलो वजनाचं हे धूड भारतातील सर्वांत मोठं सारंग आहे. एक सांबर मारलं, की वाघासारख्या प्राण्याचा आठवडा सहज निघतो. मात्र कळपात राहणारा हा प्राणी अतिशय सावध असतो. त्याचे कान आणि नाक अतिशय तीक्ष्ण असतात. त्यामुळं कुणा एकाला जरी धोक्याची चाहूल लागली, तरी शेपूट वर करून आणि एक पाय आपटून तो ‘भ्राँग’ असा जोरात ओरडतो. हा आवाज अर्धाएक किलोमीटरवरसुद्धा सहज ऐकू जातो. त्यामुळं त्या परिसरातले इतर तृणभक्षी सावध होतात आणि वाघाला आपला बेत रद्द करावा लागतो. 

भारतात मध्यप्रदेशमध्ये आढळणारा हार्ड ग्राऊंड बारासिंगा हा सारंग कुळातलाच दुसरा दमदार प्राणी. 

बारासिंगांचा मुख्य अधिवास, हिमालयाच्या पायाशी असलेला तेराई हा दलदल असलेला गवताळ प्रदेश आहे. दलदलीत वावरण्यासाठी त्यांना अनुकूल असे विशिष्ट रचनेचे खूर विकसित झाले आहेत. यांना सॉफ्ट ग्राऊंड बारासिंगा असं म्हणतात. मात्र यांचीच एक प्रजाती मध्य भारतातील साल वृक्षांच्या पानझडीच्या जंगलात आढळते. इथं दलदल नसल्यानं त्यांना कठीण जमिनीवर चालावं लागतं म्हणून यांना हार्ड ग्राऊंड बारासिंगा म्हणतात. साधारण सांबराच्याच आकाराच्या या प्राण्याची शिंगही सांबरासारखीच प्रजनन काळापूर्वी गळून प्रजनन काळात नव्यानं येतात. जसं वय वाढेल तसं नवीन आलेल्या शिंगांवर नवीन फाटे फुटतात. मात्र सांबरापेक्षा याच्या शिंगावर खूप जास्त फाटे असतात. चिखलात लोळणं, तळ्यात शिरून पाणवनस्पती खाणं हा यांचा आवडता उद्योग आहे. 

पूर्वी यांचा आढळ मध्यप्रदेशातील अनेक ठिकाणी दिसायचा. मात्र आक्रसलेले अधिवास, साथीचे रोग, तसंच शिकार यामुळं सध्या संपूर्ण जगात हे फक्त कान्हा अभयारण्यामध्येच आढळतात. पूर्वी सुमारे तीनेक हजाराच्या आसपास असलेले हे बारासिंगा १९६६ च्या दरम्यान फक्त ‘साठ’ या दयनीय संख्येपर्यंत रोडावले होते. मग मात्र सरकारनं कंबर कसली आणि यांची संख्या वाढवण्याचा निर्धार केला. पूर्वी कान्हामध्ये अनेक आदिवासी गावं होती. या गावातले रहिवासी जंगल साफ करून तिथं शेती करायचे. कान्हाला संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाल्यावर वनखात्यानं त्या मोकळ्या जागांमध्ये जंगल वाढू न देता तिथं फक्त गवतच वाढेल याची काळजी घेतली. तसंच अनेक मोठे बंदिस्त भाग तयार करून तिथं या हरणांना सोडून त्यांची हेतूपूर्वक निपज केली आणि आज या बारासिंगांची संख्या साडेसहाशेपर्यंत येऊन पोचली आहे. शासकीय संस्थांनी मनावर घेतलं तर काय चमत्कार होऊ शकतात याची साक्ष ही यशोगाथा देते.

संबंधित बातम्या