मेंदूच्या गुदगुल्या स्मरणशक्तिवर्धक 

रोहित हरीप
शुक्रवार, 9 मार्च 2018

नोंदी

आपल्या मेंदूला गुदगुल्या होतात, विद्युत प्रवाहाच्या साह्याने या गुदगुल्या करता येतात याविषयी कधी ऐकलं आहे का ? सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर करून जर या मेंदूपर्यंत पोचवल्या तर आपली स्मरणशक्ती वाढण्यास कशी मदत होते यावर सध्या अमेरिकेतील मायो संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. 

संशोधकांच्या मते, आपल्या मेंदूमधील जो भाग भाषाकेंद्राशी आणि शाब्दिक स्मरणशक्तीशी जोडला गेलेला असतो त्या भागाची स्मरणशक्ती, विद्युत लहरींचा योग्य प्रमाणात वापर करून वाढवता येते. मेंदूचे हे केंद्र आपल्या कानाच्या वरच्या भागात असते. शास्त्रीय भाषेत हे केंद्र ‘लॅटरल टेंपोरल कॉर्टेक्‍स’ या नावाने ओळखले जाते.

मेंदूशी संबंधित असलेल्या विविध विकारांमध्ये स्मरणशक्ती गमावण्याचे प्रमाण मोठे आहे. ही स्मरणशक्ती परत मिळवण्याचे 

फारसे इलाज आजमितीला उपलब्ध नाही. जे उपाय करता येतात त्यासाठी फार प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो आणि हा खर्च सर्वसामान्यांच्या क्षमतेबाहेरचा आहे. याकारणे बराच मोठा वर्ग या उपाययोजनांपासून वंचित राहतो. त्यामानाने विद्युत प्रवाहाचा वापर करून स्मरणशक्ती वाढविण्याचा उपाय स्वस्त असून सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातला आहे.  

या संशोधनातील पुढची पायरी म्हणजे, या विद्युत लहरी मेंदूच्या जास्तीत जास्त अचूक आणि आपल्याला हव्या त्या भागात कशा प्रकारे पोचवता येतील ही आहे. ज्या लोकांना अपस्माराच्या (Epilepsy) आजाराचा त्रास होतो, अशा रुग्णांवर हे प्रयोग प्राथमिक पातळीला करण्यात आले. यातून डॉक्‍टरांना अपेक्षित परिणाम हाती आले. या रुग्णांच्या पूर्वपरवानगीने हे प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले आहेत. मेंदूच्या आणि स्मरणशक्तीच्या विविध आजारांशी झुंजत असलेल्या जगभरातील कोट्यवधी लोकांना या संशोधनामुळे दिलासा मिळणार आहे. 

संबंधित बातम्या