रामराम आणि नमस्कार 

मकरंद केतकर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

निसर्ग कट्टा
 

सर्वांना नमस्कार आणि रामराम. काही कोटी वर्षांचा प्रवास करून आज आपण इथं पोचलो आहोत. ताशी सोळाशे सत्तर किलोमीटर या वेगानं फिरत पृथ्वीनं अजून एक गिरकी पूर्ण केली आणि तुमच्या हातातल्या ‘सकाळ साप्ताहिक’मधील, २०१९ या वर्षातील हा शेवटचा लेख आज तुम्ही वाचत आहात. ३ जानेवारी रोजी ‘जंगल कसं बघावं?’ या लेखातून आपण पहिल्यांदा भेटलो आणि एका सुजाण वाचकवर्गाशी माझी ओळख झाली. यानंतर जवळपास दर रविवारी आपण निसर्गातल्या अद्‍भुत रचनांचा परिचय करून घेत आपण भेटत राहिलो. या वर्षभरात आपण इतक्या नवनवीन गोष्टींची ओळख करून घेतली आहे, की तुमच्या आठवणीत कदाचित त्या राहिल्याही नसतील. म्हणून, आपण नेहमीप्रमाणंच भूतकाळात जाऊन या सगळ्यांचा थोडक्यात आढावा घेऊ... 

वर म्हटल्याप्रमाणं आपली सुरुवात ‘जंगल कसं बघावं?’ या विषयानं झाली. पण जंगलात किंवा कुठल्याही नैसर्गिक अधिवासात भटकायचं आणि नवीन काही शिकायचं, तर ज्ञानेंद्रियं सजग असणं फार गरजेचं आहे. विशेषतः ‘हे क्काये?’ ही लहान मुलांसारखी कुतूहलवृत्ती जागृत असणं फार फार आवश्यक! म्हणूनच निरीक्षणशक्तीचं महत्त्व आपण जाणून घेतलं. यानंतर आपण आपल्या भूमातेची ‘टाइमस्केल’ ओळख करून घेतली. पृथ्वीच्या निर्मितीपासून सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीपर्यंत साधारण कुठल्या काळात काय झालं याचा हा गोषवारा होता. मग आपण पाहिलं, की हा सारा भूतकाळ ज्या जीवाश्मांमुळं उलगडत आहे ते जीवाश्म नेमके काय आहेत, कुठं सापडतात, त्यांची निर्मिती कशी झाली इत्यादी. मग आपण आजच्या बहुतांश जीवसृष्टीचे ‘आधारू’ असलेले तरू आणि इतर वनस्पतीसृष्टीच्या अंतरंगात डोकावलो. यात आपण त्यांची उत्क्रांती तर पाहिलीच, पण त्याबरोबर त्यांची स्वतःची संरक्षणव्यवस्था, त्यांचे इतर वनस्पती आणि सजीवांबरोबर असलेले परस्परावलंबनही पाहिले. आता आपण शिरलो आपल्या लाडक्या सह्याद्रीच्या कुशीत. साडेसहा कोटी वर्षांपासून ताठ मानेनं उभा असलेला हा पुराणपुरूष अजूनही तितकाच तरुण दिसतो. पृथ्वीनं जन्माला घातलेलं हे बलभीम अपत्य नेमकं कसं घडलं याची एक सुरस गाथा आपण वाचली. आता आपण ‘चर’ सृष्टीचं दार उघडलं आणि लक्षात आलं की इथं मुंगीपासून व्हेलपर्यंत प्रचंड जैवविविधता आहे. त्यामुळं, प्राचीन ते आधुनिक काळात या जीवसृष्टीचा अभ्यास करताना विविध संशोधकांना काय अडचणी आल्या व त्यातून या जीवांची वर्गवारी, क्रमवारी निश्चित करण्याच्या विविध पद्धती, विशेषतः कार्ल लिनियसनं शोधलेली ‘बायनॉमियल क्लासिफिकेशन सिस्टीम’ आपण जाणून घेतली. इथून पुढं जाताना आपण संधीपाद सृष्टी पाहिली ज्यात आपल्या लाडक्या फुलपाखरांपासून अनेकांना किळसवाण्या वाटणाऱ्या झुरळापर्यंत अनेक कीटकांचा समावेश होता. कीटकविश्वाच्या शेवटी आपण कोळी, विंचू  अशा काही अष्टपाद जीवांचीही ओळख करून घेतली. मग आपण पाहिले उभयचर आणि इतर सरीसृप. बेडूक, देवपाल अशा उभयचरांचं विश्व किती ‘इंटरेस्टिंग’ आहे, हे आपल्याला जाणता आलं. अनेकांना अंगावर शहारे आणणारी पाल, भीतीदायक वाटणारा साप तसंच मगर, सुसर याही सरीसृपांची आणि आपली नव्यानं भेट झाली. एवढंच नव्हे, तर सापांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धांचाही आपण समाचार घेतला. लेखमालेच्या उत्तरार्धाकडे झुकताना आपण पक्षीविश्वाच्या दुनियेची छोटीशी सफर केली आणि सर्वांत शेवटी सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि आज दिसणारे त्यांचे विविध प्रकार यांची झलक पाहिली. 

लांबच्या प्रवासात काही नव्या ओळखी होतात, त्या आयुष्यभर स्मरणात राहतात तसं काहीसं माझं झालं आहे. मला खात्री आहे की तुम्हालाही हा प्रवास रंजक वाटला असावा. कारण तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळंच २०२० या वर्षातही आपण दर रविवारी भेटणार आहोत. पण मंडळी, आता आपण अजून भूतकाळात जाणार आहोत बरं का! किती विचारताय? थोडी कळ काढा... ‘सरप्राईज इज वेटिंग जस्ट अराऊंड द कॉर्नर’...
(समाप्त)

संबंधित बातम्या