अर्धवट ज्ञान अधिक धोकादायक

मकरंद केतकर
बुधवार, 1 जुलै 2020

मैत्री भोवतालची

भारतीय संस्कृती ही जगातल्या फार प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आपल्या पूर्वजांनी भोवताली आढळणाऱ्या अनेक प्राण्यांना कधी दैवी, तर कधी दानवी स्वरूपात सादर करून या ना त्या प्रकारे लोकजीवनात स्थान देण्याचा प्रयत्न केला. जसजसा काळ पुढं सरकला तसतशी विज्ञानानं प्रगती केली आणि माणसांनी कालौघात या प्राणी-पक्ष्यांना बहाल केलेल्या अनेक कल्पनातीत अद्‍भुत शक्तींचं वास्तव रूप आपल्यासमोर येऊ लागलं. मात्र, माणसांना ज्ञानापेक्षा मनोरंजनात अधिक रस असल्यानं आणि आधुनिक युगात मनोरंजनच बक्कळ पैसा मिळवून देत असल्यानं त्यावर आधारित गोष्टीच अधिक कल्पक स्वरूपात मांडल्या जाऊ लागल्या. हिंदी सिनेमा हा त्याचंच एक रूप. सापांवर आधारित अनेक हिंदी सिनेमे तयार केले गेले. त्यातून ज्या अनेक खोट्या गोष्टी मीठमसाला लावून रंगवून दाखवल्या गेल्या, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे, सर्पदंशानं आडव्या झालेल्या हिरोची जखम शोषून हिरॉईन त्यातून विष खेचून बाहेर काढते. विज्ञानाच्या दृष्टीनं तद्दन बकवास असलेली गोष्ट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि याचंच एक आधुनिक रूप आज आपल्याला ‘व्हेनम एक्स्ट्रॅक्टर’च्या रूपानं पाहायला मिळतं. सापाच्या विषावर उपलब्ध असलेल्या पाच रुपयांच्या औषधाची थाप मागच्या एका लेखात मी सविस्तर उलगडून सांगितली होती. आज या विषापेक्षा धोकादायक, रोगापेक्षा इलाज भयंकर असलेल्या ‘व्हेनम एक्स्ट्रॅक्टर’बद्दल सांगणार आहे.

एक गोष्ट लक्षात घ्या, सापाचं विष हे शेकडो प्रथिनांनी तयार झालेलं अत्यंत घातक असं रसायन आहे. ही केमिस्ट्री निसर्गाच्या प्रयोगशाळेत करोडो वर्षांच्या उत्क्रांतीमधून सिद्ध झालेली आहे. त्यामुळं त्यावर इलाजसुद्धा फार सावधपणे करावा लागतो. जी गोष्ट मेडिकल सायन्स अ‍ॅप्रुव्ह करत नाही, त्याबद्दल रिस्क घेणं टाळलेलंच बरं.

परवाच एकानं शंकासमाधानासाठी मला व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ पाठवला, ज्यात शेतात बसलेला एक माणूस हातात सुई नसलेली इंजेक्शनची रिकामी सीरींज घेऊन त्याचा वापर विष निर्मूलनासाठी कसा केला जातो याबद्दल सांगताना दिसतोय. जिथं सर्पदंश झालाय तिथं ही सीरींज घट्ट दाबून धरायची आणि तिचा दट्ट्या मागं खेचून जखमेतून रक्त बाहेर खेचायचं, म्हणजे त्याच्यासकट विषही बाहेर येईल अशी त्या व्हिडिओत समजूत करून दिली आहे. खरंच! किती सोपं आहे ना? पण यावर संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या कित्येक रिसर्च पेपर्समधील फॅक्ट्स काय सांगतात ते आता बघू-

पहिली गोष्ट म्हणजे, सापाचं विष जखमेच्या ठिकाणी साचून राहत नाही. वाहत्या पाण्यात रंगाचा थेंब टाकल्यावर त्याचं जे होईल तेच विषाचं होतं. त्यातली प्रथिनं त्वचेतून आत शिरल्यावर ताबडतोब रक्तात शोषली जातात. आत शिरल्यावर ती पेशींचं आवरण तसंच टिश्यूजना नष्ट करण्याचं काम सुरू करतात. अमेरिकेत आढळणाऱ्या रॅटलस्नेक या सापाच्या दंशानंतर, या साधनाच्या साहाय्यानं जखमेतून बाहेर काढलेल्या द्रव्यात विषाचं प्रमाण दहा हजार पार्टिकल्समध्ये एक (१/१०,०००) असं होतं. म्हणजे जवळजवळ शून्य.

या संशोधनांमध्ये आढळलेलं दुसरं वास्तव म्हणजे, या साधनामुळं उपायापेक्षा अपायच अधिक होतो. याचं कारण असं आहे, की सापाचे विषाचे दात कमीअधिक प्रमाणात वक्र असतात. ते त्वचेत घुसल्यावर वक्र मार्ग तयार होतो. दात टिश्यूजना बाजूला सारून आत जातात आणि ते बाहेर येताना टिश्यूजमधली गॅप बऱ्याच अंशी परत बुजते, ज्यामुळं आत शिरलेलं विष बाहेर न येता आतच राहतं. व्हेनम एक्स्ट्रॅक्टर लावून जेव्हा माणूस विष बाहेर खेचायचा प्रयत्न करतो, तेव्हा तिथले टिश्यूज आणि त्वचासुद्धा खेचली जाऊन जखम बुजण्याचा धोका अधिक वाढतो आणि विष भिनण्याचासुद्धा. आशा करतो, आता आपल्याला लक्षात आलं असेल की अशा कुठल्याही अवैज्ञानिक पद्धतीनं केलेला उपचार उपायापेक्षा अपायच अधिक करू शकतो. त्यामुळं मनोरंजन आपल्या जागी आणि विज्ञान आपल्या जागी हेच खरं.          (समाप्त)     

संबंधित बातम्या