केरळचे संकट मानवनिर्मित?

संकलन : रोहित हरीप
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

नोंद
 

मान्सूनचा पहिला शिडकावा भारतभूमीवर जेथे होतो ती देवभूमी म्हणजे केरळ. एका बाजूला पश्‍चिम घाटांची तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्राच्या किनारपट्टीत असलेल्या केरळच्या चिंचोळ्या पट्टीतून तब्बल ४४ नद्या वाहतात. चहाचे मळे, सदाहरित वने, स्वच्छ समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, सुजलाम्‌-सुफलाम्‌ अशी ओळख असलेले केरळ सध्या मात्र बिकट प्रसंगातून जात आहे. केरळमध्ये ऐन पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या निधनामुळे दुःखात बुडालेल्या देशाचे सुरवातीला केरळच्या हाहाकाराकडे दुर्लक्ष्यच झाले. मात्र सोशल मिडीयावर केरळच्या बातम्या धडकू लागल्या तसतशी केरळमधल्या महापूराची भीषणता जाणवू लागली. तब्बल ९४ वर्षांनंतर केरळमध्ये पूर आला आहे. या पुरात चारशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत तर लाखो लोकांची घरांचे नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानीचा आकडा आठ हजार कोटींच्या घरात आहे. आलेल्या पुराने रस्तेसुद्धा वाहून नेले. 

केरळ राज्य या आपत्तीतून नक्कीच सावरेल; पण ही आपत्तीच्या मुळाशी नक्की काय कारणे आहेत? याला जबाबदार कोण याची चिकित्सा नक्कीच व्हायला हवी. केरळच्या पुराची चिकित्सा करताना हा पूर नक्की कशामुळे आला? कोणामुळे आला ? कोणाचे नियोजन चुकले हे काही दिवसातच उघड होईल, चौकशी आयोग नेमले जातील पण केरळचा पूर हा निसर्गनिर्मित होता, की मानवनिर्मित हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरितच राहणार.

अतिवृष्टी नव्हे...
आकडेवारीनुसार केरळला झालेला पाऊस हा शास्त्रीयदृष्ट्‌या अतिवृष्टी या गटात मोडणारा नव्हता. पावसाचे प्रमाण नक्कीच जास्त होते; पण जास्त पडलेला पाऊस हे एकमेव कारण या महापुरामागे निश्‍चितच नव्हते. वर्ष २०१४ व २०१८ या दोन्ही वर्षांची पावसाची आकडेवारी सारखीच आहे. २०१५, २०१६ , २०१७ या तीनही वर्षात पावसाचे प्रमाण कमी होते. २०१४ या वर्षात २०१८ एवढाच पाऊस पडला पण तेव्हा पुरजन्य परिस्थिती नव्हती.

धरणातील ढिसाळ नियोजन?
केरळच्या महापुराचे दुसरे प्रमुख कारण सांगितले जाते, की केरळमधील सर्व धरणाचे दरवाजे एकदम उघडल्यामुळे नदीपात्र त्यांच्या क्षमतेपेक्षा ओसंडून वाहू लागली आणि नदीकाठची गावे बुडाली. पण यामागेही मानवी हस्तक्षेप हे कारण आहेच; कारण अनिर्बंध जंगलतोडीमुळे आणि डोंगराच्या सपाटीकरणामुळे डोंगराची माती पाण्याबरोबर वाहत नदीत मिसळते. पर्यायाने नदीची जलधारणेची क्षमता कमी होते व नदीतले पाणी पात्राबाहेर पसरते. त्यालाच आपण महापूर असे नाव देतो.

बेकायदा व बेसुमार खाणकाम
केरळमध्ये बेकायदा खाणींचे प्रचंड मोठे साम्राज्य आहे. या बेकायदा खाणींमुळे खेडेगावातल्या लोकांच्या आरोग्याचे, शेतीचे, घरांचे, जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पण या खाणमाफियांना सरकारचा वरदहस्त असल्याची वदंता आहे. आत्ता केरळमध्ये महापूरासोबतच दरडी पडून नुकसान होण्याचे प्रमाण जास्त आहे. डोंगरामधला दगड सुटा होऊन कोसळणे हे दरडी कोसळण्यामागे प्रमुख कारण आहे. या दरडी कोसळण्याच्या घटना ज्या भागात बेकायदा खाणी आहेत तिथे जास्त घडल्या आहेत. गाडगीळ आयोगाने २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पश्‍चिम घाटाच्या अहवालात या खाणींविषयी धोक्‍याची स्पष्ट सूचना दिली होती. पण या आयोगाला केरळ राज्यातून तीव्र विरोध करण्यात आला होता.

मॉन्सूनची अनिश्‍चितता
जगात सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून पश्‍चिम घाटाचा भाग ओळखला जातो. या भागात गेल्या दशकभराच्या काळात सरासरी पर्जन्यमानाच्या आकडेवारीत प्रचंड चढउतार बघावयास मिळाले आहेत. भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेने या संबंधीचा अहवाल २०१५ मध्ये दिला होता. या अहवालानुसार भविष्यात मान्सूनचे प्रमाण वाढणार आहे. हा इशारा नक्कीच गंभीर आहे.

विकास आणि पर्यावरण या दोन्ही संकल्पना या परस्परविरोधी आहेत असे एक चित्र आपल्याकडे उभे केले. मात्र या दोन्ही संकल्पना परस्परविरोधी नसून त्या परस्परांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात विकासाचे कोणतेही धोरण राबवताना निसर्गाचा विचार हा प्राधान्याने करावा लागेल. 

संबंधित बातम्या